विज्ञानविश्‍व : हवामान बदलाचे संकट

-डॉ. मेघश्री दळवी

वन्य जीवनावरच्या माहितीपटांमधून सर डेव्हिड ऍटेनबरा यांचे दर्शन न घेतलेला माणूस विरळाच. या महिन्यात ते 93 वर्षांचे झाले. त्यातला 50 वर्षांहूनही अधिक काळ ते आपल्याला तऱ्हेतऱ्हेच्या प्राण्यापक्ष्यांच्या दुनियेत फिरवून आणत आहेत. आफ्रिकेच्या जंगलांपासून ते थेट अंटार्क्‍टिकाच्या हिमनगांपर्यंत.

त्यांचे नाव नेहमीच निसर्गसंवर्धनाशी जोडले गेले आहे. मात्र, जगाच्या पाठीवर अनेक ठिकाणी हिंडलेले सर ऍटेनबरा आजची परिस्थिती पाहून अत्यंत व्यथित आहेत. गेल्या 20 वर्षांमध्ये सर्वत्र प्रदूषण आणि ग्लोबल वॉर्मिंग या दुहेरी अस्त्रांनी निसर्गाची कधीही न भरून येणारी हानी केलेली आहे. ती सर ऍटेनबरा यांनी प्रत्यक्ष अनुभवलेली आहे आणि चित्रित करून ठेवलेली आहे. म्हणूनच हवामान बदल याच विषयावर त्यांनी आता एक मालिका केली आहे. त्याविषयी वेगवेगळ्या तज्ज्ञांबरोबर त्यांनी चर्चा करून आपले विचार तिच्यात मांडले आहेत.

सुरू असलेले 2019 हे वर्ष इतिहासात नोंदलेल्या सर्वाधिक उष्ण वर्षांमध्ये मोडत आहे. जगभरात अनेक ठिकाणी उष्माघाताचे बळी जात आहेत. त्यात विकसनशील देश आहेत तसे विकसित देशही आहेत, कारण निसर्ग भेदाभेद मानत नाही. काही ठिकाणी जंगलातले वणवे हाताबाहेर जात आहेत, तर काही किनाऱ्यालगतच्या प्रदेशांत जमिनी खचून महासागरांच्या उदरात गडप होत आहेत.

औद्योगिक क्रांती झाल्यापासून गेल्या दीडशे वर्षांमध्ये जगाचे सरासरी तापमान केवळ एक अंशाने वाढले आहे. मात्र, या एका अंशाचे आपण किती भयंकर परिणाम पाहात आहोत. हेच पुढे सुरू राहिले तर काय, या भीतीने इंटरगव्हर्नमेंटल पॅनल फॉर क्‍लायमेट चेंज (आयपीसीसी) या संस्थेने येत्या 30 वर्षांत तापमानातील वाढ दीड अंश सेल्शियसवर रोखण्याचे आवाहन केले आहे.

सर ऍटेनबराही याच दिशेने बोलत आहेत. गेल्या 22 वर्षांमध्ये इतिहासातली सर्वाधिक तापमानाची अशी 20 वर्षे नोंदली गेली आहेत. याचा अर्थ आपण वातावरणात प्रचंड प्रमाणात कार्बनडाय ऑक्‍साइड आणि तत्सम ग्रीन हाऊस वायू सोडत आहोत. ही बेजबाबदार कृती तत्काळ थांबवणे अत्यंत गरजेचे आहे, हे त्यांचे प्रतिपादन आहे.

येत्या 10 वर्षांत आपण महत्त्वाचे निर्णय घेऊन पर्यावरणाची हानी भरून काढली नाही, तर उद्या आपणच या पृथ्वीवर उरणार नाही अशा कडक शब्दांमध्ये त्यांनी निर्वाणीचा इशारा दिलेला आहे. विज्ञान-तंत्रज्ञानाकडे उपाय आहेत. सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा या क्षेत्रात वेगाने संशोधन होत आहे. वातावरणातला कार्बन वेगळा करून शोषून घेण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न सुरू आहेत. कार्बन इंजिनिअरिंग ही शाखा झपाट्याने विस्तारित होत आहे.

तरुण पिढी या विषयाबाबत अधिक जागरूक आहे हे त्यांचे निरीक्षण आहे. स्वीडनमधली ग्रेटा थुनबर्ग ही या पिढीचे प्रतिनिधित्व करत आहे, असे म्हणता येईल. शेवटी त्यांनाच येत्या काळात पृथ्वीवर जगायचे आहे, पृथ्वीला जगवायचे आहे. मात्र राजकीय पातळीवर अजूनही चर्चा आणि विवाद आहेत. ते टाळून लक्ष आपल्या भविष्यावर केंद्रित करायला हवे, असा सर ऍटेनबरा यांचा आग्रह आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.