मायक्रो स्क्रीन : निर्भया

-माधुरी तळवलकर

‘दिल्ली क्राइम’ ही टीव्ही मालिका नेटफ्लिक्‍सवर पाहिली. दिल्लीमध्ये 16 डिसेंबर 2012 या दिवशी एका मुलीवर बसमध्ये सामूहिक बलात्कार झाला. त्या विकृत लोकांनी तिला रस्त्यावर फेकून दिले. इतक्‍या क्रूरपणे दिल्लीच्या भर रस्त्यातील बसमध्ये असा निर्घृण प्रकार घडावा या “निर्भया’ घटनेमुळे संपूर्ण देश त्या वेळी हादरला. नंतर काही मुलाखती, टीव्ही मालिकांमध्ये हा विषय दाखवला गेला. पण “दिल्ली क्राइम’ ही वेबसीरिज फार गांभीर्यपूर्वक तयार केली आहे.

हा विषय प्रक्षोभक असूनही चित्रपटाची हाताळणी समंजसपणे केली आहे. या प्रकरणात बसमधे ड्रायव्हरसकट सहाजण होते. हे सहाजण एकमेकांना नीटसे ओळखत नव्हते. झारखंडपासून वेगवेगळ्या भागातून ते दिल्लीत रोजीरोटीसाठी आलेले होते. अशिक्षित, गरीब, शहरात ना त्यांच्या ओळखीपाळखी होत्या, ना कुणाचे कुटुंब होते. त्यामुळे ह्या सहाजणांना शोधून काढणे महाकठीण काम होते. मात्र, अनेक अडचणींवर मात करून दिल्ली पोलिसांनी या गुन्ह्याचा पाच दिवसांत छडा लावला व यातले सहाही गुन्हेगार जेरबंद केले.

“दिल्ली क्राइम’ ही सात भागांची मालिका आहे. रात्रंदिवस मेहनत घेऊन पोलिसांनी हे आरोपी कसे शोधून काढले हा या मालिकेचा मुख्य विषय. गाड्या, माणसे यांनी ओसंडून जाणारे रस्ते, धुरकट वातावरण यांनी मालिकेची सुरुवात होते. हिंदी फिल्मी गाणी हा भारतीयांच्या जीवनाचा अविभाज्य भाग. त्याचाही इथे बरोबर उपयोग करून घेतला आहे. घर, दुकान, गल्लीबोळ, हॉटेल, शहर, गाव सगळीकडे कुठेतरी लावलेली हिंदी गाणी मधूनमधून ऐकू येत राहतात.

निर्मिती, दिग्दर्शन आणि पटकथा लेखन रिचा मेहता यांचे आहे. कमी शब्दांत, सूचक संवादांमधून कथानक उलगडत जाते. शेफाली शहा हिने यात संवेदनशील डीसीपीची भूमिका केली असून तिच्या मार्गदर्शनाखाली या केसचा तपास होतो आहे. या अत्याचारात “निर्भया’ची आतडी आरोपींनी बाहेर काढलेली आहेत. शरीरांतर्गत अवयवांना खूप दुखापती झाल्या आहेत. त्यातच नंतर दिल्लीच्या लोकांनी पुष्कळ मेणबत्त्या लावल्या असल्या तरी, ही मुलगी व तिचा मित्र रक्‍तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर पडलेले असताना त्यांच्या मदतीला कोणीही पुढे येत नाही. ती शूर होती. तिने प्राणपणाने केलेल्या प्रतिकाराने चिडूनच आरोपींनी तिच्यावर जास्त अत्याचार केले असे नंतर आरोपींनी सांगितले. मरणासन्न अवस्थेतसुद्धा, ह्या मुलीने तिच्याबाबतीत काय घडले, त्या सहाजणांची नावे काय होती, याची जबानी मरण्यापूर्वी व्यवस्थित दिली.

इथून पुढे सुरू होते पोलिसांची अविरत प्रयत्नांची पराकाष्टा! जवळ कसलेही संदर्भ, पुरावे नसताना, आरोपींची फक्‍त पहिली नावे (तीही कॉमन!) कळल्यावर त्यावरून त्यांचा तपास सुरू होतो. मालिका पाहताना यातले कुणीही नटनटी वाटतच नाहीत. यातील सर्वच कॅरॅक्‍टर्सची देहबोली, दिसणे सर्वसामान्य आहे. कॅमेरावर्क तर इतके अप्रतिम साधले आहे की, समोरची दृश्‍ये चित्रित केली आहेत असे वाटतच नाही. आपल्यासमोर या घटना घडताहेत असे वाटावे इतकी ही मालिका परिणामकारक आणि वास्तववादी झाली आहे.

भारताच्या अफाट लोकसंख्येमुळे व्यवस्थेवर नेहमीच ताण पडतो. पोलिसांवरही कामाचा असह्य भार आहे. अशा दमल्याभागल्या लोकांकडून बसेसची तपासणी बारकाईने होणार कशी? हा मुद्दा दिग्दर्शक अलगद आपल्यापर्यंत पोहोचवते. सर्व आरोपींना अटक केल्यावर एक पोलीस सुस्कारा टाकत म्हणतो, “नशीब, यात कुणी श्रीमंत तालेवार लोकांची पोरं नव्हती!’ या वाक्‍याबद्दल सूज्ञांस अधिक सांगणे न लगे. थोडक्‍यात, लक्षपूर्वक पाहावी, ऐकावी अशी ही ‘दिल्ली क्राइम’ वेबमालिका आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.