कलंदर : संगत…

-उत्तम पिंगळे

(स्थळ निष्पर्ण अशा वृक्षावर चातक पक्षी मनोभावे इंद्र देवाची प्रार्थना करीत आहे)
चातक : हे देवराज, आता पाण्यावाचून जीव अगदी तडफडून गेला आहे. काहीतरी करावे.(तेवढ्यात इंद्रदेवाची आकाशवाणी होते)

इंद्रदेव : हे चातका, तू पाण्यावाचून कासावीस झाला आहेस हे मला समजले आहे; पण केवळ या प्रार्थनेने मी वरुणराजास पृथ्वीवर जाण्याची आज्ञा देऊ शकत नाही.
चातक : देवराज आपणास ठाऊक आहे…

एक एव खगो मानी चिरंजीवतु चातकम्‌ ।
म्रियते वा पिपासार्तो याचते वा पुरंदरम्‌ ।।

कवी म्हणतो की, एकमेव असा मानी पक्षी तो चातक जो चिरंजीव राहो. एकवेळ तहानेने व्याकूळ होऊन तो मरून जाईल, पण पाणी फक्‍त इंद्र देवाकडेच मागेल.

इंद्रदेव : हे चातका, मला चांगलेच ठाऊक आहे. पण माझेदेखील हात बांधलेले आहेत.
चातक : हे देवराज, आपलेच हात बांधले असतील तर मग आम्ही काय करावे? कुणापाशी दाद मागावी?
इंद्रदेव : तसे नाही, निसर्गनिर्मितीचे काही नियम होते व त्यांचे पालन पृथ्वीतलावरील सर्वांनीच करणे अपेक्षित होते. मानवजात तसे करत नसल्यामुळे हा प्रसंग निर्माण झाला आहे. उलट मला ते सुभाषित आठवते की उगाचच तुम्ही सतत ढगांकडे पाणी मागत असता.

रे रे चातक सावधान मनसा मित्र क्षणं श्रूयताम्‌ । अम्बोदा बहवो वसन्ति गगने सर्वेऽपि नैतादृशाः
केचिद्‌ वृष्टिभिरार्द्रयन्ति धरणीं गर्जन्ति केचिद्‌ वृथा । यं यं पश्‍यसि तस्य तस्य पुरतो मा ब्रुहि दीनं वचः

तो कवी म्हणतो की, हे चातक मित्रा क्षणभर थांब आणि मी काय म्हणतो ते नीट ऐक. हे जे खूप ढग दिसत आहेत ते सर्व दिसतात तसे नसतात. त्यातील काहीच फक्‍त वसुंधरेवर पाण्याचा वर्षाव करतात, काही तर फक्‍त आवाज करून जातात.तू मात्र अगदी विनवणीचा चेहरा करून प्रत्येक ढगाकडे पाण्याची याचना करत असतोस. त्याचा काही फायदा होणार नाही. पृथ्वीतलावरील मानवजातीने आता निसर्गाचा ऱ्हास चालवला आहे. हवा, पाणी, जमीन यांचे प्रदूषण, जंगलांचा ऱ्हास यांची दखल मला घ्यावी लागते.

चातक : अरे बापरे! मग पुढे काय?
इंद्रदेव : मानवाला वेळोवेळी इशारा देण्याकरता मला मग नैसर्गिक आपत्ती निर्माण करावी लागते. मग मी वनदेवी, वायुदेव, समुद्रदेव व वरुणराज यांना तसे करण्याचे आदेश देतो. मग वणवा, वादळ, त्सुनामी, भूकंप, पूर व अवर्षण अशी अनेक आयुधे हे देवगण वापरतात. यातून मानव सुधारावा हीच अपेक्षा असते; पण तसे होत असताना दिसत नाही. म्हणून आपल्या प्रदेशात अवर्षणाचे अस्त्र वरुणराजाने काढले आहे.

चातक : पण, याचा आम्हाला का त्रास?
इंद्रदेव : सध्या मानव असंग आहे व त्यांच्याशी तुमचा संग आहे. या असंगाशी संग मग हे होणारच. हे ही सुभाषित लक्षात ठेव…

अहो दुर्जनसंसर्गात्‌ मानहानि: पदे पदे। पावको लोहसंगेन मुद्गरैरभिताड्यते ।

जेव्हा आपला दुर्जनाशी संबंध येतो तेव्हा आपली मानहानी होते. लोहार लोखंड तापवतो तेव्हा ते लाल होते. म्हणजे अग्नी त्यात जातो मग घणाचे घाव ज्यावेळी लोखंडावर घातले जातात त्या वेळी ते अग्नी वरही पडतात कारण अग्नीचा संबंध लोखंडाशी आला. येथे तुमचा संबंध मानवाशी अपरिहार्यपणे येतो आहे. त्यामुळे मानव सुधारला तरच ठीक आहे, नाही तर असेच होणार.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)