विविधा : रामचंद्र गुंजीकर

-माधव विद्वांस

मराठीतील “मोचनगड’ या पहिल्या ऐतिहासिक कादंबरीचे जनक रामचंद्र भिकाजी गुंजीकर यांचे आज पुण्यस्मरण (निधन 18 जून 1901). त्यांचा जन्म 10 एप्रिल 1843 रोजी बेळगाव जिल्ह्यातील जांबोटी येथे झाला. त्यांचे मूळ उपनाव केंकरे, परंतु वतनगावावरून त्यांचे घराणे “गुंजीकर या आडनावाने प्रसिद्धीस आले. हुबळी येथील इंग्रजी शाळेचे हेडमास्तर, बेळगाव जिल्ह्याचे असि. डे. ए. इन्स्पेक्‍टर अशा जागांवर त्यांनी कामं केले. वर्ष 1898 मध्ये सेवानिवृत्तीनंतर मुंबईस येऊन स्थायिक झाले.

त्यांना मराठी लघुलिपीचे आद्य उत्पादक मानले जाते. ते बहुभाषिक होते, त्यांना मराठी, संस्कृत, इंग्रजीबरोबरच गुजराथी, कानडी व बंगाली याही भाषा अवगत होत्या. त्यांना लेखनाची आवड असल्याने वृत्तपत्रातून (1866) ते लेख लिहू लागले. ब्रिटनमधील इंग्रजी नियतकालिकांप्रमाणे मराठीतही ज्ञानोपयोगी मासिक असावे असे त्यांना वाटे आणि त्यातूनच विविध ज्ञानविस्तार हे मासिक त्यांनी वर्ष 1867 मध्ये सुरू केले. त्यावेळी ते सरकारी नोकरीत असल्याने त्यांचे नाव अंकावर छापण्यात आले नव्हते. पहिल्या अंकात त्यांनी या मासिकात नानाविध विषयांचा संग्रह केला जाईल, तसेच शास्त्रीय विषय, देशज्ञान, विख्यात पुरुषांची चरित्रे, नवीन पुस्तकांचे गुणावगुणविवेचन, नीतिवादाचे निबंध इत्यादी अनेक विषयांची माहिती दिली जाईल याची वाचकांना कल्पना दिली होती व त्याप्रमाणे माहिती संकलन करून अनेक नावीन्यपूर्ण व विविध माहिती वाचकांना देऊ लागले.

1867 ते 1874 या सात वर्षांच्या कालखंडात त्यांनी संपादकाची जबाबदारी पार पाडली. अनेक व्यासंगी विद्वानांचे सहकार्य मिळवून त्याकाळातील उच्च दर्जाचे ज्ञानप्रसारक नियतकालिक अशी ख्याती झाली. या मासिकातील निवडक लेख, संकलित लेख 1942 मध्ये प्रकाशित खंडात याचा समावेश आहे. मुख्यत्वेकरून मराठी भाषा, काव्य, व्याकरण यावर त्यांनी विस्तृतपणे विवेचन केले. देशभाषांची दुर्दशा, आपल्या भाषेची स्थिती, आपल्या भाषेचे पुढे काय होणार? या लेखांमधून मराठी भाषेबद्दल त्यांची तळमळ जाणवते. त्यांच्या चार स्नेह्यांनी 1871 साली मुंबईत सुरू केलेल्या “दंभहादक’ या मासिकासाठीही त्यांनी काही लेखन केले. याबरोबरच त्यांचे स्वतंत्र ग्रंथलेखनही चालू होते.

मोचनगड (ऐतिहासिक कादंबरी, 1871), गोदावरी (अपूर्ण), अभिज्ञान शाकुंतल (भाषांतर, 1870), विद्यावृद्धीच्या कामी आमची अनास्था (व्याख्यान, 1887), सरस्वती मंडळ (1884), भ्रमनिरास (1884), सौभाग्यरत्नमाला (1886), कौमुदीमहोत्साह, भाग-1 (भट्टोजी दीक्षित यांच्या ‘सिद्धान्तकौमुदी’ या व्याकरणग्रंथाचे भाषांतर, खंड 1, 2, 3 -1877; 4, 5 -1878; भाग 6-1879), सुबोधचंद्रिका (भगवद्‌गीतेवरील मराठी टीका, 1884), रामचंद्रिका, कन्नडपरिज्ञान (1895), लाघवी लिपी किंवा अतित्वरेने लिहिण्याची युक्‍ती (1878) अशी त्यांची ग्रंथ संपदा आहे. 1877 साली त्यांनी रा. रा. काशीनाथ पांडुरंग परब यांच्या सहकार्याने “कौमुदी महोत्सव’ नावाचे भट्टोजी दीक्षित यांच्या सिद्धांत कौमुदीचे भाषांतररूप त्रैमासिक सुरू केले. “रामचंद्रिका’ संस्कृत शब्दरूपावली त्यांनी प्रसिद्ध केली.

भगवद्‌गीतेचे सुबोध भाषांतर त्यांनी प्रसिद्ध केले. शेक्‍सपिअरकृत “रोमिओ अँड ज्युलिएट’ या नाटकाचे त्यांनी “रोमकेतु विजया नाटक’ हे नाव देऊन भाषांतरित करून विविध ज्ञानविस्तारमधून प्रसिद्ध केले. कानडी भाषा शिकता यावी म्हणून त्यांनी “कन्नडपरिज्ञान’ पुस्तक लिहिले. तसेच पिट्‌मनच्या लघुलेखन पद्धतीवरून त्यांनी मराठीत लाघवी लिपी अथवा अतित्वरेने लिहिण्याची युक्‍ती काढली. मराठीतील त्यांची दुसरी प्रसिद्ध झालेली पुस्तके “महाराष्ट्र भाषेची लेखन शुद्धी’ (आवृत्ती दुसरी) आणि “मराठी सुबोध व्याकरण’ ही होत. या मराठी भाषा तज्ज्ञास अभिवादन.

Leave A Reply

Your email address will not be published.