स्वागत पुस्तकांचे : हे सर्व कोठून येते?

-माधुरी तळवलकर

“हे सर्व कोठून येते?’ नावाचं विजय तेंडुलकरांचं पुस्तक काही वर्षे मी अधूनमधून वाचते आहे आणि प्रत्येक वेळी तेंडुलकरांच्या शब्दकळेचा, भेदक शैलीचा, अस्सल अनुभवांचा प्रत्यय नव्यानं येतो आहे. या पुस्तकात वेगवेगळ्या वेळी त्यांनी लिहिलेल्या लेखांचं संकलन आहे.

तेंडुलकरांची लेखनशैली मिताक्षरी! अगदी नेमक्‍या, वेचक शब्दांत खूप महत्त्वाचं सांगून जाण्याची अद्‌भुत कला त्यांच्या अंगी होती. पुस्तकाच्या अर्ध्या पानाच्या प्रस्तावनेत ते लिहितात, “इतकी वर्षे माणसे पाहिल्यावर माणसांना लेबलं चिकटवणे निरर्थक वाटते. माणसे त्याहून गुंतागुंतीची आहेत आणि ती बहुधा आपल्याला अंशतःच कळतात. आपल्याला न भेटलेले त्यांचे एक आयुष्य असते आणि म्हणून त्यांच्याविषयी निष्कर्ष शक्‍यतो काढू नयेत. काढलेच तर ते आपल्यापुरते समजावेत.’ जजमेन्टल न होणं हे तेंडुलकरांच्या लेखनाचं बलस्थान आहे.

“हे सर्व कोठून येते?’ या पुस्तकात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक, गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री चिमणभाई पटेल यांसारख्या राजकारणी लोकांना माणूस म्हणून समजावून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. या दोन्ही व्यक्‍तींचा त्या काळच्या राजकारणात दबदबा होता. विजय तेंडुलकर एकदा त्यांची खासगी मुलाखत घ्यायला गेले… आणि मग पुढे आपल्या डोळ्यापुढे अक्षरशः चित्रपटच चालू होतो. वसंतराव नाईकांचा बंगला, त्यांना भेटायला आलेले मुरब्बी राजकारणी, त्यांचे आपसातले शह-काटशह, वसंतरावांचे सर्वांना लीलया हाताळणे… सगळे इतक्‍या काही ताकदीने तेंडुलकरांनी उभे केले आहे की, आपण जणू कुठले नवीनच जग पाहतो आहोत असे वाटते.

हाच प्रकार चिमणभाई पटेल यांच्याबाबतही! 1975साली नवनिर्माण आंदोलनाने गुजरात हादरला होता. आंदोलनाचा रोख होता भ्रष्टाचाराविरुद्ध पण प्रत्यक्षात हे आंदोलन गुजरातचे तेव्हाचे मुख्यमंत्री चिमणभाई पटेल या एकाच व्यक्‍तीविरुद्ध एकवटले होते. अशा वेळी विजय तेंडुलकर पटेलांना भेटायला गेले. चिमणभाईंविरुद्ध गुजरातेत जागोजागी दिसत असलेला असंतोष त्यांनी पाहिला आहे, अनुभवला आहे. तेंडुलकर चिमणभाईंना विचारतात, “जे काही घडले आहे, ते पाहता राजकारणात यानंतर आपले प्रॉस्पेक्‍ट्‌स…’

“ते घडून संपले आहे. राजकारणात काही कायम नसते.’ तेंडुलकर लिहितात, मला ही बढाई वाटली. चिमणभाईंच्या स्वरातला कणखरपणा दचकवणारा होता. प्रश्‍न पडतो त्यांना, हे सर्व कोठून येते? या पुस्तकात विजय तेंडुलकरांच्या आयुष्यात आलेल्या काही व्यक्‍तींचे त्यांनी केलेले हृद्य चित्रण वाचायला मिळते. सगळ्यात हेलावून टाकणारे व्यक्‍तिचित्र म्हणजे श्री. दा. पानवलकर या लेखकाचं! हे वाचताना नियतीपुढे माणसाचे प्रयत्न किती अपुरे ठरतात याची जाणीव होते. तेंडुलकरांनी ते सारे फार सहृदयतेने रंगवले आहे. आणीबाणीच्या काळात तेंडुलकर जयप्रकाश नारायण यांना भेटले. जेपींविषयी अनेक बारकावे तेंडुलकर टिपतात आणि म्हणतात, “त्यांचे शरीर युद्धाचे नेतृत्व करीत होते पण मन शांततेसाठी आसुसले होते.’

एखाद्या व्यक्‍तीने दुसऱ्या व्यक्‍तीचं मोजमाप करणं फार कठीण! त्यात ही सगळीच माणसं प्रतिभावंत, डोंगराएवढ्या कर्तृत्वाची असतील तर? त्याला विजय तेंडुलकरांसारखा आरपार बघणारा, व्यक्‍तिमत्त्वाचा नितळ तळ शोधणारा लेखकच हवा. या माणसांच्या कथा वाचताना त्या त्या व्यक्‍तीचा कुठला तरी खोलवरचा पैलू आपल्या डोळ्यासमोर लख्खकन चमकून जातो. कधी आपण अंतर्मुख होतो… आपल्यावर काही ना काही परिणाम होतोच. राजहंस प्रकाशनचे हे पुस्तक नुसते वाचून बाजूला ठेवण्यासारखे नाही, पुनःपुन्हा वाचून समजावून घेण्यासारखे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.