संडे स्पेशल – मेघदूत : विरहाचा संदेश

-अशोक सुतार

आषाढ महिन्यात आठवण येते ती महाकवी कालिदास यांची. कालिदास हे काव्यशास्त्राचे मापदंड होते. आषाढ महिन्याचा पहिला दिवस म्हणजे आषाढ शुद्ध प्रतिपदा होय. ही तिथी “कालिदास दिन’ म्हणून सर्वत्र साजरी होते.

कालिदासाने लिहिलेले मेघदूत हे खंडकाव्य वाचून जर्मन कवी गटे आनंदाने नाचला होता. मेघदूतमध्ये कालिदासाच्या अत्युच्च प्रतिभेचा विलास आहे. पत्नीच्या वियोगाने व्याकूळ झालेल्या यक्षाने आपल्या प्रिय पत्नीला मेघाबरोबर पाठवलेला संदेश कालिदासांनी काव्यबद्ध केला आहे. मेघासोबत प्रियेला संदेश पाठवणे ही कल्पना उच्चकोटीच्या प्रतिभावंतांचीच असू शकते.

कुबेराच्या दरबारी असलेल्या यक्षाकडून एक दिवस सेवेत कसूर होते. यावर कुबेर संतापला आणि त्याने यक्षाला एक वर्ष अलकानगरीतून हद्दपार होण्याचा आदेश दिला. यक्षाला दुःख झाले. तो अलकानगरीतून रामगिरी पर्वतावर आला. खूप दिवस लोटले, प्रिय पत्नीचा विरह यक्षाला सहन करणे कठीण होते. आषाढ महिना सुरू झाला होता. आभाळात मेघांची दाटी झाली होती. रामगिरी पर्वतावर मेघ अवतरले होते.

आषाढ महिन्याच्या पहिल्या दिवशी दिसलेल्या मेघाला यक्षाने आपली ही व्यथा कथन केली. ज्याप्रमाणे सीतेला निरोप देण्यासाठी प्रभू रामचंद्रांनी हनुमंताला दूत म्हणून धाडले होते. त्याचप्रमाणे मेघाला दूत म्हणून धाडण्याचे यक्षाच्या मनी आले. अलकानगरीत असलेल्या आपल्या प्रिय पत्नीला यक्षाने जो संदेश पाठवला, तो कालिदास यांनी काव्यबद्ध केला. मेघदूताची रचना पूर्व मेघ आणि उत्तर मेघ अशी करण्यात आली.

कालिदास यांच्या काव्याचे वैशिष्ट्य म्हणजे निसर्ग आणि मानव यांचे अतूट संबंध, त्यातील भावनिक बंध आणि कल्पनाशक्‍तीचे उत्कट सौंदर्य होय. निसर्ग, पशुपक्षी यांच्याशी मानवी भावभावनांचे असलेले उत्कट नाते कालिदासांनी उलगडून दाखवले. मेघदूताचे वैशिष्ट्य म्हणजे हे काव्य शृंगाररसात मांडले आहे. त्याचमुळे कालिदासांची प्रत्येक रचना मानवी मनाचा वेध घेते.

आषाढ महिन्यातील पडणारा पाऊस, ढगांनी गच्च भरलेले आभाळ आणि प्रेमिकांना लागलेली भेटण्याची ओढ तसेच मानवी भावभावनांचा निसर्गाशी असलेला अतूट संबंध शब्दबद्ध करण्याची अद्‌भुत शैली हे कालिदासांच्या काव्याचे आणखी वैशिष्ट्य. कुबेराने यक्षाला हद्दपार केल्यानंतर तो रामगिरी पर्वतावर आला. आषाढ महिना सुरू झाला, प्रियेचा वियोग देणाऱ्या वर्षा ऋतूला सुरुवात झाली. त्या मेघाला पाहताच यक्षाच्या विरहाच्या भावना उचंबळून आल्या.

रामगिरी पर्वताच्या निर्जल प्रदेशात यक्ष चेतन-अचेतन यांतील भान विसरला. रामगिरी पर्वताच्या क्षितिजावर टेकलेल्या मेघाकडे पाहून यक्षाने त्याला विनंती केली की हे मेघा, रामगिरीपासून अलकानगरीला जा आणि माझ्या प्रियेला सुखरूप असल्याचे सांग. माझ्या डोळ्यांतील विरहाचे मेघ मी तसेच रोखून धरले आहेत.

माझ्या मनातील व्याकूळ भावना माझ्या प्रियतमेला पोहोचव. त्यावेळी यक्षाच्या डोळ्यात विरहाचे मेघ निर्माण झाले होते, यक्ष मेघमय झाला होता. यक्षाने मेघाजवळ प्रियेला निरोप देताना मेघाने आपल्या रौद्र रूपाने लोकांना न घाबरवता ममत्वाने अलकानगरीत जाऊन आपला निरोप द्यावा, अशी प्रार्थना केली.

आषाढ महिन्यातील निसर्ग स्थितीवर महाकवी कालिदास यांनी रूपक अलंकार व कवितेतील सौंदर्याविष्कार वापरून हे महाकाव्य रचले. या काव्याचे सौंदर्य आजही भुरळ घालते.

Leave A Reply

Your email address will not be published.