कलंदर : चील एन्ट्री, कूल एक्‍झिट…

-उत्तम पिंगळे

गेल्या आठवड्यात मनमोहन सिंग राज्यसभेतून पायउतार झाले. मी प्राध्यापक विसरभोळ्यांकडे गेलो. यांनी एक विस्तृत विवेचन दिले. ते म्हणाले की, कॉंग्रेसकडे आसामात बहुमत नसल्याने ते पुन्हा तेथून राज्यसभेवर येऊ शकत नाहीत. 1991 ते 2019 राज्यसभा सदस्य, 1982 ते 85 रिझर्व्ह बॅंक गव्हर्नर, पुढे त्या वेळच्या नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष होते. सध्या अधिवेशन चालू नसल्याने त्यांचा निरोप समारंभही रितसर झाला नाही.

नरसिंह राव पंतप्रधान असताना देशाची आर्थिक स्थिती भयावह झाली होती. परकीय गंगाजळीही रसातळाला गेली होती. अशा वेळी अंतर्गत विरोधाला न जुमानता (स्ट्रक्‍चरल रिफॉर्म्स ) संरचनात्मक सुधारणा व उदारीकरण (लिबरलायझेशन) यांना त्यांनी पुढे केले. अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत करण्याकडे त्यांनी पावले टाकण्यास सुरुवात केली. देशाची पत गेलेली असताना अर्थव्यवस्थेला मूळ रुळावर आणण्याचे मोठे कार्य करावयाचे होते. परवानाराज व लाल फितीत सर्व अडकल्याने परदेशी उद्योजकही गुंतवणुकीत रस दाखवत नव्हते. त्यापूर्वी चंद्रशेखर पंतप्रधान असताना आपल्याला जागतिक बॅंकेकडे सोने तारण ठेवावे लागले होते. म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेवर कुणाचाच विश्‍वास राहिला नव्हता. अशा वेळी अर्थव्यवस्थेस दिशा दाखवण्याचे काम त्यांनी केले.

2004 साली ते देशाचे 13 वे पंतप्रधान झाले. सोनिया गांधींनी त्यांचा आतला आवाज ऐकला व अपघाताने मनमोहन सिंग पंतप्रधान झाले. त्यांच्या कारकिर्दीबाबत खूप काही बोलले जाते. विरोधकांनी त्यांच्या कारकिर्दीत झालेले कित्येक घोटाळे निवडणुकीसाठी समोर आणले होते. अशा घोटाळ्यांची विरोधकांनी यादीच केली होती. उदाहरणार्थ, टू जी घोटाळा, कोळसा खाण कंत्राटातील घोटाळा, कॉमनवेल्थ गेम घोटाळा इ. असे असले तरी व्यक्‍तिश: त्यांच्यावर आरोप झालेले नाहीत. विरोधक आजही त्यांना व्यक्‍तिश: प्रामाणिकच मानतात.

त्यांची दुसरी बाजूही पाहणे इष्ट ठरेल. त्यांच्या कारकिर्दीमध्ये काही मोठे निर्णय व योजनाही कार्यान्वित झाल्या. उदा. ग्रामीण आरोग्य चळवळ, यूआयडी संस्था. ग्रामीण रोजगार हमी योजना, अणुकरार अशा अनेक महत्त्वाच्या योजना व करार कार्यान्वित केले. त्यांच्यावर कितीही आरोप केले तरी त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेला रुळावर आणले हे कुणीही नाकारू शकत नाही. अपघाताने ते प्रधानमंत्री झाले; पण त्यांनी वैयक्‍तिक काही अपेक्षा ठेवली नाही. अर्थमंत्रीही ते ऍक्‍सिडेंटली झाले; पण त्यावेळच्या भविष्यकाळात होऊ घातलेल्या डिझास्टरला त्यांनीच टाळले हे नमूद करावेच लागेल.

Leave A Reply

Your email address will not be published.