विज्ञानविश्‍व : क्रीडाविश्‍वात एआय

-डॉ. मेघश्री दळवी

क्रीडास्पर्धांमध्ये इतक्‍या गोष्टी पणाला लागलेल्या असतात की कोण जिंकेल, किती गुणांनी जिंकेल याचं अचूक उत्तर कधीच देता येत नाही. अलीकडे खेळांच्या सामन्याचे पुष्कळ तपशील आणि क्रीडापटूंचे विविध कोनांमधले इतके व्हिडीओ उपलब्ध असतात, की या डेटाचं विश्‍लेषण करून अनेक तज्ज्ञ काही न काही ठोकताळे बांधत असतात. अर्थात, प्रत्यक्ष सामन्याच्या वेळी ह्या विश्‍लेषणाला चकवा देत वेगळंच काही घडतं! आणि तीच तर खेळाची गंमत असते.

पण तरीही याच डेटाचा आधार घेत, वैयक्‍तिक आणि सांघिक, दोन्ही प्रकारच्या क्रीडाप्रकारांमध्ये एआयचा (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स- कृत्रिम बुद्धिमत्ता) वापर वाढायला लागला आहे. यात सर्वांत पहिला टप्पा आहे उच्च क्षमता असलेले प्रतिभावान क्रीडापटू हुडकून काढण्याचा. देशाच्या कानाकोपऱ्यातून वेगवेगळ्या मार्गाने सतत नवनवे तरुण खेळाडू पुढे येत असतात. त्यांच्या सरावाचा डेटा एआय प्रणालीला देऊन हे खेळाडू सातत्याने आपला खेळ सुधारत नेऊ शकतील का, अधिकाधिक खुलवू शकतील का, यांचा अभ्यास करता येतो. त्यांची शारीरिक क्षमता, मानसिक घडण, मेहनत करण्याची आणि शिकत राहण्याची तयारी आणि एकूण स्वभाव यांचा अंदाज घेत एआय प्रणाली खेळाडूंचं मूल्यमापन करू शकते. प्रचंड डेटा हाताळण्याची आणि कोणताही पूर्वग्रह न ठेवता वस्तुनिष्ठ निर्णय घेण्याची एआयची क्षमता इथे कामी येते.

त्यानंतर प्रत्यक्ष सरावादरम्यान खेळाडूच्या शरीरावर हेल्थ ट्रॅकर लावून रक्‍तदाब, हृदयाचे ठोके, रक्‍तातली साखर असं सतत मोजमापन ठेवतात. त्या डेटावरून आणि दिवसभरात खेळाडूंची ऊर्जा कशी कमी-जास्त होते याचं मोजमापन करून आहारासाठी आहारतज्ज्ञ अचूक तक्‍ता तयार करू शकतात. सरावातल्या कामगिरीचा डेटा वापरून खेळाडूंची शक्‍तीस्थानं आणि संभाव्य दोष ओळखण्यात एआयची मदत होते. त्यानुसार प्रशिक्षक प्रत्येक खेळाडूसाठी योग्य प्रशिक्षण आणि सरावाची योजना आखू शकतात. सोबत सराव आणि सामने यात फिटनेसच्या दृष्टीने खेळाडूने काय करावे आणि काय नाही हे नीट उमजून त्यानुसार खेळाडूंना सूचना देता येतात. एखाद्या खेळाडूला वरचेवर दुखापत होत असेल तर त्याची कारणमीमांसा करून त्याचा खेळ अधिकाधिक निर्दोष करून घेता येतो. हे सगळं करताना खेळाडूंच्या शारीरिक गुणदोषांचा विचार करून त्याच्या आरोग्याकडे आणि सुरक्षेकडे विशेष लक्ष पुरवता येते हे महत्त्वाचे.

म्हणजे प्रत्येक टप्प्यावर एआय विश्‍लेषण वापरत प्रत्येक खेळाडूकडून सर्वोत्तम कामगिरी करून घेता येते. यात डेटा गोळा करण्यासाठी हेल्थ ट्रॅकरसारखी परिधानीय साधने (वेअरेबल्स) खूप मोलाची ठरत आहेत. त्यात डेटा नोंदणारे बूट, बॉक्‍सिंग ग्लोव्हज अशा आणखी क्रीडासाधनांची दिवसेंदिवस भर पडत आहे.

योग्य खेळाडू शोधून त्यांच्या खेळाचे अचूक विश्‍लेषण करून खेळ सुधारत न्यायला डेटाचा आधार घेता येईल. उद्या प्रत्येक खेळाडू आणि प्रत्येक संघ, एआयचा वापर करून शास्त्रशुद्ध पद्धतीने डावपेच आखणार आहे आणि मग तिथे केवळ खेळाडू किंवा संघाचा नव्हे तर त्यांच्या एआय प्रणालीचाही कस लागणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.