विविधा : आर. डी. बर्मन

-माधव विद्वांस

तरुणाईचे आवडते संगीतकार, गायक राहुल देव बर्मन (पंचमदा) यांची आज जयंती. त्यांचा जन्म कोलकाता येथे 27 जून 1939 रोजी झाला. सुप्रसिद्ध संगीतकार सचिन देव बर्मन हे त्यांचे पिताश्री होते. वडील आणि मुलगा दोघेही जगातील सर्वोत्तम संगीतकारामध्ये गणले जातात.

असे म्हटले जाते की जेव्हा ते बालपणी रडत होते त्यावेळी अशोककुमार यांनी त्यांचे रडणे ऐकले व ते म्हणले, हा पंचम मध्ये रडत आहे. तेव्हापासून त्यांचे नाव पंचम असेही पडले. त्यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण कोलकाता येथील बालीगंज सरकारी हायस्कूलमधून घेतले. नंतर उस्ताद अली अकबर खान यांचेकडे सरोद शिकले. फक्‍त नऊ वर्षांच्या वयात त्यांनी “आई मेरी हैती पलट की’ या गाण्यासाठी पहिले संगीत दिले.

आर. डी. बर्मन यांनी 1959 मध्ये गुरूदत्त यांच्या “राज’ सिनेमासाठी दोन गाणी रेकॉर्ड केली. आशा भोसले आणि गीता दत्त यांनी पहिले गाणे गायले तर शमशाद बेगम यांनी दुसरे गाणे गायले. त्यांची वर्ष 1966 मधील विजय आनंद यांच्या “तिसरी मंजिल’मधील गाणी सुपरहिट झाली. आशा भोसले, मोहम्मद रफी यांनी गायलेल्या आजा आजा मैं हूँ प्यार तेरा, देखिये साहिबों वो कोई और थी, दीवाना मुझसा नहीं, इस अम्बर के नीचे, ओ हसीना जुल्फोवाली जाने जहॉं, ओ मेरे सोना रे सोना रे ही गाणी लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली होती.

तिसरी मंझिल चित्रपटाचे गीतकार मजरुह सुलतानपुरी यांनी निर्माते आणि लेखक नासीर हुसेन यांना पंचमदांची शिफारस केली होती. विजय आनंद यांनी नासीर हुसेन समोर बर्मनसाठी एक संगीत सत्र आयोजित केले होते. “बहार के सपने; प्यार का मौसम आणि यादोंकी की बारात यांसह सहा चित्रपटांसाठी नासीर हुसेन यांनी बर्मन आणि गीतकार मजरुह सुलतानपुरी यांच्याबरोबर करार केले. त्यांची गाणी प्रेक्षकांनी व श्रोत्यांनी डोक्‍यावर घेतली. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही.

वर्ष 1970 उजाडले आणि सिनेसृष्टीत संगीताने वेगळाच आकार घेतला. आर. डी. बर्मन यांनी “हरे रामा हरे कृष्णा’ या चित्रपटासाठी आनंद बक्षी यांनी लिहिलेल्या गीतांना संगीत दिले. या चित्रपटातील दम मारो दम, हरे रामा हरे कृष्णा, फुलों का तारों का, राम का नाम बदनाम ना करो, कॉंची रे कॉंची ही गाणी सुपरहिट झाली.

राहुल देव बर्मन यांचा पहिला विवाह रिटा पटेल यांच्याबरोबर झाला होता. रिटा त्यांची फॅन होती. तिने मित्राबरोबर पंचमदाबरोबर डेटवर जाण्याची पैज लावली होती व त्याप्रमाणे दार्जिलिंग येथे चित्रीकरणासाठी आलेल्या पंचमदांना घेऊन ती डेटवर गेलीसुद्धा. 1966 मध्ये दोघांचा विवाह झाला, पण तो जास्त टिकला नाही. 1971 मध्ये ते विभक्‍त झाले. त्यानंतर आशा भोसले यांच्याबरोबर विवाह झाला. त्यांना फिल्मफेअर पुरस्कार तीन वेळा मिळाला. अशा हरहुन्नरी संगीतकाराने 4 जानेवारी 1994 रोजी अखेरचा श्‍वास घेतला.

Leave A Reply

Your email address will not be published.