संडे स्पेशल : कर्माचा महिमा अपार

-अशोक सुतार

कर्ता आहे तर कर्मही आहे. कर्म कुणाला सुटले आहे? सूर्य, झाडे, पाणी, हवा, आकाश, चंद्र यांना कधी सुट्टी घेताना पाहिले आहे काय? म्हणजेच कर्म हा जगाचा अविभाज्य घटक आहे. कर्मे कराल तर देह कष्टी होणार नाही. कर्मयोगाचे तीन प्रकार आहेत- कर्म, विकर्म आणि अकर्म.

कर्म म्हणजे बाहेरचे स्थूल कर्म, जे दृष्टीस पडते. विकर्म म्हणजे विशेष कर्म होय. कर्मात विकर्म ओतले की ते अकर्म होते. एखादे कर्म मनापासून केलेत तर ते विकर्म होय. तुम्ही एखाद्याला भेटलात आणि नमस्कार केला तर ते बाह्य कर्म आणि त्या नमस्कारात आपले मन नसेल तर तो नमस्कार माणसाला बोजा वाटेल. आपल्या कर्मात मनाचा सहकार आवश्‍यक आहे. मनापासून काम करा, त्यालाच विकर्म म्हणायचे. एखादे काम छोटे वा मोठे असो, त्यात मन ओतून काम केले तर यश दूर नाही.

कर्मात विकर्म ओतले पाहिजे. बाह्य कर्मात हृदयाचा सहकार, मनाचा सकारात्मकपणा ओतला तर ते कर्म जिवंत होईल. आई मुलासाठी जे जे करते ते आपले मन ओतून करते. तिच्या कर्मात मनाचा सहकार असतो. म्हणूनच आईची जागा कोणी घेऊ शकत नाही. एखादा शास्त्रज्ञ मन लावून त्या विषयाचा अभ्यास करतो, त्या कर्मात आपले हृदय ओततो. शास्त्रज्ञाने केलेले हे विकर्मच त्याला त्या विषयातील नवनव्या संशोधनातील रहस्य उलगडून दाखवते. मित्रांनो, यशस्वी होईपर्यंत मन ओतून कर्म करा यश तुमचेच आहे.

शालेय शिक्षण पूर्ण करून पुढील शिक्षणासाठी सध्या मुले प्रवेश घेत आहेत. आपल्या मुलाला कोणत्या विषयाची आवड आहे, त्याला पुढे काय करायचे आहे हे पालकांनी ठरवले पाहिजे. कारण मुलांना ज्या विषयांमध्ये गोडी असेल ते शिक्षण दिले तर मुले त्यांच्या क्षेत्रात यशस्वी होतील. पालकांनी कर्मयोगातील कर्मसंहिता आचरणात आणणे गरजेचे आहे. मुले जीव ओतून त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात अभ्यास करतील तर ते कर्म त्यांना यश मिळवून देईल.

आज आपण लोभी झालो आहोत. कर्म न करता फळ हवे असते. थोडे कर्म केले तर फळाची अपेक्षा बाळगणारे अनेक आहेत. ज्या प्रमाणे पावसाळ्यात लहान मुले बी रुजत घालतात आणि दिवसभरातून दोन-तीन वेळा अंकुर आला की नाही हे पाहतात, तशी अनेकांची विचारातील बाल्यावस्था आहे. स्वामी विवेकानंदांचे गुरू स्वामी रामकृष्ण परमहंस म्हणतात की, कमळाची कळी चिखलात पाय रोवून उन्हातान्हात वाऱ्याशी संघर्ष करत उभी असते. नंतर त्या कळीचे एक दिवस कमळ बनते. याचा अर्थ असा की, कोणतेही कर्म मनाचा निश्‍चय करून सकारात्मक विचारांनी करा. तुमचे जीवन कमळासारखे फुलेल, तुम्हाला व इतरांनाही आनंद देईल. मनापासून केलेले कोणतेही कार्य आपल्याला विकर्माकडे घेऊन जाते आणि तेव्हा कर्माचे ओझे नाहीसे वाटते, त्यालाच अकर्म म्हणायचे.

सत्संगती जोडावी, अनुभवातून माणसे जोडावी. आपले कर्म सकारात्मक मनाने करावे. म्हणजे ते कर्म आपल्याला जीवनाच्या उंचीवर नेईल, व्यक्‍तीला प्रतिष्ठा मिळवून देईल. शेतकऱ्यांमध्ये एक म्हण आहे, “ओली पेर परंतु खोली पेर’ म्हणजे, शेतात जिथे बी पेरायचे तिथे ओल हवी आणि बी खोल पेरली तर त्याला अंकुर फुटेल. ज्याने आपल्या आयुष्यातील कर्माचा दीपप्रज्वलित केला आहे अशा लोकांच्या संगतीत राहिले आणि स्वतः कर्म, विकर्म आणि अकर्मचे सूत्र बाळगले तर त्यांचे आयुष्य नक्‍कीच कमळासारखे फुलत राहील, जीवनाला नवी झळाळी येईल.

Leave A Reply

Your email address will not be published.