जीवनगाणे : ऐसी करनी कर चलो…

– अरुण गोखले

जेव्हा एखाद्या व्यक्‍तीच्या जाण्याने त्याच्या मागे अनेक जण हळहळतात, त्याच्या जाण्याने दु:खी कष्टी होतात तेव्हा त्या व्यक्‍तीच्या जगण्याचे खरे सार्थक झाले असे म्हणता येते. या संदर्भात कबिरांनी आपल्या एका दोह्यात असे सांगून ठेवले आहे की- जब हम पैदा हुए, जग हॅंसे हम रोये। ऐसी करनी कर चलो, हम हॅंसे जग रोये।।

माणूस हा जेव्हा जन्माला येतो, त्या वेळी त्याच्या भोवतालचे सारं जग हे टाळ्या वाजविते, आणि त्याच्या जन्मोत्सवाचा आनंद साजरा करीत असते. पण तो जीव मात्र आपली त्या सोहंशी जुळलेली नाळ कापली गेलीय, आपण त्या परम तत्त्वापासून वेगळे झालो आहोत. आता आपण सोहं नाहीतर कोहं? मी कोण? असं जगाला रडून विचारत असतो. पण जगाचं मात्र जीवाच्या रडण्याकडे लक्षच नसतं. जग त्याच्या जन्माचा आनंद साजरा करत असतं.

ते सत्य सांगून कबीर म्हणतात की, बाबारे! आज जरी हे जग तू रडत असताना हसत असले तरी तू मात्र मनाशी पक्‍का निश्‍चय कर की, या जगातून जाताना मी मात्र असे काही तरी करून जाईन की, त्यावेळी मी सुखा समाधानाने, एका कर्तव्यपूर्तीच्या आनंदाने हसत हसत जाईन आणि जग मात्र माझ्यासाठी रडेल, डोळ्यात पाणी आणेल.

जगाला एक वेळ काही खटपटी करून, क्‍लृप्त्या करून, माकड चेष्टा करून हसवणे सोपे आहे. पण आपल्यासाठी जगाच्या डोळ्यात पाणी आणायला लावणे हे काही साधे नाही. त्यासाठी काहीतरी असामान्य असे करावे लागते. आपल्या आचार, विचार व कृतींनी लोकांच्या मनात घर करावे लागते. त्यांची मने जिंकावी लागतात. त्यांच्या नजरेत भरेल असे अलौकिक कर्तृत्व करून दाखवावे लागते.

त्यासाठी आपल्याकडे एक वेगळी शक्‍ती असावी लागते. ती शक्‍ती आपल्या कर्तृत्वाची असेल, त्यागाची असेल, बलिदानाची असेल, किंवा माणुसकीच्या वर्तनशील दर्शनाची असेल. काहीतरी भव्य दिव्य केल्याशिवाय उगाच कोणाच्या डोळ्याला तुमच्या जाण्याने पाणी येत नाही, येणार नाही.

आपल्या जीवनात आपण जे काही (ज्ञान, धन, शक्‍ती) कमविले, ते हातचे न राखता दुसऱ्याला दिल्याचे, कोणाच्या उपयोगी पडल्याचे, कोणाला निरपेक्ष मदत केल्याचे, आपल्या संपर्कातल्या लोकांना सुखी समाधानी केल्याचे, सात्विक समाधान जर आपल्या गाठीशी असेल. तरच आपण हसत हसत आपले जीवन गाणे गात जाऊ आणि जग मात्र आपल्यासाठी रडेल.

आपण गेल्याने लोकांनी हसावे का रडावे हेही आपल्याच हातात असते. आपण आयुष्यभर केलेल्या चांगल्यावाईट कामांचा तो आपला दाखला असतो. हा दाखला आपल्या आजूबाजूच्याच लोकांनी दिलेला असतो. आपल्या आयुष्यातील पुण्यकर्माचा दाखला हा चांगला येण्यासाठी आपण चांगलेच कर्म करत राहणे आवश्‍यक आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.