संडे स्पेशल सांजसोबतीची भेट…

-अशोक सुतार

हळूहळू सांज मोहराया लागते अन्‌ सोनेरी स्वप्नांची उधळण सुरू होते. क्षितिजापल्याड सोनचाफा निरोप घेण्याच्या तयारीत. आठवणीचे पक्षी मनाच्या क्षितिजावर लयदार नक्षीकाम करीत विहारत आहेत. लय, तोल आणि ताल यांचे भान राखत पक्ष्यांनी थेट चाफ्याची माळ तयार केली आहे. क्षितिजावर लाल-पिवळ्या, नारंगी छटा खुलून दिसत आहेत. त्यावर काही गहिरे रंगही ठळकपणे जाणवत आहेत. मन असं वढाय की, गहिऱ्या रंगात रेंगाळत राहतं. मनाची स्पंदने कोणाला सापडली आहेत? ती वरखाली गिरक्‍या घेत असतात. दाट गहिऱ्या रानात मन विसावलेले असते, तेव्हा सुरांचे पक्षी गात नाहीत, हृदयाच्या तारा झंकारत नाहीत. पक्षी सैरभैर होतात, तिचं अस्तित्व नाकबूल करतात. पक्ष्यांच्या कल्लोळात गाण्यांचे सूर कुठे लुप्त झाले? मनाचे आभाळ करड्या, गर्द किरमिजी उदासवाण्या रंगांनी भरून गेले आहे. कुठेतरी ढगांवरील सोनेरी रंगाच्या कडांचा तेवढाच काय तो दिलासा! तेव्हा ती विजेच्या पावलांनी कल्लोळ करत येते आणि सुरू होतं तिचं अस्तित्व.

कधी ती धुक्‍यातल्या परीसारखी येते. शब्दांनाही हलकेच मोहर फुटतात. दाट धुक्‍यातल्या वनराईत, ती गंध उधळत येते आणि स्वरांनी पुन्हा आभाळ फुलून जाते. स्वरांचे पक्षी क्षितिजावर आले, ते आनंदाने बागडत आहेत. तिच्या सोनेरी पंखांवर खुलून दिसते मोरपिसांची सप्तरंगी नक्षी. केशसंभार सोडून ती मुक्‍तपणे विहारते. सृष्टीतील सर्व झाडे, वेली, पाणी, आकाश, जमीन आणि तिच्यात सामावलेला आहे. सूर्यनारायण क्षितिजाआड झाला तरी तिचे अस्तित्व नाचते माझ्या अवतीभोवती. तिच्यासाठी दोन शब्द लिहावेत अशी कोणती ओढ लागली मनास? तिने मला खूप काही दिलं, अगदी भरभरून. दुःखाच्या त्या सांजवेळी ती माझी समजूत काढायची. सांजेचे करडे किरमिजी उदासवाणे रंग लुप्त होतात आणि मन चैतन्याच्या गाभाऱ्यात तिची पूजा करण्यात मग्न! गाभाऱ्यात तिचे अस्तित्व पूर्वीपेक्षा स्पष्ट आकारास येत आहे.

सूर्य बुडाला तरी तिने सूर्याची सोनेरी किरणे पांघरली आहेत. किंबहुना तीच सूर्य झाली आहे. प्रतिभेचे लेणे, तिचे अस्तित्व कित्येकांना गवसले नाही. तिचे अंतरंग तर नाहीच नाही. पण तिची साथ अखंड सुरू आहे. सृष्टीतील निसर्गचक्र एखाद्‌वेळेस बदलेल, पण तिची आणि माझी भेट नेहमीचीच. कधी ती रुसते तर कधी आनंदाने बेहोश होऊन नृत्य करताना भासते. तिचा अबोलपण मी नाही सहन करू शकत, तो विरह मला नाही पेलवत. पण तीच जगण्याचे बळ देते.

शुभ सकाळी फुलांचा करंडा माझ्यासाठी घेऊन येते. शुभ्र, गुलाबी, पिवळ्या, जांभळ्या, लाल रंगाच्या फुलांनी वातावरण भारून जाते. फुलांच्या सुगंधाने सारे रान फुलून जाते. वाऱ्यालाही हेवा वाटावा असे गंधाळलेले श्‍वास सृष्टीत फुलले आहेत. तिचे जगणे सोशिक, कधी सोनेरी आभाळाचे पंख लेऊन तर कधी अंधाराचे काजळ डोळ्यात घालून. पण ती आश्‍वासक आहे, सगेसोयरे आणि आप्तांपेक्षाही अधिक! प्रीत आमुची युगायुगांची, भेट होई पुन्हा पुन्हा, अशी दाट खात्री आहे.

कधी धुक्‍यात अस्पष्टपणे तर कधी सोनपंखांचे लेणे मिरवत तर कधी काजळमायेच्या नजरेने ती माझ्यासोबत आहे. तिचा मी सदैव ऋणी राहीन, असे मी व्यवहारी जगाची रीत लक्षात घेऊन म्हटले तर तिला ते कदापि मान्य होणार नाही. तिच्यामुळेच जगणे सुसह्य आहे, नाहीतर… स्वार्थाने बरबटलेल्या या जगात मी तिचा हात हातात घेऊन मिरवला असता काय, तेही पूर्ण विश्‍वासानं!

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here