लक्षवेधी : भाजप नेतृत्वाचा चौफेर मुखभंग !

-राहुल गोखले

लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोचत असतानाच भारतीय जनता पक्षाने आपली सर्व ताकद कॉंग्रेसला लक्ष्य करण्यासाठी ओतली आहे. एकीकडे कॉंग्रेसपासून देशाला मुक्‍ती देण्याचे स्वप्न जे भाजप नेते पाहत आणि दाखवत होते तसेच दुसरीकडे 2014 च्या लोकसभा निवडणुकीत ज्या पक्षाला अवघ्या 44 जागा मिळाल्या, त्या पक्षाने पंतप्रधानपदाची स्वप्ने पाहावीत का म्हणून खिल्ली उडवत होते तेच नेते आता कॉंग्रेसवर शरसंधान का करीत सुटले आहेत हे अनाकलनीय आहे.

ज्या पक्षाकडून कोणतेही आव्हान नाही, असे चित्र भाजपचे मुखंड रंगवित होते त्या पक्षालाच विखारी टीकेचे लक्ष्य भाजप करीत आहे हा एकीकडे विरोधाभास तर दुसरीकडे धास्तावलेपणा आहे हे नाकारता येणार नाही. 2014 ची पुनरावृत्ती करता येणार नाही या वास्तविकतेच्या जाणिवेतून अशी टीका जन्म घेत असावी. तथापि भाजपचे कॉंग्रेसविरोधी वाग्बाण बोथट ठरू लागले आहेत आणि त्यामुळे भाजप नेत्यांची ही व्यूहरचनाच हास्यास्पद ठरू लागली आहे.

ही निवडणूक काही भारतातील पहिली निवडणूक नाही. 2014 मध्ये भाजपला स्वबळावर केंद्रात बहुमत मिळाले त्यानंतरची मात्र ही पहिलीच निवडणूक आहे हे खरे. तेव्हा वास्तविक भाजपने प्रचारात गेल्या पाच वर्षांत आपल्या सरकारने काय कामगिरी बजाविली यावर प्रचारात भर देणे आवश्‍यक होते. मात्र आपल्या कामगिरीविषयी बोलण्याऐवजी भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वाने गेल्या पन्नास वर्षांत कॉंग्रेसच्या आणि मुख्यतः नेहरू-गांधी परिवाराच्या कथित चुकांवर आणि निराशाजनक कामगिरीवर भर देणे पसंत केले आहे.

इतिहास हा संघ परिवाराचा जिव्हाळ्याचा विषय. पण याचा अर्थ तो विद्यमान निवडणुकीत आणावा असा नाही. 1954 साली नेहरू पंतप्रधान असताना अलाहाबाद येथे झालेल्या कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी होऊन अनेकजण मृत्युमुखी पडले याचा दाखला पंतप्रधान मोदी यांनी एका प्रचार सभेत दिला. त्या घटनेला आता सहा दशकांहून अधिक काळ उलटून गेला आहे. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत कॉंग्रेस निवडून आली आणि 1954 च्या घटनेनंतर दहा वर्षे आपल्या निधनापर्यंत नेहरू पंतप्रधान होते. तेव्हा आताच्या निवडणुकीत त्या घटनेच्या उल्लेखाचे प्रयोजन काय हे कळणे मुश्‍किल.

नंतर मोदी यांनी राजीव गांधी यांना लक्ष्य केले आणि ते भ्रष्टाचारी असल्याचा गंभीर आरोप केला. राजीव गांधी यांचा बॉम्बस्फोटात मृत्यू झाला, त्यास आता अडीच दशके उलटून गेली. तेवढ्या काळात केंद्रात कॉंग्रेसेतर सरकारे अनेकदा आणि अनेक वर्षे होती. त्यांपैकी एकाही सरकारला राजीव गांधी यांच्या कथित भ्रष्टाचाराचा तपास करावासा वाटला नाही हे विशेष. खुद्द मोदी यांचे सरकार गेली पाच वर्षे सत्तेत होते. त्या सरकारने याविषयी काहीच का केले नाही आणि आता प्रचारात केवळ राळ उठवून काय साध्य होणार? हा प्रश्‍नच आहे. मोदी यांनी राजीव गांधी यांच्यावर आणखी एक आरोप केला नि तो म्हणजे युद्धनौका असलेल्या आयएनएस विराटवर राजीव गांधी यांनी सुट्टी घालविली.

एका अर्थाने राजीव गांधी कसे सुरक्षेबाबत बेफिकीर होते याकडे अंगुलीनिर्देश करतानाच जनतेच्या भावनांना हात घालण्याचा प्रयत्न मोदी यांनी केला आहे. देशाच्या अस्मितेच्या प्रतीकांशी कोणीही खेळलेले जनतेला आवडत नाही. तेव्हा राजीव गांधी यांनी युद्धनौकेचा खासगी वापर केला असा आरोप करून गांधी कुटुंबावर अप्रत्यक्ष शाब्दिक हल्ला चढविण्याचा मोदी यांचा उद्देश होता. त्यातच राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावरून भाजपने राळ उठविली होती आणि आता त्यांचे पितळ उघडे पडून कॉंग्रेस तोंडघशी पडणार असेही चित्र भाजपने तयार केले होते.

राहुल यांच्या नागरिकत्वाचा मुद्दा सोडला तर मुळातच अन्य कोणत्याही मुद्द्यात दम नव्हता कारण त्या मुद्द्यांचा 2019 च्या निवडणुकीशी संबंध नव्हता. पण यावर कडी म्हणजे त्या मुद्द्यांची वासलात लगेचच संबंधितांनी लावली. एवढेच नव्हे भाजपला घरचा आहेरही मिळाला. राहुल गांधी यांच्या नागरिकत्वाच्या प्रश्‍नावरून केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आणि एका अर्थाने जेटलींपासून अनेक भाजप नेत्यांचा मुखभंग झाला कारण हे नेते आता राहुल गांधी आणि पर्यायाने कॉंग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, असे उच्चरवाने सांगत होते. राजीव गांधी यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप मोदी यांनी केला. खरे तर दिवंगत नेत्याविषयी इतक्‍या शेलक्‍या शब्दात शेरेबाजी पंतप्रधानपदावरील व्यक्‍तीने करणे अशोभनीय. त्यातच पूर्वी कॉंग्रेसमध्ये असणारे आणि आता कर्नाटकातून भाजपचे उमेदवार असणारे श्रीनिवास प्रसाद यांनी मोदी यांचे हे उद्‌गार अप्रासंगिक आणि अगोचर असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. राजीव गांधी यांना आपण खूप जवळून ओळखत होतो आणि ते भ्रष्टाचारात गुंतणे अशक्‍य असल्याचा दावा प्रसाद यांनी केला आहे.

लक्षद्वीपचे प्रशासक राहिलेले वजाहत हबिबुल्लाह यांनी आयएनएस विराट ही युद्धनौका राजीव गांधी यांच्या सुरक्षेसाठी तैनात होती; तीवर गांधी यांनी सुट्टी व्यतीत केली नाही असा दावा करून भाजपच्या त्या फुग्यातील देखील हवा काढून टाकली आहे. खुद्द निवृत्त नौदलप्रमुख रामदास यांनी राजीव गांधी यांनी आयएनएस विराटचा वापर यांनी दहा दिवस खासगी टॅक्‍सीसारखा केला या आरोपांत बिल्कुल तथ्य नसल्याचे ठामपणे सांगतिले आहे.

एकूण नेहरू-गांधी परिवाराला अगदी इतिहासात शिरून भाजपने ज्या ज्या मुद्द्यांवरून लक्ष्य करण्याचा आटापिटा केला ते सर्व मुद्दे पोकळ निघाले आहेत आणि भाजपची शोभा झाली आहे. या सगळ्या गदारोळात मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारची गेल्या पाच वर्षांतील कामगिरी काय यावरून लक्ष विचलित करण्यात भाजपला कदाचित यश आले असेलही. पण जनतेचे लक्ष असे विचलित करण्याची वेळ सत्ताधारी पक्षावर यावी यातच भाजपच्या भात्यातील बाण संपल्याची आणि पायाखालची वाळू सरकत असल्याची साक्ष पटते.

असल्या बिनबुडाच्या आरोपांनी राजकारणाचा स्तरही घसरतो आणि दुसरीकडे आरोप करणाऱ्यांच्या विश्‍वासार्हतेवर प्रश्‍नचिन्ह उभे राहते. भाजप नेत्यांना त्यांनी नेहरू-गांधी परिवारावर केलेले आरोप सिद्ध करता आले नाहीत तर त्या दोषाचे आता धनी व्हावे लागेल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.