जीवनगाणे : कमवा आणि शिका

-अरुण गोखले

“”चला! मुलांनो ! करायची का सुरुवात शिकवणीला..

” मी मुलांना विचारले. तेव्हा चटकन सुलू म्हणाली, “”सर जरा थांबा, सुरेश बागेत काम करत होता. त्याचे हात चिखलामातीने भरले होते. मी आलोच हात पाय धुऊन, असे तो म्हणालाय, तो येईलच इतक्‍यात..”

आमचे बोलणे सुरू असतानाच धावत पळत सुरेश आला. “”सॉरी सर! जरा उशीर झाला. त्या नव्याने वाढलेल्या वेलीला आधार बांधत होतो ना”, असे म्हणत जागेवर बसला. शिकवणी सुरू झाली. आज मला मुलांना जो भाग समजावून सांगायचा होता, तो मी त्यांना प्रथम वाचा, असे सांगितले. मुले वाचनात रमली आणि मला मात्र तो चार महिन्यांपूर्वीचा प्रसंग आठवू लागला.

रविवारचा दिवस… दुपारची थोडी विश्रांती घेतल्यावर मी माझ्या आवडत्या बागकामात रमलो होतो. तोच फाटकाचे दार वाजले. मी आवाजाच्या दिशेने पाहिले. सुरेश इ. 7 वीच्या वर्गातला विद्यार्थी आणि त्याच्यासोबत एक स्त्री दोघे आत आले.
सुरेशने पुढे येऊन मला नमस्कार केला. मग सोबतच्या स्त्रीची ओळख करून देत म्हणाला, “”सर! ही माझी आई! तुम्हाला भेटायला आली आहे.”

ती स्त्री चटकन पुढे आली. डोक्‍यावरचा पदर सावरला आणि पटकन माझ्या पायाशी वाकली. मी म्हणालो, “”अहो आई काय हे तुम्ही कशाला माझ्या पाया पडताय!”

त्यावर अत्यंत विनम्र आणि मृदू भाषेत ती म्हणाली, “”मास्तर! हा माझा मुलगा सुरेश… तुमच्याच वर्गात शिकतो. तो सांगत होता तुम्ही इंग्रजी खूप छान शिकवता. त्याला त्या विषयाची शिकवणी लावायची आहे”
“”मग लावा की… मी शिकवायला तयार आहे” मी म्हणालो.

त्यावर ती स्त्री म्हणाली, मास्तर! पण त्यासाठी शिकवणीची फी देण्याइतकी ऐपत नाही आमची, मोलमजुरी करणारी आम्ही माणसं. हो पण तुम्ही त्याला फुकट शिकवा असे मी म्हणत नाही. माझी एक विनंती आहे, त्याला तुमच्याकडचे बागकाम करू द्या. त्याबदल्यात तुम्ही शिकवा त्याला. “”का रे सुरेश! करशील ना काम?” तिने विचारले.

त्याने “”हो” म्हटले.

मी सुद्धा त्या मातेच्या विनंतीचा स्वीकार केला. कारण माझ्या लेखी आपल्या मुलाला कमवा आणि शिका हा धडा देणारी ती माउली खरेच धन्य होती. विद्यार्थांना शालेय जीवनापासूनच कामाची गोडी लागायला हवी. हलक्‍याफुलक्‍या कामांमुळे विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास होतो. पुढे ते आळशी बनत नाहीत. काम करून शिकणारी मुले पुढे आयुष्यात नक्‍कीच
यशस्वी होतात.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.