कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानातच असल्याचा पुरावा एका छायाचित्राच्या स्वरूपात गुप्तचर संघटनांच्या हाती लागला आहे. दाऊदच्या डी-नेटवर्कचा आंतरराष्ट्रीय कारभार सांभाळणारा दाऊदचा सर्वांत खास सहकारी जाबिर मोती याच्यासोबत दाऊद या छायाचित्रात दिसत असून, हे छायाचित्र मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध झाले आहे. या छायाचित्रात दाऊदची प्रकृतीही चांगली असल्याचे दिसत आहे. दाऊद गुडघ्यांच्या गंभीर आजाराने त्रस्त असल्याचे वृत्त यापूर्वी अनेक माध्यमांनी दिले होते.
गुप्तचर संघटनांच्या माहितीनुसार, जाबीर मोती हा दाऊदच्या कराची येथील क्लिफंटन हाउसच्या शेजारी राहतो आणि दाऊदची पत्नी मेहजबीन तसेच मुलगा मोईन नवाज यांच्याशी त्याचे घनिष्ट संबंध आहेत. यापूर्वी पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने नुकतेच सांगितले होते की, दाऊद इब्राहिम पाकिस्तानात नाहीच. वस्तुतः 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट मालिकेचा मुख्य आरोपी असणारा दाऊद सध्या पाकिस्तानात राहतो असे ब्रिटनमधील एका न्यायालयात पूर्वीच सांगितले गेले होते.
पाकिस्तानच्या परराष्ट्र विभागातील प्रवक्ते महंमद फैजल यांनी आपल्या साप्ताहिक पत्रकार परिषदेत एका प्रश्नाच्या उत्तरात असे सांगितले की, दाऊद पाकिस्तानात नाही; परंतु दाऊदचे व्हायरल होत असलेले छायाचित्र या दाव्याची पोलखोल करणारे आहे. जाबिर मोती याच्या प्रत्यार्पणाच्या खटल्यात लंडनच्या वेस्टमिन्स्टर न्यायालयात नुकतेच असे सांगण्यात आले होते की, दाऊद 1993 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेप्रकरणी वॉन्टेड आरोपी आहे आणि सध्या तो पाकिस्तानातच आहे. या बॉम्बस्फोट मालिकेत 200 पेक्षा जास्त जणांचा बळी गेला होता.
मोती याचे वकील एडवर्ड फित्जगेराल्ड यांनी प्रत्यार्पणाच्या प्रकरणात वाचून दाखविलेल्या प्रतिज्ञापत्रात असे म्हटले होते की, तो सध्या पाकिस्तानात रहिवासास आहे. दाऊद आणि त्याचा भाऊ अनिस इब्राहिम 1993 पासूनच भारतातून फरार आहेत. त्यांनी सांगितले की, जाबिर मोती थेट दाऊदशीच संबंधित असल्याचे सध्या सुरू असलेल्या चौकशीतून निष्पन्न झाले आहे. वस्तुतः फित्जगेराल्ड यांना असे शाबित करायचे होते की, त्यांच्या अशिलाचा म्हणजे जाबिर मोतीचा दाऊदशी आणि डी-कंपनीशी संबंध जोडण्याचा अर्थ असा होईल की, त्याच्यावर न्यूयॉर्कमधील मेट्रोपोलिटन सुधारणा केंद्रात कारवाई केली जाईल. त्याला इतर कैद्यांपासून स्वतंत्र ठेवणे आणि त्याला अधिक संरक्षण देण्याचाही त्यात समावेश आहे. अमेरिकेच्या म्हणण्यानुसार, दाऊद आणि त्याच्या सहकाऱ्यांचे अल्-कायदा या दहशतवादी संघटनेशीही जवळचे संबंध होते. त्यामुळेच अमेरिकेने त्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले होते.
लंडनमधील न्यायालयात प्रतिज्ञापत्रासह दाऊद पाकिस्तानात असल्याचे सांगितले गेल्यानंतर आठवडाभरातच पाकिस्तानच्या परराष्ट्र विभागाने दाऊद पाकिस्तानात असल्याचे नाकारणे बुचकळ्यात टाकणारे होते. दाऊदचा हस्तक जाबिर मोती हा त्याचे आर्थिक व्यवहार, वसुली आणि अंमलीपदार्थांच्या तस्करीचा कट रचल्याप्रकरणी अमेरिकेला हवा आहे. त्यासाठी त्याच्याविरुद्ध खटला सुरू आहे. जाबिरला स्कॉटलंड यार्डच्या म्हणजेच लंडन महानगर पोलिसांनी ऑगस्ट 2018 मध्ये लंडनमधील एका हॉटेलमधून ताब्यात घेतले होते. आता त्याच्या प्रत्यार्पणाच्या खटल्यात त्याचा वकील दाऊद पाकिस्तानात असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करतो आणि पाकिस्तानी अधिकारी हे वास्तव नाकारतात, हा खोटारडेपणा जगापुढे उघड झाला आहे. दाऊद पाकिस्तानात असल्याचे वृत्त पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी अनेकदा नाकारले आहे. भारताने जेव्हा जेव्हा दाऊदच्या प्रत्यार्पणाचा मुद्दा उपस्थित केला, तेव्हा-तेव्हा दाऊद पाकिस्तानात नसल्याचे सांगण्यात आले. परंतु आता पाकिस्तान पूर्णपणे अडकला आहे.
प्रतिज्ञापत्राव्यतिरिक्त जाबिर मोतीसोबतचे छायाचित्रच हाती लागल्याने तो पाकिस्तानात आहे; शिवाय त्याची प्रकृतीही चांगली आहे, या दोन्ही गोष्टी समोर आल्या आहेत. कराचीतील क्लिफंटन हाउसच्या शेजारीच जाबिर मोती राहतो, याचे पक्के पुरावे गुप्तहेर संघटनांकडे आहेत. लंडनच्या न्यायालयात अमेरिकी अधिकाऱ्यांनी केलेल्या खुलाशानंतर जगासमोर पाकिस्तानचा मुखवटा फाटण्याच्या भीतीने पाकिस्तान ग्रासला आहे. ओसामा बिन लादेनच्या संदर्भातही पाकिस्तान नेहमी अमेरिका आणि संपूर्ण जगाशी वारंवार खोटेच बोलत आला; परंतु अमेरिकेने ओसामा पाकिस्तानातच आहे, हे शोधून काढले. एवढेच नव्हे तर पाकिस्तानच्या हद्दीत घुसून ओसामाचा खात्माही केला. आता दाऊद पाकिस्तानात असल्याचे स्वीकारावे लागल्यास पाकिस्तानची अडचण आणखी वाढणार आहे. त्यामुळेच पाकिस्तानकडून अजूनही वारंवार खोटे सांगितले जात आहे. परंतु आता भारत स्वस्थ बसणार नाही. भारतीय गुप्तचर संघटना अमेरिकेच्या “एफबीआय’ या गुप्तहेर संघटनेशी संपर्क ठेवून आहेत, असे वृत्त आहे.
पाकिस्तानची आयएसआय ही गुप्तचर संघटना दाऊदला सहकार्य करते आणि त्याच्या दहशतीच्या कारभारात सहभागीही आहे, याचे पुरावे भारताकडे आहेत. जाबिर मोती हा दाऊदचा खासम्खास असल्यामुळे त्याच्याकडे आणखीही बरीच माहिती असणार, यात शंका नाही. अमेरिकेच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ही माहिती भारताने हस्तगत केली तर दाऊद इब्राहिमच्या प्रकरणात भारत पाकिस्तानला घेरू शकतो, हे पाकिस्तानी अधिकाऱ्यांना चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळेच ताज्या घटनाक्रमाने अधिकाऱ्यांची बोबडी वळली असून, ते खोटी विधाने करीत आहेत. पाकने आतातरी आपला अप्रामाणिकपणाचा बुरखा काढून सत्य स्वीकारणे गरजेचे आहे. लादेन प्रकरणात त्यांची नाचक्की झालेलीच आहे. किमान आतातरी त्यांनी शहाणे व्हावे.