चर्चेत : …तर अमेरिकेच्या नाड्या आवळता येतील!

-जयेश राणे

भारताच्या आयात वस्तूसंबंधी धोरणावर सतत आगपाखड करणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आकारत असलेल्या आयात शुल्काला पुन्हा एकदा कडाडून विरोध दर्शवला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी या प्रकरणी ट्‌विट केले आहे. डंका वाजवत, आगपाखड करत कोणतीही कृती करणे, जगाचे लक्ष आपल्याकडेच कसे राहील असे पाहणे अशा उतावीळ कृती करणारा देश म्हणजे अमेरिका होय.

अमेरिका या देशाचे भारतातील नागरिकांना प्रचंड आकर्षण आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना जे सांगायचे आहे, ते रितसर सांगू शकले असते; पण तसे न करता भारतावर दबाव निर्माण करण्यासाठी एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर ट्‌विट करणे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला शोभले नाही. यावरून त्या व्यक्तीचा त्या धोरणावरून किती तिळपापड झाला आहे, होत आहे, हे कळते. संयमी वृत्तीशी दुरान्वयेही संबंध नसलेल्या ट्रम्प यांनी आपला उतावीळपणा प्रकट करून अपरिपक्व व्यक्तिमत्वाचे जाहीर प्रदर्शन केले आहे. “उतावीळ नवरा आणि गुडघ्याला बाशिंग’ या पठडीतील हा प्रकार आहे.
स्वतःच्या देशाच्या फायद्यासाठी ही व्यक्ती कोणत्या थराला येऊ शकते, हे भारतीयांच्या नीट लक्षात आले आहे का?

भारतातील असंख्य लोक नोकरी, शिक्षण आदी गोष्टींच्या कारणास्तव अमेरिकेत तळ ठोकून आहेत. त्यांना भारत नाही तर अमेरिका हाच आता आपला देश वाटतो आणि अधिक पैसे मिळवण्याच्या हव्यासापोटी अमेरिका आणि अनेक विदेशांत चाकरी करण्यात धन्यता मानत आहेत. धन्यता तरी कोणत्या गोष्टीची मानावी? हे ही शिक्षण घेऊन लक्षात आलेले नाही. त्या देशात काही काळ घालवल्यानंतर भारतात परत येऊन हा देश घडवावा, येथील नागरिकांपर्यंत ज्ञानाची गंगा पोचवावी असे कितीजणांना वाटत असेल? अमेरिका किंवा ज्या देशात नोकरीच्या दृष्टीने संधी मिळाल्यावर येथून काढता पाय घेतला जातो. तोच पाय तेथील वातावरणात रुजल्यावर निघण्याचे नावच घेत नाही. भारतात येऊन स्वबळावर येथील नागरिकांना प्रशिक्षित करण्याचा चंग बांधला असता, तर एव्हाना अमेरिकेत भारतीयांची संख्या कमी झाली असती.

आमच्या ज्ञानाला येथे महत्त्व नाही, आम्हाला येथे वाव (स्कोप) नाही आदी कारणेही अमेरिका, अन्य विदेशी देशांत जाताना सांगितली जातात. असे आहे तर भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो. येथे केवळ आणि केवळ देशासाठी सेवारत असणाऱ्या मंडळींविषयी काय बोलावे? अर्थातच देशासाठी सेवारत असणाऱ्या अशा नागरिकांचा अभिमान आहे. यांच्या बळावर आज हा देश अंतराळातील विविध टप्पे यशस्वीपणे पादाक्रांत करत आहे आणि भविष्यातही करणार आहे, यात दुमत नाही.

प्रगत देशांत अनेक गोष्टी सहज उपलब्ध असतात. त्यांना स्वतःचा देश अधिक प्रगत बनवणाऱ्या मनुष्यबळाची आवश्‍यकता असते. ज्या ठिकाणी नोकरीसाठी आवश्‍यक असणारे सर्व घटक तयार आहेत, त्या ठिकाणी जाऊन अंगभूत कौशल्य प्रकट करायचे असते. अशा देशात जाऊन चाकरी करण्यात विशेष ते काय? भारतातून अनेकजण अमेरिका, युरोपीय देश, आखाती देश आदी देशांत नोकरीसाठी गेल्याची अनकेदा ऐकले आहे, तसेच अनेकजण ऐकतही असतात. पण येथून कधी चीनमध्ये नोकरीसाठी गेल्याचे कधी ऐकले आहे का? मी तरी ऐकलेले नाही. याचे कारणच असे आहे की, त्या देशाने म्हणजेच तेथील नागरिकांनी स्वबळावर

स्वतःच्या देशाची भक्कमपणे निर्मिती केली आहे. चीन हा लोकसंख्येच्या दृष्टीने भारतापेक्षाही पुढे आहे. यांसह तो अनेक गोष्टींत पुढे आहे. किंबहुना त्याने जगात विविध इलेक्‍ट्रोनिक्‍स वस्तूंचा पुरवठा करून जगावरही स्वतःचे एक निराळे वर्चस्व तयार केले आहे. भारत आणि चीन ही दोन शेजारी राष्ट्रे आहेत. मात्र दोघांत भेद कोणत्या स्तरावर आहे, हे आतातरी कळले का?

दुसरे सूत्र असे की, भारतात अनेक बहुराष्ट्रीय आस्थापने (एमएनसी) आहेत. यातील अधिकांश अमेरिका, युरोपीय आदी देशांशी संबंधित आहेत. या आस्थापनांमुळे येथील मनुष्यबळास नोकरी मिळत आहे. देश हाच, मनुष्यबळ ही येथील केवळ आस्थापन विदेशी. 135 कोटींहून अधिक लोकसंख्या असलेला हा देश आहे आणि या देशात विदेशातील आस्थापने आपल्याला नोकरी उपलब्ध करवून देतात. स्वबळावर उभे राहणारी बहुतांश भारतीय आस्थापने उभी राहणे अत्यावश्‍यक आहे.

जो देश भारताला कायम स्वतःच्या मुठीत ठेवू पाहत आहे, आपले वर्चस्व गाजवण्याचा आटापिटा करत आहे. त्या अमेरिकेसारख्या देशाचे आपल्या भारतीय नागरिकांना कौतुक का वाटावे? 135 कोटींहून अधिक लोकसंख्या असलेल्या या देशातील हुशार मंडळींनी ठरवले तरी अमेरिकेसारख्या मुजोर देशाच्या नाड्या आवळता येतील. पैसे पैसे करत बसणाऱ्या मंडळींना भारत आठवत नाही. म्हणून अधिकांशजण अमेरिकेत आहेत. जेथे संघर्ष करून एखादी गोष्ट नव्याने घडवायची असते, तेव्हा खरी कसोटी असते. ती खरी कसोटी तर भारतात आहे. तीच संधी भारतीयांना घेता येऊ नये. यासाठी पैशाचे गाजर दाखवून येथील मनुष्यबळ स्वतःच्या देशाच्या प्रगतीसाठी वापरले गेले आहे. भारतीय कधी जागे होणार?

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.