साद-पडसाद : एकतर्फी प्रेमातील समाजघातकी खोडसाळपणा !

-जयेश राणे

मुंबईतील प्रभादेवी येथे असलेले प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. परंतु पोलिसांनी याचा मागोवा घेतला असता एकतर्फी प्रेमातून हा खोडसाळपणा केल्याचे समोर आले आहे. अशा व्यक्‍तींना चाप लावण्यासाठी आवश्‍यक उपाययोजना कृतीत आणली पाहिजे. या वेळी होणाऱ्या धावपळीत काही अघटीत घडल्यास ते एखाद्याच्या जिवावरही बेतू शकते. माहिती मिळाल्यावर दुर्घटना रोखण्यासाठी आटापिटा करणे, नागरिकांची सुरक्षा, गुन्हेगारांचा शोध या अनुषंगाने पोलिसांना विचार करावा लागतो.

या प्रकरणात ठाणे शहरातील “विवियाना मॉल’च्या शौचालयात सिद्धिविनायक मंदिर उडवून देण्याचा संदेश लिहिण्यात आला होता. “गज्वा-ए-हिंद, दादर सिद्धिविनायक मंदिर बूम… इसिस इज कमिंग, स्लीपर सेल इज ऍक्‍टिव्हेटेड’, असा संदेश आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. या संदेशासह एका मुलीचा आणि मुलाचा मोबाइल क्रमांक लिहिला होता. या मोबाइल क्रमांकाचा शोध घेतल्यानंतर आपल्या आधीच्या प्रियकराचे हे कृत्य असू शकते, अशी शक्‍यता मुलीने वर्तवली. ठाणे पोलिसांनी एका संशयित तरुणाला ताब्यात घेतले. एकतर्फी प्रेमातून आपणच हा खोडसाळपणा केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्याला एका मुलीला त्रास द्यायचा होता म्हणून त्याने हा सगळा प्रकार केल्याचे समोर आले. या तरुणाने धमकीचा मेसेज लिहून त्याखाली मुलीचा मोबाईल नंबर लिहिल्याचे सांगितले.

समाजात नियमित घडणारे गुन्हे, काही प्रलंबित प्रकरणे आदी गोष्टींच्या व्यस्ततेत “बॉम्ब’ या शब्दाचा शिरकाव झाल्यावर सतर्कता अधिक वाढते. बॉम्बच्या नावे खेळ खेळणाऱ्या बिनडोकांसाठी अशा गोष्टी नगण्य असतील. हेच बॉम्ब कोणाचा काळ ठरू नये यासाठी पोलीस या घटकालाच धावपळ करावी लागते. ती केल्यावर मिळालेली सूचना फसवी होती, हे कळल्यावर त्यांच्या मनाची स्थिती काय होत असेल? हे समजले जाऊ शकते. अशा अफवा अतिरेक्‍यांच्या पत्थ्यावर पडणाऱ्या ठरू नयेत. मात्र हे बिनडोकांच्या गळी उतरवणे हे आव्हानच आहे.

मुंबईतील हे मंदिर सुप्रसिद्ध असून त्याठिकाणी प्रतिदिन असंख्य भाविकांची गर्दी असते. तसेच दर मंगळवार, संकष्टी आदी वेळीही भाविक बहुसंख्येने मंदिरात येत असतात. एकतर्फी प्रेमात आंधळा झालेला मनुष्य कशा प्रकारे वागू शकतो? त्यातूनच प्रसिद्ध गोष्टींकडे लक्ष वेधणारी कृती कशी करू शकतो? हा एकच विचार डोक्‍यात सतत चालू असल्यास काय होऊ शकते? याचे हे प्रकरण एक उदाहरण आहे.

अलिकडच्याच वर्षांत एका युवकाने एकतर्फी प्रेमातून असाच बिनडोकपणा केला होता. त्याने चेन्नई विमानतळावर अतिरेकी आक्रमण होण्याची चेतावनी दिली होती. याविषयीही पोलिसांनी शोध घेतल्यावर ही चेतावनी खोटी असल्याचे लक्षात आले. एकतर्फी प्रेमाची धुंदी असलेले केवळ स्वतःचाच विचार करत असतात. त्यांना स्वतःच्या स्वार्थापुढे अन्य काहीच दिसत नाही. अशा प्रेमप्रकरणातून सार्वजनिक गोष्टींना अडचणीत आणण्याचे प्रकार होणे घातकी आहे. महानगरातील पोलिसांना कायम सतर्कच असावे लागते. त्यामुळे कोणी अशाप्रकारे बिनडोकपणा जरी करत असले, तरी आरंभी त्या गोष्टीवर विश्‍वास ठेवून वर्तवलेल्या घटनेच्या दृष्टीने माग घ्यावा लागतो. कारण असंख्य लोकांच्या जीवनाचा प्रश्‍न असतो. त्यामुळे पोलीस चुकत आहेत, असे म्हणताच येणार नाही.

एकतर्फी प्रेमात आकंठ बुडालेल्या व्यक्‍तीला केवळ एका व्यक्‍तीचाच विचार असतो. तो विचार त्याच्याकडून चुकीची कृती करवून घेत असतो. एवढे समजण्याएवढी बुद्धी चालवावी असेही होत नाही. अशा गोष्टींना मानसिक विकृतीच म्हणता येईल. यातून बाहेर पडण्यासाठी त्याला स्वतःलाच संघर्ष करावा लागणार आहे. शारीरिक आजार, त्रास औषधांनी बरे होतात, नियंत्रणात राहू शकतात. मानसिक तणावातून बाहेर पडता आले नाही, तर अशा व्यक्‍ती स्वतःला इजा पोहोचवून घेणे, अविचारीपणे वागणे अशा कृती करू लागतात. प्रेम प्रकरणे म्हणजे भावनिक गोष्टी होय. दोन्ही बाजूंनी एकमेकांविषयी समान विचार होत असेल तर ठीक आहे. अन्यथा त्या गोष्टी एकतर्फीच चालू राहतात.

अतिरेकी काश्‍मीर खोरे, सीमेवर घातकी कारवाया करत आहेत. मात्र त्यांचे जाळे देशातही सर्वदूर पसरलेले आहे. पोलीस त्यांना मिळत असलेल्या सूचनांवरून कारवाई करून संबंधितांच्या मुसक्‍या आवळतात, तेव्हा लक्षात येते की हे कुठपर्यंत पोचलेले आहेत. अशा गोष्टींच्या बाबतीत देशातील वातावरण संवेदनशील आहे. पोलिसांना सहकार्य करण्याऐवजी त्यांच्याशीच खोडसाळपणा करणे, हे निश्‍चितच खटकणारे आहे.

सैनिक, देशप्रेमी नागरिक आदी मंडळींचे देशावर प्रेम असते. त्यासाठी ते प्रसंगी प्राणार्पणही करतात. देशासाठी लढले, प्राणार्पण केले तर हुतात्मा झाल्यावर नागरिक ते बलिदान कायम लक्षात ठेवतात. त्या घटनेपासून इतरांनाही प्रेरणा मिळते. एकतर्फी प्रेम वगैरेसारख्या वायफळ गोष्टींसाठी स्वतःचा जीव गमवणारे, दुसऱ्यावर घातक आक्रमण करणारे युवकही या समाजात आहेत. त्यांच्याविषयी समाजात काय चर्चा चालू असते? हे सूज्ञास अधिक सांगणे न लागे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)