अभिवादन : राणी लक्ष्मीबाई

-विठ्ठल वळसेपाटील

मनकर्णिका लहानपणापासून घोडेस्वारी, युद्धकला यात पारंगत होती. हुशार व चाणाक्ष होती. याशिवाय संस्कृत व मोडीलिपीही शिकलेली होती. मनू 7 वर्षांची झाली आणि झाशी संस्थानचे संस्थानिक गंगाधरपंत नेवाळकर यांच्याशी 1842 ला विवाहबद्ध झाली. आता मनू राणी लक्ष्मीबाई झाली. हळूहळू झाशीचा कारभार पाहू लागली.

दुर्दैवाने झाशीचा वारस तीन महिन्यांचा असताना निधन पावला. राज्याला वारस म्हणून दामोदर नेवाळकर यास दत्तक घेतले. गंगाधरपंत मनाने पार खचून गेले होते. त्यात 21 नोव्हेंबर 1853 साली त्यांनी देह ठेवला.अशावेळी राणी लक्ष्मीबाई राज्यकारभार पाहू लागल्या. राणी लक्ष्मीबाईंवरील संकटाचा ससेमिरा संपत नाही तोच 1854 साली ब्रिटिशांनी दत्तक वारसा नामंजूर कारण देत झाशीचे संस्थान खालसा केले.

त्यावेळी ब्रिटिश अधिकारी मेजर एलिस लक्ष्मीबाई यांना भेटण्यासाठी आला. तेव्हा झाशीच्या राणीने एलिसवर “मेरी झाशी नहीं दूँगी!’ अशी गर्जना केली. 1857 च्या सुरुवातीला देशभर राजकीय, आर्थिक, सामाजिक, धार्मिक व लष्करी असंतोष तसेच खालसा केलेल्या संस्थानचे संस्थानिकांमध्ये असंतोष होता. केवळ 35 शिपायांनी जून 1857 ला झाशीत उद्रेक केला.

21 मार्च 1858 रोजी सर ह्यू रोज फौजेनिशी झाशीजवळ आला. यावेळी राणीने तात्या टोपेंशी संधान बांधून त्यांना एका बाजूने इंग्रजांवर हल्ला करण्यास सुचवले. 11 दिवसांच्या झुंजीनंतर राणीने झाशी सोडण्याचा निर्णय घेऊन दामोदरला पाठीशी बांधून 200 सहकाऱ्यांबरोबर झाशी सोडली. राणी अशा बिकट अवस्थेत रावसाहेब पेशव्यांसमोर उभी राहिली.

त्यावेळी तात्या टोपेंची भेट झाली. पुढे राणी आणि रावसाहेब युद्धाची तयारी करत आहेत हे समजताच अखेर राणी व ब्रिटिश सैन्यात लढाई होऊन राणीचा पराभव झाला. आत्मविश्‍वासाने, स्वकर्तृत्वाने, चातुर्याने, पराक्रमाने, स्वाभिमानासह, स्वराज्यासाठी ब्रिटिशांशी असामान्य असा लढा देत अखेर या जगाचा राणीने निरोप घेतला. तिच्या पराक्रमाने 1857 चे स्वातंत्र्य समर आजरामर झाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.