अबाऊट टर्न : वन-टेक

-हिमांशू

चित्रपटाचे बजेट तयार करताना “प्रमोशन’ या रकान्यात हल्ली गलेलठ्ठ रकमेची तरतूद करावी लागते म्हणे! चित्रपटाच्या निर्मितीत “प्रमोशन’चा मोठा वाटा होता किंवा प्रमोशनसाठी जवळजवळ निर्मितीइतकाच खर्च केला वगैरे सुरस कथा अधूनमधून कानावर पडतात. गणेशोत्सवाचे किंवा दिवाळीचे जसे वेध लागतात, तसेच चित्रपटाचे वेध लागले पाहिजेत, असा “प्रमोशन’चा हेतू असतो.

चित्रपटाचा टीजर प्रकाशित करणे, संगीताच्या अल्बमचे प्रकाशन, पोस्टरचे प्रकाशन, एखादे गाणं रिलीज करणे, ट्रेलर रिलीज करणे असा शिस्तबद्ध कार्यक्रम असतो. काहीजण गाजणारे किंवा गाजवण्याचे मुद्देही यात अंतर्भूत करतात, असंही आम्ही ऐकून आहोत. काही वेळा “प्रमोशनल ऍक्‍टिव्हिटी’ म्हणून बातम्यासुद्धा पेरल्या जातात म्हणे! त्यामुळेच चित्रपटविषयक बातम्या वाचण्यासाठी आम्ही फारसा वेळ देत नाही. परंतु परवा एक अशी बातमी बघितली, की सगळ्या बातम्या सोडून आम्ही ती आधी वाचली. प्रमोशनसाठी घडवलेली घटना ती नक्‍कीच नव्हती. एका चमत्काराची बातमी होती ती.

शतकातील महानायक अमिताभ बच्चन यांना “बिग-बी’ का म्हणतात, याचा पुरेपूर प्रत्यय देणारी! वयाच्या पंच्याहत्तरीत त्यांनी तब्बल चौदा मिनिटांचा सलग सीन “वन टेक’मध्ये “ओके’ केला, हे वाचून या महानायकाबद्दलचा आदर अधिक वाढला. या घटनेतून अमिताभ बच्चन यांची अफाट क्षमताच केवळ दिसते असे नाही, तर कामावरच्या त्यांच्या निष्ठेला मानाचा मुजरा करावासा वाटतो.

चित्रपटाच्या क्षेत्रात जोडकामाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत असताना “चौदा मिनिटांचा सलग सीन’ ही कल्पनाही काही दिग्दर्शकांना पटणार नाही. पण “चेहरे’ या चित्रपटासाठी अमिताभ यांनी असा सीन एका “टेक’मध्ये केला तेव्हा सेटवरच्या सगळ्यांनी उभे राहून टाळ्यांचा कडकडाट केला. चित्रपटाच्या निर्मिती प्रक्रियेची माहिती नसणाऱ्यांना कदाचित या प्रसंगाची महती कळणार नाही. परंतु आजकाल या माध्यमातील तंत्राबरोबरच त्याच्या कार्यक्षेत्रातही विस्तार झाल्यामुळे चित्रीकरण ही काय प्रक्रिया आहे, हे अनेकांना जवळून पाहता येते. या प्रक्रियेतली आव्हाने मात्र प्रत्यक्ष सेटवर उभे राहिल्याखेरीज कळत नाहीत.

कॅमेरा हे क्षमतेची आणि संयमाची कसोटी घेणारे माध्यम आहे. हे माध्यम रातोरात एखाद्याला “स्टार’ बनवत असले, तरी त्याला वश करण्यासाठी अतोनात मेहनत घ्यावी लागते. संधीची वाट पाहावी लागते आणि आलेल्या संधीचे सोनं करावे लागते. अमिताभ यांचा जीवनपट हा चित्रपट माध्यमात कारकीर्द सुरू करू पाहणाऱ्यांसाठी आदर्श आहे. रातोरात “स्टार’ होणे एकवेळ नशिबात असू शकेल; परंतु वर्षानुवर्षे स्टार नव्हे, सुपरस्टार नव्हे तर मेगास्टार बनून राहणे फार अवघड! मिळवलेला लौकिक टिकवण्याची कसरत तो मिळवण्यापेक्षा अवघड असते. याबाबत अमिताभ यांचं व्यक्‍तिमत्त्व आणि कार्यपद्धती सर्वांनी अभ्यासण्याजोगी आहे.

काही सन्माननीय अपवाद वगळता चित्रपटाच्या माध्यमात प्रवेश केल्याबरोबर अनेकांना स्वर्ग दोन बोटांवर आल्याचा भास होतो. आजकाल माध्यमं वाढल्यामुळे कलेच्या क्षेत्रात पदार्पण करणाऱ्यांना पर्यायही सहजासहजी उपलब्ध होतात. टीव्हीच्या माध्यमातूनसुद्धा घराघरात पोहोचणे कलावंतांना सहज शक्‍य झालंय. परंतु प्रसिद्धीचे हे वलयच कसोटी पाहणारे असते. अमिताभ नावाचा महानायक आजही शूटिंगला वेळेवर उपस्थित राहतो, प्रत्येक सीनमध्ये स्वतःला झोकून देतो, सहकलावंतांना सांभाळून घेतो, यातून नवोदितांनी बरंच काही शिकायला हवे.

Leave A Reply

Your email address will not be published.