प्रेरणा : ग्रामीण कोकणात युवतींना रोजगार

-दत्तात्रय आंबुलकर

कोकणामधील रत्नागिरी जिल्ह्यातील देवगड तालुक्‍यात असलेले जयगड परिसरातील ग्रामीण युवतींना रोजगाराची मोठी आणि आगळीवेगळी संधी उपलब्ध करून दिली असून त्याचाच हा प्रेरणादायी तपशील…

परंपरागतरित्या कोकणातील तरुण पिढीला स्थानिक पातळीवर नोकरी किंवा रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध होत नाहीत. परिणामी या मुलांना पुण्या-मुंबईसह राज्यातील अन्य शहरांमध्ये रोजगारासाठी जावे लागायचे. त्यातही मुलींना त्यांचे पालक नोकरीसाठी दूर पाठविण्यास टाळायचे. परिणामी या मुलींकडे शैक्षणिक पात्रता व काही विशेष करण्याची इच्छा असूनही त्यांना रोजगार संधींपासून दूर राहावे लागे.

ग्रामीण तरुणींची हीच अडचण लक्षात घेऊन जेएसडब्ल्यू कंपनीने रत्नागिरी तालुक्‍याच्या ग्रामीण भागातील 100 तरुणींना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत बीपीओ सेंटरच्या माध्यमातून रोजगाराचा नवा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. यासाठी कंपनीने आपल्या सीएसआर म्हणजेच व्यावसायिक सामाजिक जबाबदारीच्या धोरणानुसार गेल्या सुमारे चार वर्षांपासून कंपनीच्या आवारात बीपीओ म्हणजेच बिझनेस प्रोसेस आऊटसोर्सिंग केंद्राची सुरुवात ऑक्‍टोबर 2015 पासून सुरू केली.
यासाठी सॉफ्टवेअर तंत्रज्ञ कैवल्य पेढे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या चार वर्षांत देवगड परिसरातील जयगड, नांदिवडे, साखरमोहल्ला, चाफेरी इत्यादी गावांमधील मिळून सुमारे 175 मुलींनी या ठिकाणी संगणकाचे तांत्रिक प्रशिक्षण घेतले असून त्यापैकी 104 मुली आज प्रत्यक्ष काम करीत आहेत. कंपनीच्या मानव संसाधन विभागाच्या अधिकारी प्रतीक्षा संसारे या उपक्रमाची प्रशासकीय जबाबदारी सांभाळत आहेत.

कंपनीच्या सीएसआर विभागाचे प्रमुख अनिल दधिच यांच्यामते कंपनी परिसरातील गावांमध्ये राहणाऱ्या ग्रामस्थांच्या आर्थिक व कौटुंबिक गरजा लक्षात घेऊन सीएसआर अंतर्गत काम करण्याचे कंपनी व्यवस्थापनाने ठरविले. त्यानुसार पंचक्रोशीतील युवतींना संगणक साक्षर करून कंपनीतच रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने बीपीओ केंद्र सुरू करण्यात आले.

दरम्यान, अमेरिकेतील टंडन समूहाकडून या केंद्राला बीपीओ तत्त्वावर कामाचे कंत्राट देण्यात आल्यामुळे शंभराहून अधिक प्रशिक्षित युवतींना त्यांच्या कौशल्यावर आधारित रोजगार देण्यात आला. यापैकी 20 ते 25 टक्‍के मुली बीपीओ केंद्राच्या स्थापना काळापासून कार्यरत आहेत. परिणामी या मुलींना आपापल्या गावातच काम करून दरमहा 5 ते 7 हजार रुपयांचे उत्पन्न मिळू लागले हे विशेष.

या उपक्रमाचे महत्त्व म्हणजे कोकणासारख्या आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या भागात आधुनिक व प्रगत प्रशिक्षण आणि तंत्रज्ञान आत्मसात करून मिळालेल्या या नव्या रोजगारसंधींचा या युवतींनी उत्तम प्रकारे लाभ घेतला आहे. या मुलींना गावाजवळ व त्यांच्या शिक्षण-प्रशिक्षणाला साजेसा असा रोजगार तर मिळालाच त्याशिवाय त्यांना दरमहा उत्पन्न मिळू लागल्याने त्यांच्या पालकांना मदत व स्वतः त्या उमेदवारांना आत्मविश्‍वास लाभला आहे.

कंपनीचे व्यवस्थापन पण या प्रकल्प व उपक्रमातील आपली जबाबदारी व योगदान पुरतेपणी पार पाडत आहेत. बीपीओ केंद्रातील काम करणाऱ्या या मुलींना कामापोटी बरेचदा संध्याकाळी उशीर होतो. अशावेळी कंपनीतर्फे या मुलींसाठी त्यांच्या घरी सोडण्यासाठी वाहनव्यवस्था केली जाते. त्यामुळे काम करणाऱ्या मुली आणि त्यांचे पालक मुलींच्या सुरक्षेबद्दल निश्‍चिंत असतात व त्यामुळे देवगड परिसराशिवाय तालुक्‍यातील मुली पण महिला बीपीओ केंद्रात सहभागी होण्यासाठी पुढे येत असून त्यांना पण कंपनीतर्फे आवश्‍यक ते शिक्षण-प्रशिक्षण दिले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.