विविधा : ज्ञानेश्‍वर नाडकर्णी

-माधव विद्वांस

पत्रकार, संपादक, लघुकथा लेखक, कादंबरीकार, चरित्रकार, समीक्षक ज्ञानेश्‍वर गणपत नाडकर्णी यांची आज जयंती. त्यांचा जन्म मुंबईत जोगेश्‍वरी येथे 21 मे, 1928 रोजी झाला. म. वा. धोंड, रघुवीर सामंत, वा. ल. कुलकर्णी यांच्यासारखे शिक्षक त्यांना लाभले होते. कला व नाट्य क्षेत्रातील समीक्षक म्हणून ते प्रसिद्ध होते.

विसाव्या वर्षीच त्यांच्या कथा नियतकालिकांमधून प्रकाशित होऊ लागल्या. “तुकाराम शेंगदाणे’ या टोपणनावाने ते लेखन करीत असत. त्यांनी सुरुवातीच्या काळात दोन बहिणी, कोंडी या दोन कादंबऱ्या व पाऊस, भरती हे कथासंग्रह लिहिले. “चिदघोष’ हा त्यांचा कथासंग्रह विशेष गाजला. त्यांच्या कादंबऱ्यांमधे मुंबईच्या उच्चभ्रू पारशी किंवा ख्रिस्ती समाजातील व्यक्‍तिरेखा असत.

इंग्रजीमध्ये एमए झाल्यावर वर्ष 1951 मध्ये ते लंडनच्या भारतीय दूतावासात रुजू झाले. मात्र तेथे ते रमले नाहीत. दोन वर्षांतच ते भारतात परतले आणि मुंबईतील महाविद्यालयांमध्ये 1956 पर्यंत त्यांनी इंग्रजीचे अध्यापन केले. त्यानंतर 1960 पर्यंत जाहिरातींचे कॉपीरायटिंग केले तसेच फ्री प्रेस जर्नलसाठी सहसंपादक म्हणून कामही पाहिले. 1961 ते 1968 या कालावधीमध्ये फिनान्शिअल एक्‍स्प्रेससाठीही काम पाहिले. त्याबरोबच त्यांचे इंग्रजी व मराठीतून नामांकित वृत्तपत्रातून, नियतकालिकातून माहितीपूर्ण लेख व समीक्षण प्रसिद्ध होऊ लागले. त्यांनी बालगंधर्वांचे इंग्रजीमध्ये चरित्र लिहून जगाला भारतीय कलाकाराची ओळख करून दिली.

प्रभावी इंग्रजी लेखनामुळे त्यांच्या कलासमीक्षण लेखांना सर्वत्र देशविदेशातही चांगला प्रतिसाद मिळत होता. 1986 साली फ्रान्स सरकारने त्यांच्या या कलाक्षेत्रातील कामगिरीची दखल घेऊन “अक्षरांचे शिलेदार’ हा किताब देऊन गौरव केला, तसेच ब्रिटिश सरकारनेही 1994 साली त्यांचा गौरवचिन्ह देऊन गौरव केला. ब्रिटिश सरकारने जगप्रसिद्ध शिल्पकार हेन्री मूर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त संपूर्ण वर्षभरासाठी एका महत्त्वपूर्ण प्रदर्शनाचे आयोजन केले होते.

या प्रदर्शनाच्या आयोजनामध्ये ब्रिटिश सरकारच्या विनंतीवरून ते लंडनला गेले होते. त्या प्रदर्शनाच्या पूर्वतयारीमध्ये नाडकर्णी यांनी मोलाचे योगदान दिले. यावरून त्यांच्या कार्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतलेली दखल व त्यांच्या कार्याची उंची लक्षात येते. त्यांनी अठराव्या वर्षी हातात घेतलेली लेखणी 64 वर्ष आयुष्याच्या अखेरपर्यंत सोडली नाही. त्यांनी कथा, कादंबरी, पर्यटन, चरित्र व समीक्षा या विषयांवर विपुल लेखन केले मात्र, ते समीक्षक म्हणून जास्त मान्यता पावले.

पुस्तके, चित्रपट, नाटके आणि चित्र यांविषयी समीक्षा करताना कोणताही आडपडदा ते ठेवत नसत. “अश्‍वत्थाची सळसळ’ हे त्यांचे समीक्षालेख खूपच गाजले. 1996 साली त्यांच्या कलासमीक्षणाचा गौरव करणारे एक प्रदर्शन जहांगीर कलादालनात आयोजित केले होते. त्यांच्या गौरवार्थ एम. एफ. हुसेन, अकबर पद्मसी यांच्यासह अनेक कलावंतांनी त्यांच्या कलाकृती या प्रदर्शनासाठी दिल्या होत्या. यावेळी नाडकर्णींनी युवा कलाकांरांसाठी ज्येष्ठ कलावंतांच्या नावाने 13 पारितोषिके जाहीर केली होती. त्यांचे 23 डिसेंबर 2010 रोजी निधन झाले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.