प्रेरणा : ‘ती’चे साहसी शिक्षण!

-दत्तात्रय आंबुलकर

पुणे जिल्ह्यातील वडगाव-मावळ परिसर दऱ्याखोऱ्यांनी व्यापलेला. शहराच्या जवळ असूनही प्रगतीपासून दूर असणारे तेथील वनवासी शिक्षणापासून तसे दूरच. शिक्षणाचे महत्त्व त्यांना अद्यापही पुरते पटलेले नाही. सुमारे 15 वर्षांपूर्वी स्थिती अधिकच वाईट होती. पंचक्रोशीतील मुले जेमतेम 8वी ते 10वी पर्यंत तरी शिकायचे, मात्र मुलींच्या शिक्षणाला तर 4थी नंतरच पूर्णविराम. याचदरम्यान परिसरातील माळेगाव-खुर्द येथील आश्रमशाळेत प्रमिला मनोहर भालके यांची नियुक्‍ती झाली व तेथील मुलींच्या शिक्षणाला नवी दिशा लाभली.

नियुक्‍तीनुसार माळेगाव येथील शाळेत त्या शिक्षिका म्हणून आल्या तेव्हा त्या भागात 4थी झालेल्या मुली मिळणे दुरापास्त होते. अशा आदिवासी मुलींना शिक्षित करायचेच या उद्देशाने प्रमिला मालके यांनी अशा मुलींसाठी पालक भेटीची सुरुवात केली. ग्रामीण पालक दिवसभर शेतात नाहीतर कामाच्या निमित्ताने जंगलात असत. त्यावर उपाय म्हणून भालके मॅडम संध्याकाळी मुलींच्या पालकांना भेटायच्या. त्यासाठी भजनी मंडळात पण सामील व्हायच्या.

एक शहरातील शिक्षित स्त्री आपल्यासारख्या ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणासाठी एवढे प्रयत्न करते याचे माळेगावच्या पालकांना, विशेषतः महिलांना मोठेच अप्रूप वाटायचे. कारण त्या भागात मुलगी वयात आली की लगेच तिचे लग्न करून दिले जायचे व न शिकलेल्या मुली घरी वा शेतातच काम करीत असत.

या साऱ्या पार्श्‍वभूमीवर भालके यांच्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे आपल्या मुलींनी पण मॅडमसारखे शिकावे असे वाटू लागले. त्यातही महिला पालकांनी आपल्या मुलींना शिक्षणासाठी शाळेत पाठवायचेच अशा निर्धारापोटी मुलींना शाळेत पाठविण्यास त्यांचे शिक्षण सुरू ठेवण्यास सुरुवात केली व मुलींच्या शिक्षणाला चालना मिळत गेली. परिणामी मुली हळूहळू 4थी नंतर 7वी पर्यंत शिकू लागल्याचे दृष्य माळेगावमध्ये दिसू लागले.

आपल्या शैक्षणिक प्रयत्नांच्या पहिल्या टप्प्याला यश मिळाल्याने उत्साहित झालेल्या भालके यांनी ग्रामीण व वनवासी विभागातील शाळा ही फक्‍त शिक्षण व विद्यार्थी केंद्रित न राहता एकूणच वनवासींच्या समाजोन्नतीचे केंद्र बनावे ही संकल्पना घेऊन आदिवासींसाठी असणाऱ्या विविध कल्याणकारी योजना उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सातत्यपूर्ण प्रयत्न करून त्यात यश प्राप्त करण्यात आले. या साऱ्या प्रयत्नांमुळे माळेगावच्या शाळेचे नाव सर्वदूर झाले. पुणे-मुंबईसह देश-विदेशातून शिक्षण क्षेत्राशी संबंधित जाणकार मंडळी शाळेला भेट देण्यासाठी आवर्जून येऊ लागली. यामध्ये फ्रान्स, जर्मनी, स्पेन, अमेरिका, कॅनडा या देशातील शिक्षणतज्ज्ञांचा समावेश असून काही फ्रेंच शिक्षणसेवक दरवर्षी महिनाभर येऊन गाव आणि शाळेतील काम करीत असतात.

माळेगावच्या या आगळ्या वेगळ्या ग्रामीण व वनवासी शाळेत आता डॉ. जनरल ब्रिगेडिअर शशिकांत पित्रे यांच्या संकल्पनेतून सैन्य प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी सैन्यदलातील एक निवृत्त मेजर शाळेच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना मार्गदर्शन करीत असतात.

आपल्या विशेष शैक्षणिक कामगिरी व योगदानाबद्दल प्रमिला भालके यांना विशेष पुरस्कार मिळाले असून त्यामध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन गौरव पुरस्कार, आंतरराष्ट्रीय महिला संघटन पुरस्कार, नेहान बिल्डर टीचर्स ऍवॉर्ड या पुरस्कारांचा प्रामुख्याने समावेश असून यापुढे पण आदिवासी मुलींना शिक्षणाच्या व विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रमिला भालके प्रयत्नशील आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.