सोक्षमोक्ष : चेहऱ्याअभावी कॉंग्रेसचा मुखभंग अटळ !

-राहुल गोखले

लोकसभा निवडणुकीचे निकाल लागून महिनाभर उलटून गेला आहे आणि आता लोकसभेचे पहिले अधिवेशन देखील सुरू झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत कॉंग्रेसवर टीकास्त्र सोडत आहेत आणि दुसरीकडे राहुल गांधी मात्र कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी कायम राहणार नसल्याच्या मुद्द्यावर ठाम आहेत. एका अर्थाने कॉंग्रेसला सध्या अध्यक्ष आहेही आणि नाहीही. आहे तो या कारणाने की दुसरा अध्यक्ष अद्यापि नेमलेला नाही आणि नाही या अर्थाने की अध्यक्षपदी असलेले राहुल कार्यरत नाहीत.

लोकसभेत कॉंग्रेसचे नेतृत्व राहुल गांधी यांनी करावयास हवे होते; परंतु त्यांनी ते स्वीकारले नाही आणि कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी न राहण्याचा आपला निर्णय कायम असल्याचे ते वारंवार सांगत आहेत. अन्य विरोधी पक्ष आधीच पराभवाच्या धक्‍क्‍यातून सावरलेले नसताना आणि विस्कळीत झालेले असताना वास्तविक जुना आणि राष्ट्रीय पक्ष म्हणून उमेद धरून भाजपवर वचक ठेवण्याचे कार्य कॉंग्रेसने स्वतःच्या खांद्यावर घ्यावयास हवे होते. तथापि खुद्द कॉंग्रेसच अद्यापी पराभवाच्या धक्‍क्‍यातून बाहेर पडला आहे की नाही अशी शंका यावी अशी परिस्थिती आहे.

लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर आणि खुद्द राहुल गांधी यांच्या अमेठीत झालेल्या पराभवानंतर कॉंग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली होती. राहुल गांधी यांनी कॉंग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली आणि महाराष्ट्रासह अनेक राज्यांतील प्रदेशाध्यक्षांनी देखील पदत्याग करण्याची घोषणा केली. पराभव जिव्हारी लागावा असाच झाला तरीही खरा नेता न डगमगता नेतृत्व करतो आणि अनुयायांची उमेद कायम ठेवतो. नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा देणे हाही आक्षेप घेता यावा असा भाग नाही. परंतु कोणत्याही परिस्थितीत पराभवाचे रूपांतर खच्चीकरणात न होता निर्धारित होणे आवश्‍यक असते. कॉंग्रेसचा हा काही पहिला पराभव नव्हे.

इंदिरा गांधी यांच्या काळात कॉंग्रेस पराभूत झाली होती, राजीव गांधी यांच्या काळात कॉंग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागले होते आणि सोनिया यांनीही पराभव पाहिलेला आहे. कोणत्याही राजकीय पक्षाला विजय आणि पराजय यांतून जावेच लागते आणि नेतृत्वाचा कस अशाच वेळी लागत असतो. राहुल गांधी गेल्या निवडणुकीच्या वेळी कॉंग्रेसचे अध्यक्ष नव्हते आणि यावेळी ते अध्यक्ष होते. वास्तविक अध्यक्ष म्हणून त्यांचा हा पहिलाच पराभव आहे. त्यामुळे नाउमेद होण्याचे कारण नाही. वास्तविक पराभव स्वीकारताना राहुल गांधी यांनी दिलदारपणा दाखविला होता आणि नंतर संसदेत आपले पन्नासेक खासदार असले तरीही ते भाजपला सळो की पळो करून सोडतील, अशी वल्गना देखील केली होती. तेव्हा पराभवातून खचून न जाता राहुल गांधी कॉंग्रेस संघटनेला उभारी देत आहेत असे चित्र निर्माण झाले होते.

तथापि केवळ घोषणांनी तत्कालिक चैतन्य निर्माण झाले तरीही त्याचे रूपांतर दीर्घकालीन भावनेत करायचे तर नेतृत्वावर ती भिस्त असते. राहुल गांधी यांनी घोषणा केल्या खऱ्या; पण त्यांनी ना संसदेत कॉंग्रेसचे नेतृत्व स्वीकारले ना पक्षाचे अध्यक्षपद त्यांना हवे आहे. कॉंग्रेसला मोठ्या बदलांची गरज आहे हे खरेच; केवळ बुजुर्गांच्या बळावर कॉंग्रेस मार्गक्रमण करू शकणार नाही; पण म्हणून केवळ नवथरांच्या खांद्यावर सर्व जबाबदारी टाकून मोकळेही होता येणार नाही. कॉंग्रेसवर घराणेशाहीचा आरोप होतो आणि तो खोटा नाही. मात्र, या घडीला तरी राहुल गांधी सोडून कॉंग्रेसला सर्व गटांना एकत्र ठेवू शकेल असे नेतृत्व आहे का हा खरा प्रश्‍न आहे.

तेव्हा अशा तळ्यात-मळ्यात पद्धतीने कॉंग्रेसला ना उभारी धरता येईल ना भाजपच्या आव्हानासमोर टिकाव धरता येईल. राहुल गांधी यांना त्यामुळेच ठोस निर्णय घ्यावा लागेल. एक तर त्यांना अध्यक्षपदावरून पूर्ण बाजूला होऊन नवा अध्यक्ष नेमावा लागेल किंवा आपल्याला साहाय्य म्हणून कार्यकारी अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष नेमावे लागतील. ज्या पक्षाच्या नेतृत्वपदाचा प्रश्‍न लटकत राहतो त्या पक्षाचे भवितव्य फारसे उज्ज्वल नसणार हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही. भाजपने कार्यकारी अध्यक्षपदी नड्डा यांची नेमणूक केली. खरे तर अजिंक्‍य पक्षाला सगळे काही क्षम्य असते असे म्हणतात. तरीही दिरंगाई न करता भाजपने कृती केली; आणि ज्या पक्षाला वेगाने हालचाली करणे आवश्‍यक आहे तो पक्ष मात्र अद्यापि अंधारात चाचपडत आहे. वेगवगळ्या राज्यातील प्रदेशाध्यक्षपदांविषयी निर्णय देखील असेच अनिर्णित अवस्थेत ठेवण्यात आलेले आहेत. तेव्हा राजीनाम्याची घोषणा करायची आणि पुन्हा त्याच पदावर राहायचे हा प्रकार कॉंग्रेसमध्ये केंद्रापासून राज्यांपर्यंत सर्वत्र दिसतो आहे.

येत्या काही महिन्यांत काही राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत आणि भाजप त्यांच्या तयारीला लागला आहे. कॉंग्रेस मात्र कोणत्या मुहुर्ताची प्रतीक्षा करीत आहे हे कळणे मुश्‍कील आहे. लोकसभेच्या वेळी झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी संधी म्हणून विधानसभा निवडणुकांकडे कॉंग्रेसने पाहावयास हवे. त्याची सुरुवात विश्‍वासार्ह नेतृत्वापासून झाली पाहिजे. पण धडाडीच्या आणि मेहनती नेत्यांना, कार्यकर्त्यांना योग्य वेळी संधी मिळाली नाही तर पक्षात पुन्हा मरगळ येते आणि त्याच नामुष्कीची पुनरावृत्ती होते. कॉंग्रेसने राहुल गांधी यांच्या अध्यक्षपदापासून अशोक चव्हाण यांच्या प्रदेशध्यक्षपदापर्यंतचे प्रश्‍न अनिश्‍चित आणि अनिर्णित ठेवले तर कॉंग्रेसला आणखी नामुष्कीजनक पराभवाला सामोरे जावे लागेल यात शंका नाही.

अशा परिस्थितीत आता राहुल गांधी यांनी आपल्याला अध्यक्षपदावर राहायचे आहे की नाही याचा सोक्षमोक्ष लावणे गरजेचे आहे. आपली तयारी नाही असे त्यांना वाटत असेल तर त्यांनी रीतसर अध्यक्षपदावरून बाजूला झाले पाहिजे. अन्यथा तो सगळा प्रकार एकीकडे हास्यास्पद आणि दुसरीकडे पक्षासाठी चिंताजनक होईल. कॉंग्रेसमध्ये ज्योतिरादित्य शिंदे, सचिन पायलट यांच्यापासून अनेक तरुण नेते आहेत. त्यांना कार्यकारी अध्यक्ष नेमण्याचा पर्याय देखील कॉंग्रेसकडे आहे. राज्या-राज्यांत कॉंग्रेसकडे निष्ठावान अद्यापि आहेत. पण त्यांना नेतेपद मिळत नाही आणि मग खुज्यांना नेतृत्व मिळाले की दरबारी राजकारण सुरू होते. भाजपमध्ये मोदी आणि अमित शहा यांचे वर्चस्व आहे हे सर्वश्रुत आहे. मात्र, त्या पक्षात कोणत्याही राज्यात उघड नाराजी किंवा गटबाजी नाही नि याचे एक कारण पक्षावर या दोघांची असणारी घट्ट पकड हेही आहे.

कॉंग्रेसकडे ना शिस्त राहिली आहे ना कोणाचे वर्चस्व. तेव्हा कॉंग्रेसची वाटचाल खडतर आहे यात तीळमात्र शंका नाही आणि त्यामुळेच त्वरित निर्णय घेण्यावाचून त्या पक्षासमोर गत्यंतर देखील नाही. निर्णायकी अवस्थेत पक्ष फार काळ राहू शकत नाही आणि एकदा ती स्थिती निर्माण झाली की पक्षात आणखी गटबाजी आणि दुसरीकडे पक्षाला सोडून जाणाऱ्यांची वाढती संख्या याने पक्ष ग्रासला जाईल. आधीच सलग दोन लोकसभा निवडणुकांत कॉंग्रेसचा मुखभंग झाला आहे. मात्र, पक्षाचा चेहरा कोण हेच ठरत नसेल तर अशा मुखभंगांपासून पक्षाला कोणीही वाचवू शकणार नाही याचे स्मरण कॉंग्रेसच्या मुखंडांनी ठेवणे आवश्‍यक आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.