व्यक्‍तीवेध : माणुसकीचं नातं सांगणारा माणूस

-नारायण ढेबे

मारुती गावडे हे महाबळेश्‍वर इथले सामाजिक कार्य करणारे व्यक्‍तिमत्त्व. आपला दूध डेअरीचा व्यवसाय सांभाळून समाजसेवा करण्यात त्यांना जास्त रस आहे. लोकांना एकत्र करून नवीन नवीन उपक्रम करणारा हा माणूस. अंगाने थोडा जाड, साठीच्या वर असलेला हा रांगडा माणूस. अनेक वर्षे मुंबईत टॅक्‍सी चालवली आणि नंतर महाबळेश्‍वर इथे स्थायिक झाले. त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक माणसाला महाबळेश्‍वर दाखवायचं हा त्यांचा आवडता विषय तसेच प्रत्येकाचा पाहुणचार व्यवस्थित करायचा आणि मगच त्याला पाठवून द्यायचे. त्यांच्या स्वभावामुळे बाहेरचे लोक त्यांच्यावर प्रसन्न व्हायचे.

पुणे, मुंबई, कोकण या ठिकाणावरून येणाऱ्या लोकांना एकत्रित करून त्यांच्या मदतीने महाबळेश्‍वर येथे नव्याने मंदिर बांधायचा विचार गावडे यांनी इतर लोकांच्या बरोबरीने घेतला. त्यासाठी येथील तरुण लोक हाताशी घेतले. गोटे निरा जन्नी देवीचे मंदिर उभे राहिले. यासाठी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव यांच्यामागे ठामपणे उभे राहिले.

गावडे यांना लहान मुले आवडतात. ते बाहेर निघाले की त्यांच्याबरोबर दोन-चार बच्चे गाडीत फेरफटका मारायला जातात. आठ-दहा मुलांना खाऊ देऊन त्यांना काय हवे ते विचारणारे दादा हे एक वेगळेच व्यक्‍तिमत्त्व आहे.

पुणे-मुंबईवरून अनेक पाहुणे बोलवायचे, त्यांना महाबळेश्‍वरचा इतिहास, माहिती सांगायची आणि सलोखा, नातं, मैत्री निर्माण करायची असं आपले विश्‍व निर्माण करणारा हा वेगळा माणूस. या माणसाला मुक्‍तपणे संचार करायला फिरायला आवडते. त्यामुळे कधी पुण्याला, कधी मुंबईला तर कधी बाहेर कुठल्यातरी गावाला नेहमी फिरतीवर आणि माणसं जोडत फिरत राहणारा. त्यांच्या सहवासात एखादा माणूस आला की त्या माणसाची ते पूर्णपणे काळजी घेतात. त्याच्याशी एक अतूट असं नातं निर्माण करतात.

गावडे यांचा राजकारणाशीही संबंध आहे. महाबळेश्‍वर, पुणे, भोर, वेल्हा, मुळशी याठिकाणी देखील ते फिरत असतात. निष्ठेने काम करणारा, इतरांची काळजी घेणारा, इतरांना मार्गदर्शन करणारा हा माणूस अनेक नेत्यांच्या जवळचा झाला आहे. आता त्यांचा बराचसा व्यवसाय त्यांचा मुलगा किशोर हाच सांभाळतो. इतर नातलग आणि मित्र यांचा त्यांनी एक ग्रुप केला आहे. त्यामुळे नवीन पिढीतील व्यवसाय करणाऱ्यांचा एक ग्रुप निर्माण झालेला आहे. या सगळ्यांना एकत्रित ठेवण्याचे आणि मार्गदर्शन करण्याचे काम गावडे करतात.

खेड्यात राहून समाजकार्य करत शहरातील लोकांना खेड्याचं आकर्षण घडवून देणारा, खेड्याच्या मातीशी एकरूप राहणारा, पण शहरात अनेक वर्षे राहिल्यामुळे शहराशी वेगळ्या पद्धतीने संपर्क वाढवणारा, इतरांशी नातं निर्माण करून त्या धाग्यात बांधून ठेवणारा हा अवलिया जगावेगळा आहे. त्यांच्या बोलण्यात गोडवा, स्वभावात चांगुलपणा तसेच वागण्यात साधेपणा आहे. या माणसाच्यात अजून एक वेगळा गुण आहे. तो म्हणजे मार्केटिंग करणे आणि तेही मॉक मार्केटिंग (माऊथ पब्लिसिटी). कोणती गोष्ट कोठे मिळेल, चांगल्या वस्तू कोणत्या, चांगली माणसे कोणती, फसवी माणसे कोणती या सगळ्याचा अभ्यास गावडे यांना आहे.

पश्‍चिम महाराष्ट्रातील अनेक लोक त्यांच्याशी “दादा’ या आदबीनेच वागतात. समाजकारण, आदरातिथ्य करणे, गौरव करणे यामुळे ते इतरांच्या पेक्षा वेगळे आहेत. त्यांनी हे वेगळेपण जपलेले आहे. जुन्या आठवणींचा, संस्कारांचा ठेवा ते पुढील पिढीकडे निःसंकोच सुपूर्द करतात.

Leave A Reply

Your email address will not be published.