संतसाहित्य : तुकोपनिषदाचे मर्म

-प्रशांत संभाजी मोरे (देहुकर)

तुकाराम बीज महाराष्ट्रात नुकतीच उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने देहूच्या पंचक्रोशीत तुकोबारायांच्या चरणी लीन होण्यासाठी भक्‍तांचा मेळाच उपस्थित झाला होता. या मांदियाळीतच तुकोबांचे जीवन साकारले गेले. त्यांच्या वैकुंठगमनाच्या निमित्ताने त्यांचेच 11 वे वंशज प्रशांत संभाजी मोरे (देहुकर) यांनी तुकोबांच्या अभंगांतून साकारलेली तुकोबांची साहित्यसृष्टी…

नामदेवे केले स्वप्नामाजी जागे ।
सवे पांडुरंगे येवोनीया ।।
सांगितले काम करावे कवित्व ।
वाउगे निमित्त बोलो नये ।।

नामदेवाने पांडुरंगासह स्वप्नात येऊन तुकोबांना जागे केले आणि कवित्व करण्याचा आदेश दिला. माझा शतकोटी अभंगाचा संकल्प आपण पूर्ण करावा, अशी इच्छा नामदेवांनी व्यक्‍त केली. पांडुरंगाच्या कृपेने तुकोबांना हा जणू प्रसादच मिळाला आणि त्यांच्या स्फूर्तीमुळे तुकोबांची काव्यगंगा दुथडी भरून वाहू लागली. भागवत धर्माचा कळस म्हणजे तुकाराम महाराज. त्यांच्या सुमारे साडेचार हजार अभंगांचा दरवळ आजही सर्व आसमंतात भरून राहिला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, ही माझी वाणी पदरची किंवा युक्‍तिवाद म्हणून नाही, ही प्रेरणा परमेश्‍वराची. मला हा परमात्मा विश्‍वंभरच बोलवीत आहे, मी केवळ निमित्तमात्र आहे. ही त्या पांडुरंगाची वाणी आहे.

करितो कवित्व म्हणाल हे कोणी ।
नव्हे माझी वाणी पदरीची।।

असे असले तरी त्यांच्या अभंगात कुठेही कृत्रिमता आढळत नाही. सहजता हे त्यांच्या काव्याचे वैशिष्टय आहे. त्यांच्या संवेदनशील मनाने या जीवनाचे निरीक्षण करून चिंतन केले आणि तेच अभंगरूपाने प्रकट झाले. स्वानुभव हा तुकोबांच्या अभंगातील जिवंतपणा आहे. त्यांचे सर्व अभंग बिंदूरूपाने जोडले तर त्यांचे एक चरित्र आपल्यासमोर उभे राहते. आत्मप्रत्यय हे तुकोबांच्या विचारांचे अधिष्ठान आहे… म्हणून तुकोबा म्हणतात-

अनुभव आले अंगा ।
ते या जगा देतसे ।।

त्यांच्या काव्यातून आत्मानुभूती प्रकट झाली. त्यात आत्मबोध, आत्मशोध, आत्मज्ञान, वेदांत आणि शास्त्र याचा साकल्याने विचार मांडला. तुकोबांची अभंगवाणी ही देववाणी आहे. त्यांची गाथा हे एक शास्त्र आहे आणि जीवनाची ज्ञानशाखा आहे. त्यात नैतिक, धार्मिक आणि आध्यात्मिक सिद्धांत सांगितले आहेत. हे सिद्धांत कोणत्याही काळात उपयुक्‍त आहेत. विज्ञानाने आज खूप प्रगती केली असली तरी मानवी जीवनाची सफलता आध्यात्मात आहे, हे तुकोबांनी गाथेतून दाखवून दिले. तुकोबांनी वेदांचे अध्ययन केले नाही, कारण त्यांना तो अधिकार नव्हता तरीपण तथाकथित विद्वानांना त्यांनी अभंगातून चपराक दिली.

वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा ।
येरांनी वहावा भार माथा।।

पांडुरंगाच्या कृपाप्रसादाने त्यांच्या बुद्धीला वेदार्थाचे स्फुरण आले आणि त्याद्वारे महाराजांनी केलेले चिंतन, स्मरण त्यांच्या अभंगातून प्रतिबिंबीत झाले. म्हणूनच त्यांच्या गाथेला पंचमवेद किंवा तुकोपनिषद म्हणतात. हा पंचमवेद रामेश्‍वरशास्त्रींच्या आज्ञेप्रमाणे इंद्रायणीच्या अथांग डोहात विसर्जित केला गेला; परंतु तुकोबांच्या भक्‍ती सामर्थ्यामुळे हाच पंचमवेद पांडुरंगाने पाण्यात तेरा दिवस रक्षण करून परत आणून दिला. यावरून तुकोबांची गाथा ही अपौरषेय वाङ्‌मय आहे की नाही, याची वेगळ्या पद्धतीने मीमांसा करता येईल. तुकोबांची गाथा एक भक्‍तिशास्त्र आहे आणि त्याचा चार वेद, अठरा पुराणे आणि सहा शास्त्रे यात कुठेही उल्लेख नाही. तुकोबा म्हणतात, माझ्या वाणीतून सहज बोल बाहेर पडतात पण त्यातून वेदोपनिषदातील सिद्धांताचा गुढार्थ प्रकट होतो.

तुका जरी सहज बोले वाणी ।
त्याचे घरी वेदांत वाहे पाणी ।।

वेदाची भाषा संस्कृत आहे; पण तुकोबांनी गाथेच्या माध्यमातून मराठी भाषेत वेदार्थ प्रकट केला. वेदांतील कर्मउपासना, ज्ञान, सिद्धांत आणि पुराणातील देवदेवतांचे अवतार कार्य या गाथेत समाविष्ट आहे. ही अभंगगाथा वेदोपनिषदापेक्षा वेगळी नाही म्हणून तुकोपनिषद हे नाव सर्वांगाने सार्थ ठरते.

तुकाराम गाथा म्हणजे रोजच्या जीवनातील, विविध व्यवहारातील सूत्ररूपाने केलेले मार्गदर्शन आणि जीवनाचे महाभाष्य आहे. तुकोबांच्या अभंगातील काही संदर्भ काळाच्या पलीकडे जाऊन आपणाशी संवाद साधतात आणि या अभंगांची रचना तुकोबांनी आपल्यासाठीच केली की काय, असा भास होतो. त्यामुळे तुकोबांची गाथा “तुका म्हणे होय मनाशी संवाद’ साधत मराठी मनाला प्रसन्न करण्याचे कार्य आजही करत आहेत. शालेय शिक्षणात तुकोबांचे अभंग गुणांच्या बेरजेत बसवले आहेत; पण त्या अभंगाची योग्यता मानवास सर्वगुणसंपन्न बनवणारी आहे.

गाथेच्या या पंचमवेदामध्ये भारतीय संस्कृतीमधील अनेक आधुनिक विचार आणि तत्त्वे सांगितलेली आहेत. तुकोबांनी काही निषिद्ध कर्माचा उल्लेख केला आहे. हिंसा, चोरी, अभक्षभक्षण, अपेयपान, असत्यभाष्य, जातीधर्म या कर्माचा निषेध केला आहे. भूतमात्राविषयी दया असावी, विषयासक्‍त नसावे, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, या षडरिंपूचा त्याग करावा. संतसंगती करावी. परोपकार करावा. पुत्राने माता-पित्यांची सेवा करावी. पंढरीला जावे, एकादशी सोमवार ही व्रते करावीत. गळ्यात तुळशीमाळ घालावी अशी कर्मे सांगितली आहेत.

निश्‍चित फलप्राप्तीसाठी नामस्मरणाचे महत्त्व गाथेत प्रतिपादित केले आहे. तुकोबांची सतराव्या शतकातील शिकवण आपणाला आजही काळाच्या मर्यादा ओलांडून आपलीशी वाटते हेच या पंचमवेदाचे गमक आहे. याची प्रचिती तुकोबांनी त्यांच्या या अभंगातून दिली आहे.

बोलणे ते आम्ही बोलो उपयोगी । पडिले प्रसंगी काळा ऐसे ।।

हे तुकोपनिषद एका मूल्याधिष्ठित जीवन जगणाऱ्या कवीचे वास्तवदर्शी आत्मकथन आहे. आत्मिक आणि सामाजिक संघर्षाचे प्रत्यक्षपणे आलेल्या अनुभवांना वास्तवतेचा स्पर्श असल्यामुळे आयुष्याचे विविध कंगोरे सहजपणे उतरले आहेत. विविध विषयांचे नितांत सौदर्य आणि भाषा कौशल्य तुकांबांनी आपल्या सर्जशीलतेने या अभंगगाथेमध्ये टिपले आहे.
तुकाराम गाथेमध्ये करूणरस, अद्‌भुतरस, हास्यरस, शांतरस, भक्तिरस अशा विविध रसांची मुक्‍तपणे उधळण केलेली दिसून येते. तसेच गाथेत विविध अभंगांची स्वतंत्र प्रकरणे आहेत.

तुकोबांच्या अभंगाचे आकर्षण हे फक्‍त महाराष्ट्रापुरते मर्यादित नाही. भारतातील अनेक भाषांमध्ये या अभंगगाथेचे भाषांतर झालेले आहे. काही आंतररष्ट्रीय भाषेत देखील तुकाराम गाथेचे भाषांतर झालेले आहे आणि त्यामुळे या गाथेचे भारताबाहेर अभ्यासक तयार झाले आहेत. तुकाराम गाथेची पाचही खंडात लोकप्रियता वाढत आहे. अंदाजे 140 पेक्षा जास्त देशातील वाचकांनी या तुकाराम.कॉम या संकेतस्थळाला भेट दिलेली आहे. तुकाराम गाथा महाकाव्य मानवी जाणिवांना आणि मराठी संवेदशील मनाला स्पर्श करणारा महान आविष्कार आहे. त्यामुळे फक्‍त मराठी माणसाला नव्हे तर अखिल जगताला या तुकोपनिषदाच्या माध्यमातून कायमस्वरूपी काव्यांचा एक निर्मळ, नितळ आणि निखळ वाहत राहणारा झरा लाभला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.