अबाऊट टर्न : व्हीआयपी-लाइन

-हिमांशू

“हम भी वो है, जो कभी किसी के पीछे नहीं खडे होते… जहॉं खडे हो जातें हैं, लाइन वही से शुरू हो जाती है…” आठवला हा डायलॉग? मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी “कालिया’ नावाच्या चित्रपटात म्हटलेला हा डायलॉग सुपरहिट झाला होता. सिच्युएशन अशी, की तुरुंगात एक मुरब्बी कैदी जेवणाच्या लाइनमध्ये उभ्या असलेल्या एका दिव्यांग कैद्याला ढकलून देतो आणि त्याची थाळी हिसकावतो. इतर कैदी त्याच्याकडे घाबरून पाहतात आणि मुकाट्यानं त्याच्या मागे उभे राहतात. तेवढ्यात अमिताभ यांची एन्ट्री होते आणि त्या मुरब्बी कैद्याकडून थाळी हिसकावून ते हा संवाद म्हणतात. मग ठरल्याप्रमाणं हाणामारी वगैरे…

हे सगळं इतक्‍या वर्षांनी आठवायचं कारण म्हणजे, लोकसभा निवडणुकीच्या मतदानावेळी जवळपास हेच चित्र मतदानाच्या रांगेत दिसले. बच्चन यांच्याप्रमाणेच अनेक सेलिब्रिटी आले, त्यांनी मतदारांच्या रांगेकडे पाहिले, त्यांनी रांग मोडली आणि सर्वांत आधी मतदान केलेसुद्धा!

अर्थात, या बॉलीवूडवाल्यांनी रांग “मोडली’ असे म्हणता येत नाही. कारण उत्सव लोकशाहीचा असो वा गणपतीबाप्पाचा, या बिचाऱ्यांना रांग माहीतच नसते. ही मंडळी कधीही आली, तरी बाप्पा सर्वांत आधी त्यांना दर्शन देतात आणि निवडणूक अधिकारीही त्यांच्याच नखाला सर्वांत आधी शाई लावतात.

व्हीआयपी रांगेची हीच थोर परंपरा मतदानावेळीही टिकवणाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन! सगळ्यात गमतीचा भाग असा की, आल्या-आल्या मतदान करण्याची संधी तर सेलिब्रिटींना मिळालीच; शिवाय बाहेर पडल्याबरोबर माध्यमांच्या कॅमेऱ्यांनी त्यांना घेरावसुद्धा घातला. नेहमीच कॅमेऱ्यासमोर उभं राहण्याची सवय असलेले सेलिब्रिटी पत्रकारांसमोर बोट वर करून (शाई दाखवण्यासाठी) उभे राहिले. मतदान करणं हे कसं परमकर्तव्य आहे आणि प्रत्येकानं मतदान केलंच पाहिजे वगैरे उपदेशाचे डोस या मंडळींनी भरभरून दिले. उन्हातान्हात तासन्‌तास रांगेत उभ्या राहिलेल्या त्यांच्या फॅनमंडळींनी हे उपदेश मनापासून ऐकले.

यंदाच्या आग ओकणाऱ्या उन्हाळ्यात जनतेला उन्हात उभं राहण्याचं बळ देऊन सेलिब्रिटी आपापल्या वातानुकूलित मोटारींमध्ये बसून निघून गेले. त्यांच्यातले कोण-कोण परदेशातून खास मतदान करण्यासाठी भारतात आलेय, याची चर्चा रंगली. हे सेलिब्रिटी खरोखर कधीच कुणाच्या मागे उभे राहत नाहीत. जिथे उभे राहतात, तिथूनच रांग सुरू होते. तुलनेने मराठी चित्रपटातले कलावंत बिचारे सोशिक!

मुंबईतल्या काही मतदान केंद्रांवर गैरव्यवस्थापनामुळं दोन-तीन तास रांगेत उभे राहावे लागत होते. तरीसुद्धा मराठी कलावंतांनी रांग मोडली नाही. अहो, ज्यांना सिनेमाच्या प्रदर्शनाला थिएटर मिळवण्यासाठीही रांगेत उभे राहावे लागते, तेसुद्धा “आमच्या’ मुंबईत… ते मराठी सेलिब्रिटी मतदानाची रांग कशी काय मोडू शकतील? त्यांच्यासाठी कुठली व्हीआयपी लाइन!

मतदानावेळी मुंबईत नियुक्‍तीला असलेल्या कर्मचाऱ्यांना अशी बरीच व्यवधाने सांभाळावी लागतात; त्यामुळे छोट्या-छोट्या गोष्टी त्यांना आठवतच नाहीत. जसे मतदाराच्या डाव्या हाताच्या नखाला शाई लावायची की उजव्या? त्यांनी काहींच्या डाव्या आणि काहींच्या उजव्या हाताच्या बोटाला शाई लावली. काही सेलिब्रिटी डावखुरे असतील. मग गोंधळ उडणारच ना! मतदान केंद्रावर मोबाइलला परवानगी द्यायची की नाही, याबाबतही संभ्रम होता. काही ठिकाणीच तपासणी होत होती. सेलिब्रिटी किती प्रभावी ठरतात ना?

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.