जीवनगाणे : तिचा मान राखा

– अरुण गोखले

प्रत्येक घरातली स्त्री ही त्या घरची गृहदेवता, गृहस्वामिनी, मालकीण असते. कुटुंबात तिचं मोल ओळखून तिला सन्मान आणि प्रतिष्ठा ही द्यायलाच हवी. तसे करणे हे कुटुंबांतील प्रत्येकाचे कर्तव्य आहे, ही गोष्ट विसरून चालणार नाही.

जीवनविद्येची शिकवण देणारे प. पूज्य. वामनराव पै हेसुद्धा आपल्याला हेच सांगतात की, बाबांनो! तुम्हाला तुमच्या घरच्या गृहलक्ष्मीचं मोल अजून कसं कळत नाही? तुम्ही तिचा उचित मान तिला का देत नाही. कुटुंबातील स्त्री ही फार महत्त्वाची आहे. तिचं स्थान हे आदराचं आहे. तिचा मान आणि तिचा आदर राखायलाच हवा.

मानवी जीवनातील कुटुंबसंस्था ही फार मोलाची आहे. संसार प्रपंच्याच्या रथाची स्त्री आणि पुरुष ही दोन चाक आहेत. त्यांच्या समसमांतर चालण्यावरच प्रपंच्याचा सारा समतोल अवलंबून असतो. माणूस बालपणापासून त्याच्या घरातच घडत असतो. तो इथेच वाढतो आणि या कुटुंबाच्या सुखासाठीच जन्मभर प्रयत्न करत असतो.

प्रत्येक कुटुंबातील स्त्रीची कुटुंबातली भूमिका फार मोलाची असते. तिचे घरातले स्थान हे अत्यंत महत्त्वाचे असल्याने तिचा घरची गृहस्वामिनी म्हणून उचित मान हा द्यायलाच हवा. ती आपल्या जीवनाशी आई, आजी, पत्नी, बहीण, मावशी, आत्या, काकी, मामी अशा विविध नात्यांनी जोडलेली असते.

पूज्य वामनराव पै म्हणतात की, खरं तर ती तुमच्यासाठी किती भूमिकांवर आणि तेही किती सहजतेने वेगवेगळी कामे करीत असते. ती तुमचं घर सांभाळते म्हणजे ती तुमच्या घराची गृहमंत्री आहे. ती कुटुंबातील प्रत्येकाला काय हवं काय नको याचा विचार करून आपल्याला मोठ्या प्रेमाने अन्न शिजवून खाऊ पिऊ घालते म्हणजे ती घरची अन्नमंत्री आहे. आपल्या घरातील मुलांचा अभ्यास घेते, त्यांना शाळेत नेऊन सोडते, आणते, त्यांना अभ्यासाला प्रवृत करते, प्रोत्साहन देते म्हणजेच ती तुमच्या घरची शिक्षणमंत्रीही आहे.

ती कुटुंबातील सर्वांच्या आरोग्याची काळजी घेते, आपण आजारी पडलो तर औषधोपचार-सेवा करते, म्हणजेच ती आरोग्यमंत्री आहे. एखाद्या महत्त्वाच्या निर्णयात ती आपल्याला प्रसंगी लाख मोलाचा सल्ला देते म्हणजेच ती आपली सल्लागारही आहे. असं असताना आपणच तिचं आपल्या जीवनातलं आणि कुटुंब संस्थेतले मानाचे स्थान ओळखून तिचा उचित मान राखायला नको का?

Leave A Reply

Your email address will not be published.