लक्षवेधी : आचरण व्हावे!

-राहुल गोखले

प्रभू रामचंद्रांच्या चारित्र्याच्या निकट जाणे सामान्य माणसाला किंवा राजकीय नेत्यांना सहज शक्‍य नाही, हे नाकारता येणार नाही. मात्र, प्रभू रामचंद्रांच्या नावाचा केवळ उच्चार करणे पुरेसे नाही हेही लक्षात ठेवले पाहिजे. उच्चारणापेक्षा आचरण हे वरच्या पातळीवरील असते. तेव्हा प्रभू रामचंद्रांच्या सर्वच गुणांचे नाही तरी शासक म्हणून काही गुणांचे अनुसरण करणे मात्र शक्‍य आहे.

अयोध्येत राममंदिराच्या भूमिपूजनाच्या सोहळ्याने अनेक शतके चाललेल्या संघर्षांला विराम मिळाला. स्वातंत्र्य मिळाल्यावर देखील गेली सत्तर वर्षे आंदोलनांपासून न्यायालयीन लढाईपर्यंत सर्व स्तरावर हा मुद्दा पेटता राहिलेला होता. अखेर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाने राममंदिर प्रश्‍नी तोडगा निघाला आणि आता प्रत्यक्ष भूमिपूजन झाल्याने मंदिर उभारणीचा मार्ग प्रशस्त झाला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी मंदिर भूमिपूजनाचे स्वागत केले.

एका अर्थाने बदललेल्या राजकीय परिप्रेक्ष्याचा हा परिणाम. अन्यथा भाजप आणि भाजपविरोधक यांच्यामध्ये या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोप झाले असते. मात्र, तसे सूर निघाले नाहीत. अर्थात, यामागे एकट्या भाजपला मंदिर भूमिपूजनाचे श्रेय मिळू नये, हा विचारही विरोधकांचा असू शकतो. एक खरे, बाबरी ढाचा पतन झाल्यानंतर जे ध्रुवीकरण झाले होते ते आता फारसे दिसले नाही. आता पुढच्या तीनेक वर्षांत प्रत्यक्ष राममंदिर उभे राहील.

वस्तुतः राममंदिर भूमिपूजनाचे स्वागत सर्वच पक्षांनी केले असले तरीही भाजपला यात आपला वाटा इतरांपेक्षा अधिक आहे याची माहिती आहे आणि जाणीवही. गेल्या वर्षी 370 वे कलम रद्दबातल ठरविण्यात आले होते आणि यंदा त्याच तारखेला राममंदिर भूमिपूजन संपन्न झाले. ज्यांना श्रेय जाते त्यांच्यावर जबाबदारीदेखील अधिक येते याचीही जाणीव ठेवावयास हवी.

प्रभू रामचंद्रांच्या चारित्र्याला झळाळी प्राप्त होते ती त्यांच्यामध्ये असणाऱ्या काही गुणवैशिष्ट्यांमुळे. एक तर त्यांची वचन पाळण्याची वृत्ती आणि दुसरे म्हणजे त्यांची निःस्पृहता. वचन पाळण्यासाठी त्यांनी सिंहासन नाकारण्याचे दाखविलेले धैर्य. युग कोणतेही असो; हे गुण कालातीत आहेत आणि शासक कोणत्याही युगातील असो हे गुण असणारा शासक आदरणीय ठरतो. रामनाम प्रभावी आहे; पण रामाचे नाव घेताना त्यामागे रामचंद्रांमध्ये कोणते गुण कारणीभूत ठरले याचे विस्मरण होता कामा नये. भाजपने याचे स्मरण विशेषत्वाने ठेवले पाहिजे.

काहीही करून सत्ता हा नव्या भाजपचा जो मंत्र बनला आहे तो रामचंद्रांच्या निःस्पृहतेच्या गुणाच्या विपरीत आहे. अलीकडे तर भाजपने अनेक राज्यांत विरोधी सरकारे अस्थिर करून स्वतःची सत्ता स्थापन करण्याचा जो मार्ग अवलंबिला आहे तो अनेक अर्थांनी घातक आहे. मध्य प्रदेशात कॉंग्रेस फोडून शिवराजसिंह चौहान सरकार बनविण्यात भाजप यशस्वी ठरला. कर्नाटकात तोच प्रयोग करण्यात आला. गोव्यात भाजपने तोच हातखंडा वापरला.

राजस्थानात भाजपने तोच कित्ता गिरविण्यास सुरुवात केली आहे. प्रश्‍न सत्ता मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत की नाही किंवा राजकीय डावपेच रचावेत की नाही हा नाही. राजकारणात डावपेच, कुरघोड्या हे राहणारच. पण त्यालादेखील काही विधिनिषेध असावा ही अपेक्षा अवाजवी नाही. जेथे विरोधी पक्ष फोडून भाजपने सत्ता हस्तगत केली तेथे स्वपक्षातील कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान योग्य प्रमाणात मिळाले नाही आणि कुरबुरी वाढत आहेत हेही नाकारता येणार नाही.

प्रभू रामचंद्रांनी वानरांच्या मदतीने लंकेवर हल्ला चढविला; पण सहकाऱ्यांच्या योगदानाचे विस्मरण कधी होऊ दिले नाही. तेव्हा आपल्याच पक्षासाठी झटणाऱ्यांना ते कितीही निरपेक्ष असले तरी सत्ता मिळाल्यावर त्यांना सत्तेत भागीदारी नाकारणे हा एकीकडे वचनभंग आहे आणि दुसरीकडे सत्तालोलुपता. रामचंद्रांच्या जीवनात हे दोन्ही वर्ज्य होते. किंबहुना सिंहासन नाकारणे आणि तेही वचनपूर्तीसाठी हा तर रामचंद्रांच्या जीवनातील तेजस्वी भाग होय. रामचंद्रांचा जयजयकार करताना त्यांच्या या गुणसमुच्चयाचा विसर पडू देणे म्हणजे सोयीस्कर भूमिकेचे ज्वलंत उदाहरण.

प्रभू रामचंद्रांची उत्तुंगता आपल्या आयुष्यात कशी येणार अशी कबुली दिली म्हणजे आपोआप जबाबदारीतून हात झटकता येतात. मात्र, तसे करणे म्हणजे केवळ उच्चारापुरते आदर्श असल्याचे ते दर्शन असते. तत्त्व, मूल्य यांचा आधार असणारे राजकारण असावे या धारणेला स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्य मिळाल्यावर देखील काही काळ मान्यता होती. मात्र नंतर तत्त्वे आणि मूल्ये यांची सर्रास पायमल्ली सुरू झाली. राज्यपद्धती आता राजेशाहीची नसली आणि लोकशाहीची असली तरी शासक म्हणून काही मूल्ये ही कालातीत आणि राज्यपद्धती निरपेक्ष असतात. तेव्हा राममंदिर भूमिपूजनाचे स्वागत करणाऱ्या सर्वच पक्षांनी वस्तुतः आपल्या व्यवहाराचे आत्मपरीक्षण करावयास हवे. पण भाजपवर ती जबाबदारी दशांगुळे अधिक आहे.

आदर्शांचा घोटाळा न करता आणि त्यांचा वापर सोयीपुरता न करता प्रभू रामचंद्रांच्या जीवनाचे साक्षेपी अनुसरण राजकीय पक्षांनी आणि त्यातही शासकांनी करावयास हवे. असे आदर्श रोजच्या जीवनात अवलंब करणे शक्‍य नाही ही कबुली देणे सोपे आहे आणि मोठ्या प्रमाणात खरीदेखील आहे. पण समाज म्हणून आणि शासन म्हणून जबाबदाऱ्या पेलताना आणि त्यांचे पालन करताना सामूहिक हुंकार म्हणून आदर्श, तत्त्व, मूल्ये यांचे स्मरण आणि त्यानुसार वर्तन हे आवश्‍यकच असते. कारण त्यातच समाज आणि देश यांचा उन्नय असतो.

अयोध्येत राममंदिर उभे राहणार यात आता कोणतीही शंका राहिलेली नाही. मात्र, त्याबरोबरच राजकीय क्षेत्राच्या पुनर्रचनेची पायाभरणी झाली तरच रामाचे नाव घेण्यात काही अर्थ आहे. मंदिर बांधले म्हणून अन्य जबाबदाऱ्यांतून आणि उत्तरदायित्वातून आपोआप मुक्‍त होता येणार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.