जीवनगाणे : ‘च’ काढून टाक…

-अरुण गोखले

जीवनातले काही सल्ले अगदी लहान असले तरी किती मोलाचे आणि महत्त्वाचे कसे ठरतात त्याचे हे उत्तम उदाहरण…
मला अजूनही तो दिवस आठवतोय. परीक्षेतील मिळालेल्या यशाचा केवळ अपेक्षित टक्‍केवारी मिळाली नाही म्हणून मी आनंद साजरा करत नव्हतो. त्याच वेळी “”काय श्री! लागला ना रिझल्ट? मिळाला फर्स्ट क्‍लास… चल हे घे पेढे” असं म्हणून मी पेढे देण्याऐवजी मलाच पेढे देण्यासाठी आमचे एक शेजारचे काका आवर्जून आले. मी उठून त्यांना नमस्कार केला…

तेव्हा ते माझ्याकडे पाहात म्हणाले, “”का? तू खूश दिसत नाहीस?” मी माझ्या अपेक्षित टक्‍केवारीपेक्षा कमी टक्‍के मिळाल्याचे कारण सांगितले.

त्यावेळी समजावणीच्या स्वरात ते मला म्हणाले, “”हे बघ श्री, प्रयत्न करणे हे आपल्या हातात असते. आपण ते अवश्‍य करावेत. पण एखादी गोष्ट आपल्या मनाप्रमाणे व्हायलाच हवी याचा जो आग्रह आपण धरतो ना तो सोडायला हवा. हा “च’ मोठा वाईट आहे. तो आपल्याला दु:ख देतो. त्रास देतो. जे मिळालं त्याचा आनंद हा “च’, आपली आग्रहीवृत्ती, हव्यास, अपेक्षा आपल्याला घेऊ देत नाही.

जीवनात जी माणसं फार आग्रही असतात ती सुखीसमाधानी नसतात. त्यांना जे मिळालं त्याचं सुख वाटत नाही. तर जे मिळालेले नाही त्यासाठी ही माणसं आसवं गाळत बसतात. हे बघ! जीवनात जर खऱ्या अर्थाने सुखी समाधानी व्हायचे असेल तर हा आग्रहाचा “च’ शब्द काढून टाकायला हवा.”

“”हो… काका… मी तुमचा सल्ला नक्‍कीच लक्षात ठेवीन” असं म्हणून मी त्यांना तो “च’ सोडण्याचा शब्द दिला. त्यांनी कौतुकाने तोंडात भरवलेला पेढा मला जास्तच गोड लागला. त्यांना दिलेला तो शब्द मी पुढे माझ्या जीवनात प्रत्यक्ष आचरणात आणला, आणि हे झालंच पाहिजे, हे मिळलंच पाहिजे… ते मला आणि मलाच मिळाले पाहिजे हा आग्रही स्वभावच आपल्याला कसा दु:खी करतो.

असमाधानी आणि पुढ्यातला आनंद घेण्यापासून कसं वंचित करतो हे मी द्रष्टेपणाने पाहिले, अनुभवले. मग माझे मलाच त्या काकांच्या “च’ सोड या छोट्या सल्ल्याचे मोठे मोल कळले.

त्यांचा तो बहुमोल छोटासा सल्ला आणि सकारात्मक विचार माझे अवघे जीवन आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून गेले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here