स्वागत पुस्तकांचे : हे बंध वेदनेचे

-विजय शेंडगे

सुरेश भट हे गझलेचे खऱ्या अर्थाने जनक. पुढे डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णी, गझलगंधर्व सुधाकर कदम, भीमराव पांचाळे, प्रदीप निफाडकर अशा अनेकांनी मराठी गझल समृद्ध केली. डॉ. अविनाश सांगोलेकर यांनी गझलेच्या पायवाट अधिक ठळक केल्या. ज्यांनी निष्ठेने आणि नियमितपणे गझल लिहिली त्यात बबन धुमाळ यांचे नाव नक्‍कीच घ्यावे लागेल. शेतीतील दुष्काळ, शेतकऱ्याचं दैन्य त्यांनी जवळून पाहिले आहे. ते पाहता पाहता त्यांच्या काळजात कवितेने आकार घेतला. त्या कवितेची गझल झाली आणि नव्या दमाचे गझलकार म्हणून बबन धुमाळ आकार घेऊ लागले.

“हे बंध वेदनेचे’ हे गझल संग्रह पुस्तक एका परिघात अडकत नाही. ती जीवनावर भाष्य करते. ती दुष्काळावर भाष्य करते. ती समाजातल्या दांभिकपणावर बोट ठेवते. ती गटातटाच्या राजकारणावर ताशेरे ओढते. ती मानवी जीवनाचे सर्व कानेकोपरे आपल्या कवेत घेते. त्यातले दाहक वास्तव शब्दामध्ये बांधू पाहते.

जेष्ठ कवी उद्धव कानडे यांची प्रस्तावना या गझल संग्रहाला लाभली आहे. चौसोपी वाडे गेले. कुटुंबे लहान झाली. प्रत्येकाचे वासे वेगळे झाले. घरांचा पसारा कमी झाला. उंची वाढली. एकावर एक सिमेंटच्या भिंती चढल्या. त्यात त्या भिंतीत प्रेम, जिव्हाळा, आपुलकी दबली आणि माणुसकीच मोकळं आभाळ, त्या आभाळातले प्रेमाचे चांदणही त्या उंच भिंतीत हरवले ही खंत ते मांडतात.

साधी सोपी भाषा हे बबन धुमाळ यांच्या गझलेचे बलस्थान आहे. एके ठिकाणी जाती भेदावर भाष्य केले आहे. जातीभेदामुळे माणुसकीवर जो काळोख दाटला आहे तो दूर व्हायचा असेल तर रात्र गेली पाहिजे असे ते म्हणतात. या गझल संग्रहात प्रत्येक पानावर अनेक सौंदर्यस्थळं आहेत. त्यासाठीच हा गझल संग्रही बाळगणे हेच उत्तम.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.