विज्ञानविश्‍व : मंगळावरचा भूकंप

-डॉ. मेघश्री दळवी

सहा एप्रिलला मंगळावर एक सौम्य भूकंप झाला. म्हणजे ते एरव्हीही होत असतील; पण आपल्या प्रोबने टिपलेला तो पहिला, ही त्याची खास बात! इतक्‍या दुरून या भूकंपाची आपण नोंद घेऊ शकलो ही तंत्रज्ञानाची भरारी खरोखरच कौतुकास्पद!

पृथ्वीवर लहानमोठे भूकंप सतत होत असतात. त्यातले बरेचसे सौम्य असतात आणि त्याने फारसे नुकसान होत नाही. उलट त्यांच्या मोजमापावरून पृथ्वीच्या गाभ्याबद्दल नवनवी माहिती समोर येत असते. अशीच माहिती मंगळासाठी मिळवायचा आपल्या शास्त्रज्ञांचा हा प्रयत्न आहे. त्यासाठी नासाचा इनसाइट मार्स लॅंडर हा रोबॉटिक प्रोब सध्या मंगळाच्या पृष्ठभागावर आहे. मंगळाच्या गाभ्यात काय दडले आहे याचा तो अनेक बाजूंनी अभ्यास करणार आहे. त्यात अशा कंपांची नोंद, वेगवेगळी भूमापने, हवामानाच्या नोंदी, पृष्ठभागाखालील तापमानाची दीर्घकालीन मापने यांचा समावेश आहे.

पृथ्वीवर भूकंप होत असतात ते भूपृष्ठाच्या विशिष्ट रचनेमुळे. पृथ्वीच्या गाभ्यात आहे अतितप्त शिलारस (मॅग्मा), त्याच्यावर आहे खडकाळ प्रावरण (मॅन्टल) आणि मग भूपृष्ठाचं कवच (क्रस्ट). पण हे कवच सलग नसून त्याचे नऊ मुख्य भाग (प्लेट्‌स) आहेत. ते अस्थिर असतात आणि खालच्या खडकाळ प्रावरणावर घासत असतात. त्यामुळेच भूकंप आणि इतर भूपृष्ठीय घटना घडत असतात.

मंगळावर मात्र असे नाही. त्याचा अंतर्भाग अजूनही थंड होत आहे. त्याचा परिणाम म्हणून पृष्ठभागाला सूक्ष्म तडे जाऊ शकतात. मंगळाच्या गाभ्यातल्या हालचाली हेही एक कारण असू शकते. कधी लहानमोठ्या अशनी येऊन आदळल्या तर पृष्ठभाग थरारतो. हा सगळा अभ्यास निश्‍चितच रोमांचक आहे. आपल्यापेक्षा पूर्ण वेगळ्या ग्रहावर काय आणि का घडत असेल? यांचा शास्त्रीय अंदाज बांधताना आपली नेहमीची गृहितके बाजूला ठेवून कितीतरी निराळी कारणे विचारात घ्यावी लागतात!

सहा एप्रिलचा सौम्य भूकंप हा मंगळाच्या पृष्ठभागावर घडलेला नाही तर, त्याच्या अंतर्भागातल्या हालचालींचा परिणाम आहे. त्याचा केंद्रबिंदू किंवा स्रोत कुठे आहे हे आता डेटाच्या विश्‍लेषणावरून कळेल. इनसाइट मार्स लॅंडर मंगळावर उतरल्यावर 128 दिवसांनी या मंगळ भूकंपाची नोंद झाली आहे. याचा अर्थ तिथे एकूण भूकंप कमी आहेत का, की ते अतिसौम्य असल्याने त्यांची नोंद होत नाही, की आपली यंत्रणा अधिक संवेदनशील करायला हवी अशा प्रश्‍नांची उत्तरे या अभ्यासावरून मिळणार आहेत. येत्या काळात आणखी भूकंपांची नोंद झाली तर एकंदरीत मंगळावर किती आणि कोणत्या प्रकारचे भूकंप होतात याचा अदमास बांधता येईल. त्यावरून भूकंपप्रवण क्षेत्र निश्‍चित करता आले तर यानं उतरवताना, प्रयोगशाळा उभारताना आणि मानवी वसतीकरता तो भाग टाळता येईल.

मंगळाच्या पृष्ठभागाच्या हालचाली इथून टिपायच्या हे या प्रकल्पावर काम करणाऱ्या डॉ. रेनी वेबर यांचे ध्येय होते. गेली तीस वर्षे मी या क्षणाची वाट पाहात होते अशा शब्दांत त्यांनी आपला आनंद व्यक्‍त केला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.