कलंदर : मुरब्बी…

-उत्तम पिंगळे

दिल्लीत नुकतेच नवे सरकार स्थानापन्न झाले आहे या पार्श्‍वभूमीवर काल विसरभोळे सरांकडे गेलो. प्राध्यापक प्रधानमंत्र्यांच्या मालदीव दौऱ्याबाबत बोलत होते. मालदीवमध्येही नवीन सरकार आलेले आहे व भारताच्या बाजूने ते ठाम उभे राहणार अशी चिन्ह दिसत आहेत.हिंदी महासागरातील या महत्त्वाच्या देशात त्यामुळे आपले वजन वाढणार आहे. मग त्यांना मी महाराष्ट्रात निवडणुका येऊ घातलेल्या आहेत त्याबद्दल त्यांचे मत विचारले.

प्राध्यापक म्हणाले की, महाराष्ट्रात कॉंग्रेस सोडून पूर्ण पाच वर्षे आपला कार्यकाळ पूर्ण करणारे फडणवीस पहिले मुख्यमंत्री आहेत. त्यांच्यापाशी सरकार कसे चालवावे याचे कसब आहे. आपणास आठवत असेल की 2014 ला सर्वच पक्ष वेगवेगळे लढले व भाजपाला सर्वात जास्त जागा मिळाल्या होत्या. त्यांचा नेहमीचा सहयोगी पक्षही विरोधी गटांत राहिला होता.

तेथेही मुख्यमंत्र्यांनी कसरत करून आपल्या पारंपरिक मित्राला पुन्हा सत्तेमध्ये सामावून घेतले. त्या वेळी विरोधी पक्ष नेते थेट कॅबिनेट मंत्री बनून एनडीएचे घटक बनले. त्याचा कुणाला किती फायदा व तोटा झाला ते आजही समजले नाही. पण अलीकडे परवाच पुन्हा विरोधी पक्षनेता थेट मंत्रिमंडळात गेला यावर प्राध्यापकांना विचारताच ते म्हणाले की, हा नवा ट्रेन्ड राजकारणामध्ये महाराष्ट्राने दिला असे म्हणावयास हवे.

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बोलत असताना प्राध्यापक म्हणाले की, मुळात 2014 ला महाराष्ट्राचे ते दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री बनले. त्या वेळीही काही पक्षांतर्गत आतून आवाज काढण्याचे प्रयत्न झाले; पण त्यांनाही त्यांनी कोंडीत पकडले व वेळ साधून खड्यासारखे बाजूस केले. प्रत्यक्ष काहीही न करता स्वकियांचा बंदोबस्त पूर्णपणे केला. अर्थात त्यावेळी केंद्रात भक्‍कम सरकार होते या वेळी तर ते आणखी भक्‍कम झालेले आहे. त्यामुळे आताच्या मुख्यमंत्र्यांना पक्षांतर्गत विरोध दिसून येत नाही.

विरोधी पक्षांनीही त्यांच्या कारकिर्दीत त्यांना चांगलेच धारेवर धरले होते. शेतकरी संप, मोर्चे, आरक्षण यांचे वेळोवेळी अस्त्र बाहेर काढून त्यांना नामोहरम करण्याचा प्रयत्न सर्वोतोपरी झाला पण एवढ्या सर्वांना ते पुरून उरले. हवी नको ती सर्व आरक्षणे देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यात सर्वसाधारण लोकांनाही आरक्षण मिळाले जे गेली 50 वर्षे कुणी देऊ शकले नव्हते. तसेच शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना पीकविमा, कर्जमाफी, जलसंधारण मदत हे सर्व देऊ केले.

निवडणूकप्रसंगी मित्रपक्षांशी लोकसभेसाठी तडजोडी केल्या व गेल्या वर्षी एवढ्याच जागा निवडून आणल्या. मात्तबर विरोधी नेत्यांना आपल्या बाजूने वळवून घेतले. आताची परिस्थिती अशी आहे की, एक दुष्काळ सोडला (जो आपल्या हातात नाही) तर दुसरा कोणताच प्रश्‍न विरोधकांना सापडत नाही. विरोधक अजूनही लोकसभेच्या पराभवाच्या धक्‍क्‍यातून सावरलेले दिसत नाहीत.

मुख्यमंत्र्यांनी स्वकीय विरोधकांचा बंदोबस्त करतानाच महत्त्वाचे मोठे नेते आपल्या गळाला लावलेले आहेत. समाजातील विविध स्तर व घटक यांना नवीन मंत्रिमंडळात स्थान देतानाच अकार्यक्षम लोकांना बरोबर बाहेर काढलेले आहे. नव्या विस्ताराने मुख्यमंत्र्यांनी आपला मुरब्बीपणा दाखवून आपले आसन आणखी भक्‍कम केलेले दिसते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)