कलंदर : विरलेल्या घोषणा…

-उत्तम पिंगळे

एक… दोन… तीन… चार … चा जयजयकार…ही घोषणा कधीही कुठेही लागू पडते. मग निवडणुकीचा प्रचार असो किंवा कोणते पद मिळाले म्हणून असो किंवा अगदी सरकारविरोधात मोर्चा आणलेल्या नेत्यांसाठी असो अगदी कुठेही लागू पडते. पूर्वी निवडणूक प्रचार घोषणांनी दणाणत असे. कार्यकर्ते व मतदारांचाही त्यात प्रत्यक्ष सहभाग असे. कित्येक चाकरमानी निवडणुकीच्या दोन-तीन आठवडे आधी सुट्टी घेऊन आपल्या गावी उमेदवारांसह प्रचार करताना दिसत. मला त्या पूर्वीच्या स्टॅंडर्ड घोषणा आजही आठवतात. तो 1977 चा जमाना होता. नांगरधारी शेतकरी, असे त्या वेळच्या जनतापक्षाचे चिन्ह होते.

सूर्य उगवला पहाट झाली आडवा डोंगर…
शेतकरी तो दिल्लीस जाणार घेऊन नांगर…

तसेच त्या वेळच्या कॉंग्रेसचे चिन्ह गाय वासरू होते. “गाय वासरू, नका विसरू’ ही घोषणा अजूनही स्मरणात आहे. तसेच त्यावेळी आणीबाणी होती व “अंधेरे मे एक प्रकाश, जयप्रकाश जयप्रकाश’ ही घोषणा आजही आठवते. तसेच कित्येक कार्यकर्ते, मतदार व बच्चे कंपनी ट्रकमध्ये जाऊन घोषणा दणाणून सोडायचे. अरे बोला हो तुम्ही बोला आपली मते कुणाला? गंगाधर भाऊ अप्पालाहो कपबशी निशाणीला. म्हणजे उमेदवार गंगाधर व त्याची निशाणी कपबशी.

आमच्या रायगड जिल्ह्यात भिवपुरी व भिरा ही दोन विद्युत केंद्रे आहेत. मग विद्युत केंद्र भिवपुरी भिरा… जगात… (उमेदवाराचे नाव) कोहिनूर हिरा… ही घोषणा दणाणत असे. तसेच उमेदवाराचे नाव “कर’ या शब्दाने संपत असेल जसे कमलाकर जोशी वा सुधाकर पाटील मग सेवेसि तत्पर जोशी कमलाकर वा पाटील सुधाकर… अशी घोषणा असे. तसेच येऊन येऊन येणार कोण?… शिवाय आहेच कोण? ही घोषणा आजही चालू आहे.

निवडणुकीच्या सभांनाही प्रचंड गर्दी होत असे. तसेच रात्री सर्व चाळकरी मंडळी जेवण झाल्यावर एकत्र बसून निवडणुकांच्या बाबतीत गप्पा मारायचे कारण रेडिओ व दूरदर्शन ही दोनच माध्यमे होती. प्रत्यक्ष निवडणूक होऊन उमेदवार निवडून आला की जोरदार मिरवणूक असायची. मग पुन्हा एक… दोन… तिन… चार …चा जयजयकार तसेच विजयी उमेदवाराच्या विरोधकांचे घर जवळ येताच मिरवणूकवाल्यांना चेव येई.

त्यांच्या घरासमोर चार पाच मिनिटे गोंधळ चालू असे. … गेला दिल्लीत … गेला गल्लीत अशी घोषणा चालूच राही. त्यातलीच एक, चंद्रभागेला आला लोंढा पाणी लागले वडाला … म्हणे … ला रे … माझा बुडाला. यात शेवटचा बुडाला ते पडलेल्या उमेदवाराचे नाव व पहिले दिल्लीतल्या विरोधी नेत्याचे नाव व दुसरे राज्याच्या मोठ्या विरोधी नेत्याचे नाव घेतले जाई.

आता सर्व जरी हायटेक झाले असले तरी लोकांना मतदान करण्यासाठीही बाहेर बोलवावे लागत आहे. क्‍वचित मोठे प्रचाराचे भाषण असते नाही तर घरोघरी पदयात्रा करून प्रचार चालू आहे. सर्व सुविधा असूनही प्रत्यक्ष प्रचाराला लोक मिळणे कठीण होत चालले आहे. किती वेळा भाड्याने कार्यकर्ते व प्रचारक मिळवावे लागत आहेत. काही खासगी कंपन्याही असा इव्हेंट मॅनेज करत आहेत. अशा प्रकारच्या प्रचाराला मग पूर्वीसारखी मजा राहत नाही.

कित्येक वेळा उलट सुलट नावे घेतली जातात. मग लोकांनाही समजते की विरोधकांच्या वेळीही हेच लोक होते. नेतेच कधी टोपी बदलतील ते समजत नाही. त्यामुळे निष्ठावंत कार्यकर्तेही मिळणे कठीण झाले आहे. सर्वच ठिकाणी आता व्यवहार बघितला जात आहे. मग ऐन वेळी घोषणा पाठ कराव्या लागतात. त्यामुळे त्या यथातथाच असतात.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)