विविधा : नारायणराव सावरकर

-माधव विद्वांस

लेखक, पत्रकार, कै. नारायणराव सावरकर यांची आज जयंती. स्वा. सावरकरांचे सर्व कुटुंब देशसेवेसाठी वाहिलेले होते. देशभक्‍त नारायणरावांचा जन्म 25 मे 1888 रोजी झाला. बालपणापासूनच आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांनी फक्‍त संकटांचाच सामना केला. त्यांचे मातृ-पितृ छत्र दैवाने लवकर हिरावून घेतल्यामुळे त्यांचे लालनपालन मोठे बंधू गणेशपंत तथा बाबाराव आणि त्यांची पत्नी येसूवहिनी यांनी आईवडिलांचे मायेने केले.

बाबाराव स्वतः देशभक्‍त असल्याने त्यांच्या भावालाही त्यांनी लहानपणापासूनच देशभक्‍तीचे संस्कार केले होते. लहानपणापासूनच ते सार्वजनिक कामात भाग घेऊ लागले. बाबा-तात्या या दोनही थोरल्या बंधूंप्रमाणे त्यांची वाटचाल सुरू होती. थोरल्या बंधूंकडून स्फूर्ती घेऊन त्यांनी “मित्रसमाज’ या विद्यार्थी संघटनेची स्थापना केली. नारायणराव उत्कृष्ट वक्‍ते, लेखक आणि इतिहासाचे अभ्यासक होते.

मॅट्रिकनंतर 1908 मध्ये ते उच्च शिक्षणासाठी बडोद्याला गेले आणि तेथे त्यांनी “अभिनव भारता’ची शाखा स्थापली. अभ्यास सांभाळून माणिकरावांच्या व्यायामशाळेत कुस्ती, मल्लखांब, लाठी इत्यादींचा चांगला सराव करून प्रावीण्यही मिळविले. सुट्टीत नाशिकला आल्यावर मित्रांबरोबर या विद्येबाबत ते चर्चा करीत असत. नाशिकमधल्या त्यांच्या मुक्‍कामात सैनिक संचलन, नेमबाजी नि भिंतीवर चढण्याची कला यांचाही सराव चालत असे. त्यांच्या मित्रसमाजाचे मित्रमेळ्याच्या साप्ताहिक सभा होत नि त्यात देशभक्‍ती विषयी चर्चा चाले.

नाशिकमध्ये नारायणरावांचे क्रांतीकार्य जोरात चालू होते. त्यामुळे वयाच्या केवळ अठराव्या वर्षीच “नाशिक कट’ अभियोगात नारायणरावांना सहा महिने कारावासाची शिक्षा झाली. त्यांना अहमदाबाद बॉम्बस्फोटात संशयित म्हणून पकडले; पण पुराव्याअभावी मुक्‍तता केली. ते घरी येऊन टेकतात, तर दोनच दिवसांनी 21 डिसेंबरला नाशिकलाच अनंत कान्हेरे यांनी जॅक्‍सनचा वध केला. त्याच रात्री नारायणरावांना पुन्हा पकडण्यात आले. त्यांची सुटका झाल्यानंतर त्यांना कोठल्याही महाविद्यालयात प्रवेश मिळेना. अखेरीस कोलकात्याला “नॅशनल मेडिकल महाविद्यालयात’ प्रवेश मिळाला. घरात आर्थिक चणचण होती. दोन्ही भाऊ अंदमानमध्ये तुरुंगात, त्यांच्यावरही सतत पाळत अशा परिस्थितीला तोंड देत त्यांनी व्यापारी पेढ्यांवर कारकुनाचे काम करीत वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. यावेळी त्यांना मॅडम कामा फ्रान्समधून आर्थिक मदत करीत होत्या.

वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यावर डॉ. नारायणरावांनी 1916 मध्ये मुंबईतच दवाखाना काढला. त्याच्या उद्‌घाटनासाठी साहित्यसम्राट न. चिं. केळकर आले होते. त्यांनाही डॉ. नारायणरावांच्या देशभक्‍तीचे कौतुक होते. दरम्यान वर्ष 1915 मध्ये त्यांचा विवाह झाला. व्यवसाय, प्रपंच, यांबरोबर गुप्तपणे क्रांतिकार्य आणि क्रांतिकारकांना साहाय्य अशी त्यांची त्रिसूत्री चालूच होती. अब्दुल रशीदने स्वामी श्रद्धानंदांची हत्या केल्यावर त्यांच्या स्मरणार्थ डॉ. ना. दा. सावरकरांनी “श्रद्धानंद’ नावाचे साप्ताहिक चालू केले. साप्ताहिकातील लेखनाचे पु. भा. भावे यांनी कौतुक केले होते.

30 जानेवारी 1948 ला गांधीजींची हत्या झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांच्या राहत्या घरावर गुंडांनी दगडफेक केली आणि आजारी असलेल्या डॉ. नारायणरावांना भयंकर जखमी केले. त्यातच ते बेशुद्ध झाले. तितक्‍यात पोलीस आल्याने त्यांचे प्राण वाचले. त्यांना के.ई.एम. रुग्णालयात भरती करावे लागले. त्यांना चौकशीसाठी अटक करायची असल्याने दवाखान्यातच त्यांच्यावर पहारा बसविण्यात आला होता. त्यांच्या चौकशीत काही निष्पन्न झाले नाही. मात्र झालेल्या हल्ल्यानंतर त्यांची तब्येत ढासळली. त्यातच त्यांना अर्धांगवायूचा झटका आला व ते बेशुद्ध पडले. 19 ऑक्‍टोबर 1949 ला त्यातच त्यांचे निधन झाले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here