कानोसा : निसर्गाशी हवे नैसर्गिक नाते!

-श्रीकांत देवळे

जलवायू आणि पर्यावरण या विषयांबाबत शाळकरी मुलांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी सरकारकडून प्राथमिक शिक्षणात एक नवा अभ्यासक्रम समाविष्ट करण्यात येईल, असे केंद्रीय पर्यावरण, वने आणि जलवायू खात्याचे मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे. या अभ्यासक्रमांतर्गत शाळकरी मुले वनविभागाच्या सहकार्याने रोपे लावण्याचे आणि त्यांची देखभाल करण्याचे प्रशिक्षण घेतील. काही आठवड्यांपूर्वीपर्यंत प्रकाश जावडेकर हे मागील सरकारमध्ये मनुष्यबळ विकास खात्याचे मंत्री होते. त्यामुळे जे ते आता सांगत आहेत, तसाच एखादा उपक्रम शिक्षण खात्याकडेही असण्याची शक्‍यता आहे. ही शक्‍यता नजरेआड केली तरी प्रथमदर्शनी ही सूचना खूपच चांगली वाटते.

अर्थात, हा उपक्रम सर्वत्र लागू करता येईल का, याविषयी शंका जरूर येते. विशेषतः महानगरांमध्ये मुले तीन-चारमजली इमारतीत असलेल्या शाळेत शिकतात. या शाळांमध्ये मुलांना खेळण्यासाठीही जागा नसते. अर्थात, निसर्ग आणि पर्यावरण हे विषय समजून घेण्याची गरज याच मुलांना सर्वाधिक आहे.

मागील पिढीतील बहुतांश लोक गावांत किंवा ग्रामीण पार्श्‍वभूमी असलेल्या शाळांमध्ये शिकून मोठे झाले. या शाळांच्या इमारती फारशा चांगल्या नसत. अनेकदा तर वर्गांमध्ये चांगली फरशीही नसे. काही ठिकाणी तर खुल्या वातावरणात वर्ग भरत असत. परंतु अशा काही गोष्टी त्या वेळी होत्या, ज्या आज दुरापास्त बनल्या आहेत. शाळेत मोठी मैदाने असत आणि त्यात वेगवेगळे वाफे तयार केले जात. मुलांना हे वाफे वाटून दिले जात असत. हंगामानुसार वेगवेगळ्या फुलझाडांबरोबरच पालेभाज्या, काकडी, टरबूज, भेंडी, वांगी, भोपळा, कोबी, दुधी भोपळा, मेथी, पालक, कोथिंबीर, बटाटा आदीं बियांचे रोपण केले जात असे. रोपणापूर्वी वाफ्याची मशागत कशी करायची, ओलावा किती असला पाहिजे, बिया पेरल्यानंतर जे अंकुर फुटतील त्यांचे पक्ष्यांपासून रक्षण कसे करायचे, हे मुलांना सांगितले जात असे.

वाफ्यांची मशागत वेळोवेळी करावी लागत असे. खुरपणी करावी लागत असे. आजूबाजूचे गवत काढावे लागत असे. कोणत्या वाफ्यात अधिक रोपे आणि वेली आल्या आहेत, कोणत्या वाफ्यात अधिक फुले आणि भाज्या पिकल्या आहेत, याची मुलामुलांमध्ये स्पर्धा लागत असे. यामुळे शेतीसंबंधी अनेक बाबी मुलांना समजत होत्या. उदाहरणार्थ, पालेभाज्यांना प्रमाणापेक्षा अधिक पाणी दिल्यास त्या कुजून जातात. फळे कच्ची आहेत असे दिसल्यास त्यांना स्पर्श करू नये; कारण त्यामुळे त्यांची वाढ खुंटते. कोणत्या हंगामात कोणती पिके येतात, कोणत्या पिकांचे बियाणे कसे दिसते, कोणते बियाणे वाफ्यात पेरावे लागते आणि कोणत्या बियाण्यासाठी सरी काढाव्या लागतात, अशी शेतीशी संबंधित सर्व माहिती मुलांना मिळत असे.

शिक्षणाबरोबरच निसर्गाशीही मुलांचे नाते सांधले जात होते. याच गोष्टी शिकविण्यासाठी आज वनविभागाची मदत घेण्याचे ठरविले जात आहे; परंतु त्या काळात त्याचीही आवश्‍यकता नव्हती. आता शाळांमधून अशा गोष्टी होऊ लागल्या तर काहीजण त्याला बालमजुरी म्हणण्यासही मागेपुढे पाहणार नाहीत.

परंतु वास्तव असे की, या गोष्टी आजही जर मुलांना शिकवल्या गेल्या, तर ते फायदेशीर तर ठरेलच; शिवाय नव्या पिढीचे निसर्गाशी नाते सांधले जाण्याच्या दृष्टीनेही ते हितकारक ठरेल. परंतु याच गोष्टी जर अभ्यासक्रमात समाविष्ट केल्या गेल्या, तर त्याचा अपेक्षित फायदा होईलच असे नाही. अशा स्थितीत कदाचित हा सगळा मामला केवळ दहा-वीस गुणांसाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षेचा भाग बनून जाईल. घोकंपट्टी करून कसेबसे हे गुण मिळविण्याचा प्रयत्न मुले करू लागतील. मुलांना केवळ गुण नव्हे, तर व्यावहारिक ज्ञान मिळण्याची गरज आहे. ज्या गोष्टी पूर्वी घडत होत्या, त्याच आताही घडायला हव्यात.

Leave A Reply

Your email address will not be published.