जीवनगाणे : मेकअप युअर माइंड

-अरुण गोखले

“सुंदरता’ ही प्रत्येकाच्याच मनाला भावत असते. मग ती निसर्गातली असो नाहीतर व्यक्‍तीतली. स्त्रियांच्या बाबतीतला तर हा एक विशेष विषय आहे. सुंदरतेची मोहिनी सहजच कोणालाही पडते. ज्या सुंदरतेकडे परत परत वळून पाहावे, असे वाटते ती सुंदरता. प्रथमदर्शनी मानवी मनाला आकर्षून घेते ती सुंदरता.

सुंदरतेबद्दल आपले मत व्यक्‍त करताना एक प्रसिद्ध नायिका असे म्हणते की, सुंदर दिसण्यापेक्षा माणसाने सुंदर असणे फार महत्त्वाचे आहे. आपण आपले रूप सुंदर दिसावे, आकर्षक वाटावे यासाठी अनेक उपाय करत असतो. आपला चेहरा सुंदर दिसावा म्हणून स्त्रिया अनेक सौंदर्य प्रसाधनांचा वापर करत असतात. विविध केशरचना, वस्त्रालंकार आणि त्याचबरोबर चेहऱ्याचा मॅकअप करणे ह्या गोष्टी आपण सुंदर दिसावे या अपेक्षेनेच केल्या जातात. या प्रयत्नात पुरुषही फार मागे असतात असे नाही.

एका प्रवचनात बाबा महाराज सातारकर हे या संदर्भात असे म्हणाले होते की, मेकअप म्हणजे काय? तर भरून काढणे, आपण मेकअप करतो म्हणजे काय करतो? तर आपल्या दिसण्यातल्या ज्या उणिवा आहेत त्या काही अंशानी भरून काढण्याचा प्रयत्न करतो.

पण हे वरवरचे सुंदर दिसणे ही व्यक्‍तीची खरी सुंदरता आहे का? सुंदर दिसण्यापेक्षा सुंदर असणे हे महत्त्वाचे नाही का? याचा विचार व्हायला हवा. जर सुंदर दिसण्यासाठी आपण हा वरचा मेकअप करत असलो तर आपण खऱ्या अर्थाने सुंदर बनण्यासाठीही आपण आपल्या मनाचाही मेकअप करायला नको का?

मेकअप युअर माइंड… हा संदेश त्यासाठीच. आता ही मनाची सुंदरता म्हणजे नेमकं काय, याचा प्रत्येकाने बारकाईने विचार करायला हवा. राग, लोभ, मोह आणि मत्सरांची मानसिक कुरूपता दूर करायला हवी. स्वार्थी मनोवृत्तीच्या डोळ्यात विवेकाचे अंजन घालून दृष्टी स्वच्छ करायला हवी.

निःस्वार्थ, निर्मोही अन्‌ निष्कपटीपणाची आभूषणे अंगी ल्यायला हवीत. आपल्या मनात प्रेमाचा सहृदयतेचा, भूतदयेचा, माणुसकीचा झरा सदैव खळळता ठेवायला हवा. दुर्गुणांना दूर करून सद्‌गुणांची जोडणी हा खरा मानसिक आणि व्यक्‍तिमत्त्व विकासातला मेकअप आहे.

सुंदर दिसण्याच्या वरवरच्या प्रयत्नात, सुंदर असण्याच्या प्रयत्नात आपण कुठे कमी पडत नाही ना याचा साक्षीत्वाने विचार करायला हवा. कारण आपल्या सुंदर मनाचं दर्शन हे आपल्या वर्तनातून दिसत असते. वरवरच्या सौंदर्यापेक्षा मनाचे सौंदर्य वाढवणे हेच उचित आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)