विज्ञानविश्‍व : सौरऊर्जेबाबत भारताचे लक्ष्य आशादायी…

-मेघश्री दळवी

पॅरिस करारानुसार तापमानातील वाढ दीड ते दोन अंश सेल्सिअसच्या वर जाऊ नये यासाठी आवश्‍यक ते उपाय योजण्याचं बंधन अनेक राष्ट्रांनी आपणहून घालून घेतलं आहे. अलीकडे नोव्हेंबर 2018 मध्ये इंटरगव्हर्नमेंटल पॅनल फॉर क्‍लायमेट चेंज या संस्थेने पुन्हा पाहणी करून ही वाढ दीड अंशपर्यंत रोखण्याचे आवाहन केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यासाठी सौरऊर्जेसारख्या नैसर्गिक पर्यायांना प्राधान्य देणं आवश्‍यक आहे. आपल्याला भारतात भरपूर सूर्यप्रकाश मिळतो. तोही बहुतांशी वर्षाचे बारा महिने. त्यामुळे भारतात सौर ऊर्जा हा खूप चांगला पर्यायी ऊर्जास्रोत होऊ शकतो. ऊर्जा साठवून ठेवण्याची सौर घटांची क्षमता वाढते आहे. तसेच सौर पॅनेल्सची कार्यक्षमता वाढते आहे आणि किमती घटत आहेत. त्यामुळे सुमारे दहा वर्षांपूर्वी सौर पॅनेल्स चोरीला जाण्याच्या घटना व्हायच्या त्याही कमी झाल्या आहेत.

शिवाय अनेक प्रकारे सौरऊर्जा वापराला प्रोत्साहन सरकार देत असतं. या सगळ्याचा परिणाम म्हणून आपल्याकडे सौर ऊर्जा वापर वाढतो आहे. ही अर्थातच खूप आशादायी बाब आहे. मागच्या वर्षी नवीन प्रकल्पांमधून 10 गिगावॅट क्षमता वाढली आहे. त्यात यावर्षी अंदाजे 14 गिगावॅट क्षमतेच्या प्रकल्पांची भर पडेल आणि 2019 अखेरीपर्यंत आपण एकूण 38 गिगावॅटपर्यंत जाऊ. तुलना करायची झालीच तर आज आपण साधारण 20 गिगावॅट शक्‍ती अणुप्रकल्पांमधून मिळवतो आहोत.

आपल्या सौरऊर्जेच्या वापरात सिंहाचा वाटा आहे तो सौर फार्म्सचा. कर्नाटकमधील “कुर्नूल सोलर पार्क’ हे जगातलं पहिल्या क्रमांकाचं सौर ऊर्जा निर्मिती केंद्र आहे. दुसरा क्रमांक लागतो तो तामिळनाडूमधल्या कामुदी प्रकल्पाचा. राजस्थान-गुजरात इथल्या कडक उन्हाचा फायदा तिथले सोलर फार्म्स करून घेत आहेत. तर महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यात साक्री इथे असलेला सौर प्रकल्प वर्षाला दीडशे मेगावॅट शक्‍ती पुरवत आहे. येत्या 2027 पर्यंत एकूण विद्युतनिर्मितीच्या 60 टक्के विद्युतनिर्मिती अपारंपरिक पद्धतीने व्हावी असं भारताचं धोरण आहे.

तर 2022 पर्यंत 100 गिगावॅट सौरशक्‍ती इतकं प्रचंड लक्ष्य आपण ठेवलेलं आहे. पवनचक्‍के किंवा सागरी लाटांपसून ऊर्जा मिळवणे हे सर्व ठिकाणी शक्‍य नसतं. तसंच त्यांच्यासारखे इतर पर्याय पाहिले तर ते वैयक्‍तिक पातळीवर राबवणे कठीण असतं. उलट सौर ऊर्जा लहानमोठा अक्षरश: कोणत्याही प्रमाणात मिळवून वापरता येते. सौर ऊर्जा स्वच्छ असते. तिच्यामुळे प्रदूषणात आणि हवेतल्या कार्बन डायऑक्‍साइडमध्ये थेट भर पडत नाही. वापरायला सोपी आणि हळूहळू स्वस्त होत जाणारी ही ऊर्जा साहजिकच अपारंपरिक पर्यायांमध्ये आघाडीवर आहे.

युरोपमध्ये राहत्या घरांवर सौर पॅनेल्स लावून ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्याचा प्रयत्न दिसतो. गावागावांमध्ये सौर ऊर्जेचे ग्रीड आपापली गरज तर पुरवतच असतं, वर जास्तीची ऊर्जा मुख्य ग्रीडलाही देऊ शकतं. आपल्याकडे मात्र हा प्रकार कमी आढळतो. शहरात उंच इमारतींमध्ये एकूण मिळणारा सूर्यप्रकाश पूर्ण इमारतीची गरज भागवायला कमी पडतो.

तर निमशहरी वा ग्रामीण भागात त्यासाठी आवश्‍यक ती ग्रीड रचना अजून विकसित व्हायची आहे. तरीही येत्या काही वर्षांमध्ये शहरात गृहसंकुलांमध्ये सौरऊर्जा निर्मिती केंद्र उभारली जातील आणि तालुक्‍याच्या ठिकाणी हळूहळू पुरवठा यंत्रणा उभारायला सुरुवात होईल. मोठ्या सरकारी प्रकल्पांना अशा छोट्या छोट्या प्रकल्पांची जोड मिळाली, तर आपल्याला 2022 च्या लक्ष्यापर्यंत पोहोचणं सहज शक्‍य आहे!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)