विविधा : रमाकांत देसाई

-माधव विद्वांस

भारताच्या क्रिकेटसंघातील मध्यम गती गोलंदाज रमाकांत भिकाजी देसाई यांची आज जयंती. त्यांचा जन्म मुंबई येथे 20 जून 1939 रोजी झाला. त्यावेळच्या संघात ते उंचीने (5 फूट 4 इंच) सगळ्यात छोटे दिसायचे, म्हणून त्यांना छोटा रमाकांत असे नाव पडले होते.

रणजी करंडक स्पर्धेच्या पहिल्या वर्षात त्यांनी 7 सामन्यांत 50 विकेट घेतल्या. हे अजूनही मुंबईसाठी एक रेकॉर्ड आहे. 1960-61 मध्ये राजस्थानवरील विजयात 46 धावात 7 विकेट घेतल्या. त्यांची कसोटी कारकीर्द 1959 ते 1968 अशी फक्‍त 9 वर्षांची होती. वर्ष 1959 मध्ये त्यांची निवड करून निवडसमितीने मध्यम गती गोलंदाजाला समाविष्ट केले व ती निवड त्यांनी सार्थ केली. त्यांनी 28 कसोटी सामने खेळले व त्यामध्ये 74 बळी घेतले दोन सामन्यात एका सत्रात 5 बळी, 13.48 च्या सरासरीने 418 धावा केल्या. त्यात एक अर्धशतकही होते. सर्वोच्च धावसंख्या 85 होती, तर सर्वोत्तम गोलंदाजी 6/56 होती. तसेच त्यांनी 150 प्रथम श्रेणी खेळामध्ये 2384 धावा व 468 बळी घेतले होते.

1958/59 च्या हंगामात त्यांनी वेस्टइंडीजविरुद्ध कसोटी पदार्पण केले. त्यावेळी त्यांच्या बाउंसरने फलंदाजांना जेरीस आणले होते. तेव्हा 50 षटकांत 196 धावा देऊन चार बळी घेतले होते. त्यांची रणजी करंडक कारकीर्द मुंबईसंघाकडून प्रभावी ठरली यामध्ये त्यांची फलंदाजीची चुणूकही पाहणेस मिळाली त्यांनी राजस्थान विरुद्ध 107 धावांची शतकी खेळी करून विजयश्री खेचून आणली होती. त्यांनी त्यांच्या कारकीर्दत 1959 मधे इंग्लंड, 1961-62 मधे वेस्टइंडीज आणि 1967-68 ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडचा दौरा केला.

भारतात झालेल्या 1960-61 मधील मुंबई येथील सामन्यात 85 धावा काढल्या होत्या, याच सामन्यात नाना जोशींबरोबर नवव्या विकेटसाठी त्यांनी 149 धावांची भागीदारी केली होती. 1964-65 मध्ये मुंबईत न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यांत 56 धावा देऊन 6 बळी घेत गोलंदाज म्हणून सर्वोच्च कामगिरी नोंदविली होती.

साठच्या दशकाच्या मध्यामधे भारतात फिरकी गोलंदाजी प्रभावी होऊ लागली व खेळपट्ट्या फिरकीस अनुकूल होऊ लागल्या. देसाईंना जेव्हा संधी दिली गेली तेव्हा त्यांनी 1965 मधे फक्‍त 128 धावा देऊन चार बळी घेऊन आपले श्रेष्ठत्व सिद्ध केले. 1967-68 च्या हंगामात न्यूझीलंड दौऱ्यावेळी डूनेडीन येथील सामन्यात डिक मोट्‌झच्या चेंडूने त्यांचा जबडा फ्रॅक्‍चर झाला होता. तरीही त्यांनी बिशन बेदींबरोबर शेवटच्या विकेटसाठी 57 धावांची भागीदारी केली होती.
त्यांनी जेव्हा क्रिकेटमधून निवृत्ती घेतली तेव्हा क्रिकेट समीक्षक पी. एन. सुंदरसन लिहितात, भारतातील मृत खेळपट्टीवर त्यांनी हृदय ओतून गोलंदाजी केली.

रणजी व इतर सामन्यांतील त्यांच्यातील विवेक आणि बुद्धिमत्ता आणि गोलंदाजीत भेदकता बऱ्याच काळपर्यंत लक्षात राहील. देसाई 1996-97 या कालावधीत निवड समितीचे अध्यक्ष होते.त्यांना हृदयविकार असल्याने त्यांनी मृत्यू अगोदरच एक महिन्यापूर्वी पदाचा राजीनामा दिला होता. त्यांना रुग्णालयात दाखल केल्या नंतर चार दिवसांनी त्यांचे निधन झाले.

Leave A Reply

Your email address will not be published.