विज्ञानविश्‍व : उद्याची ऊर्जा

-डॉ. मेघश्री दळवी

आज जगाची उर्जेची गरज आहे वर्षाला 26 हजारांहून अधिक टेरावॅट-तास. त्यातला मोठा वाटा आहे कोळसा वापरून औष्णिक विद्युतनिर्मिती करणाऱ्या केंद्रांचा, सुमारे 38 टक्‍के. त्यानंतर क्रमांक लागतो नैसर्गिक वायू वापराचा आणि त्याखालोखाल जलविद्युतनिर्मितीचा. केवळ 10 टक्‍के ऊर्जा अणुविद्युतकेंद्रांपासून मिळवली जाते, तर अपारंपरिक ऊर्जानिर्मितीचा वाटा आहे फक्त 11 टक्‍के. मात्र हे चित्र लवकरच बदलत आहे.

खनिज इंधने आपल्याला फार काळ पुरणार नाहीत, आणि त्यांच्या वापराने प्रदूषणात मोठी भर पडते. त्यामुळे बहुतेक नवी केंद्रं उभी राहत आहेत ती स्वच्छ ऊर्जानिर्मितीची. जलविद्युत निर्मिती स्वच्छ असली तरी ती उभारताना धरणाखालची जमीन, गावकऱ्यांचे विस्थापन, एकूण खर्च, लागणारा वेळ हे लक्षात घेता अपारंपरिक ऊर्जानिर्मिती वाढवण्याकडे आता कल दिसून येतो. त्यामुळे उद्याची ऊर्जा असेल ती मुख्यत: नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून नूतनीकरणीय (रिन्यूएबल) स्रोतांपासून मिळवलेली ऊर्जा. त्यात मोठा सहभाग असेल तो सौरऊर्जा, पवनऊर्जा, आणि बायोमास यांचा. सोबत भूगर्भातील उष्णता वापरून, सागरातील लाटांचा वापर करून, आणि भरती-ओहोटीच्या मदतीने लहान प्रमाणात ऊर्जानिर्मिती होत राहील.

येत्या पाच वर्षांमध्ये अपारंपरिक ऊर्जेचा वाटा 13-15 टक्‍के होईल असा अंदाज आहे आणि तो वेगाने वाढत जाणार आहे. याही पुढचा टप्पा आहे तो खनिज इंधने पूर्णपणे टाळून केवळ बाकीच्या स्रोतांपासून विद्युतनिर्मिती करणे. हे लक्ष्य स्वप्नवत वाटले तरी काही देश खरोखरच या दिशेने प्रयत्न करत आहेत. चीन आज पवनउर्जेचा वापर करणाऱ्या देशांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. शिवाय सौरउर्जेच्या वापरात आघाडीवर आहे. भारतात भरपूर सूर्यप्रकाश जवळजवळ वर्षभर मिळत असल्याने आपल्यालाही सौरउर्जेवर जास्त भरवसा ठेवता येईल. येत्या आठ वर्षांत 60 टक्‍के विद्युतनिर्मिती अपारंपरिक पद्धतीने व्हावी असे भारताचे धोरण आहे.

बरेचसे युरोपीय देश येत्या 20 ते 30 वर्षांत खनिज इंधनाचा वापर पूर्णपणे थांबवणार आहेत. देश छोटे असल्याने निमशहरी भागात पवनचक्‍क्‍या बसवून पवनउर्जेचा वापर त्यांना उपयुक्‍त ठरत आहे. ब्रिटन हे बेट असल्याने तिथे किनाऱ्यालगत मोठमोठ्या तरंगत्या पवनऊर्जा केंद्रांच्या योजना आकार घेत आहेत. तरंगत्या सौरऊर्जा केंद्रांमध्ये देखील तिथे भरपूर गुंतवणूक होत आहे.

जर्मनीत कोळशावर चालणारी औष्णिक विद्युतनिर्मिती अधूनमधून बंद ठेवून फक्‍त अपारंपरिक उर्जेचा वापर केला जातो. आइसलॅंडमध्ये गरम पाण्याचे झरे आणि ज्वालामुखी असल्याने त्यांना भूगर्भातील उष्णता जास्त आशादायक वाटते. विशेषत: गरम पाण्याच्या झऱ्यांमधले पाणी पाइपने घरापर्यंत नेणे त्यांना खूप सोपे पडते. हे पाणी खेळवून घर उबदार राखता येते. त्यामुळे हीटिंगसाठी विद्युतउर्जेची गरज भासत नाही. आइसलॅंडची जवळजवळ 100 टक्‍के ऊर्जानिर्मिती स्वच्छ आहे. खनिज इंधने तिथे अत्यल्प प्रमाणात वापरली जातात.

अलिकडे ब्रिटनने एक पूर्ण आठवडा कोळशावरची औष्णिक विद्युतनिर्मिती बंद ठेवून दाखवली आहे. तर कोस्टा रिकाने सलग 300 दिवस केवळ अपारंपरिक उर्जेवर काम भागवले आहे. हे शक्‍य आहे हे सिद्ध झाल्याने उद्याची ऊर्जा नूतनीकरणीय (रिन्यूएबल) स्रोतांपासून मिळवलेली असेल यात संदेहच नाही.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)