अग्रलेख : मोदी विरुद्ध राहुल

सध्या सुरू असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये पाकिस्तानवर करण्यात आलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’च्या निमित्ताने जी चर्चा करण्यात आली, त्यामुळे भारतीय राजकारणाच्या पटलावर पुन्हा एकदा ‘नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी’ असे चित्र उमटले आहे. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानवर लष्करी कारवाई केली होती.त्याबद्दल विविध प्रकारचे प्रश्न निर्माण केले जात असल्याने त्या विषयावर संसदेत चर्चा व्हावी, अशी मागणी सातत्याने केली जात होती. सरकारने ती मागणी मान्य करून चर्चा घडवून आणली. अर्थात जे मुद्दे आतापर्यंत संसदेबाहेर मांडले जात होते तेच पुन्हा एकदा तीव्रतेने संसदेत मांडण्यात आले. पण त्यानिमित्ताने पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यातील राजकीय स्पर्धा समोर आली.
ऑपरेशन सिंदूरअंतर्गत सरकारने पाकिस्तानवर जी कारवाई केली त्यामध्ये अनेक गोष्टींची लपवाछपवी केली जात असल्याची टीका यापूर्वीही अनेक वेळा काँग्रेसने केली होती. संसदेतील चर्चेमध्येसुद्धा राहुल गांधी यांच्यासह सर्वच विरोधी पक्षनेत्यांनी त्याच टीकेचा पुनरुच्चार केला. या मोहिमेमध्ये भारताची निश्चित किती हानी झाली आणि हा संघर्ष थांबवण्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प करत आहेत, त्यात कितपत तथ्य आहे याबाबत खुलासा करण्याची मागणी राहुल गांधी यांनी जोरकसपणे केली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी किंवा इतर विरोधी पक्षनेत्यांनी जे मुद्दे उपस्थित केले त्या प्रत्येक मुद्द्याला उत्तर देताना ऑपरेशन सिंदूर ही कशी यशस्वी मोहीम होती आणि अजूनही ऑपरेशन सिंदूर कसे सुरू आहे याची माहिती दिली. जगाच्या पाठीवरील कोणत्याही नेत्याच्या सांगण्यावरून किंवा त्याच्या मध्यस्थीमुळे भारत-पाकिस्तान यांच्यातील संघर्षाला पूर्णविराम मिळाला नाही, तर भारतीय हल्ल्याला घाबरून पाकिस्ताननेच हल्ले थांबवण्याची विनंती केल्यामुळे भारताने हा संघर्ष थांबवला असे अत्यंत स्पष्ट शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चर्चेला उत्तर देताना सांगितले.
भारत-पाकिस्तान यांच्यातील संघर्ष थांबवण्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी कोणतीही मध्यस्थी केली नाही हे स्पष्टपणे या सभागृहामध्ये नरेंद्र मोदी यांनी सांगावे, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली होती. नरेंद्र मोदी यांनी ती मागणी मात्र पूर्ण केली नाही. त्यामुळे या विषयाला आता पूर्णविराम मिळेल का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार असले, तरी ही चर्चा थांबणार नाही, असे संकेतही मिळत आहेत. कारण अजूनही मोदी सरकार ऑपरेशन सिंदूरबाबत अनेक गोष्टी लपवत असल्याबाबत टीका केली जात आहेत. ही चर्चा सुरू असण्याच्या कालावधीमध्येच पहलगाम हल्ल्याला जबाबदार असणार्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याची बातमी आली होती.
त्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी हे मारले गेलेले दहशतवादी कशावरून पाकिस्तानमधून आले होते, असा सवाल केला. त्या निमित्तानेसुद्धा चर्चा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक महत्त्वाचा मुद्दा मिळाला. विरोधी पक्षांच्या बाजूने जरी राहुल गांधी यांनी तीव्रपणे खिंड लढवली असली तरी सरकारच्या बाजूने पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ऑपरेशन सिंदूर हे किती मोठ्या प्रमाणात यशस्वी झाले याचे दाखले दिले. अर्थात, या निमित्ताने भारतीय लोकशाही पद्धतीचा महानपणसुद्धा समोर आला. संसदेच्या व्यासपीठावर सरकारवर अशा प्रकारे टीका करण्याचे स्वातंत्र्य विरोधी पक्षांना दिले जाते आणि प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा अधिकारही विरोधकांना दिला जातो हेच या चर्चेवरून स्पष्ट झाले.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुन्हा एकदा भारतीय राजकारण नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी या दोन केंद्राभोवतीच फिरत असल्याचे अधोरेखित झाले. सर्वसामान्य नागरिक जेव्हा टीव्हीच्या पडद्यावर अशा प्रकारच्या चर्चा पाहतात तेव्हा राहुल गांधी भाषण करत असताना त्यांचे सर्व मुद्दे त्यांना पटतात आणि या मुद्द्यांना उत्तरे देणार्या नरेंद्र मोदी यांचेही मुद्दे सर्वसामान्य नागरिकांना पटतात. कारण शेवटी एखादा विषय कशाप्रकारे मांडण्यात येतो हे सर्वात जास्त महत्त्वाचे असते. म्हणूनच विरोधकांच्या मागणीप्रमाणे संसदेच्या पटलावर या विषयावर चर्चा झाली असली तरी हा विषय संपणार नाही. अजूनही विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या मनात अनेक शंका आहेत आणि संसदेबाहेरसुद्धा या शंका प्रदर्शित करण्याचे काम केले जाईल.
कारण अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आजच अजून एकदा आपण भारत-पाकिस्तान यांच्या लष्करी संघर्षामध्ये मध्यस्थी केली होती असा उल्लेख केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या वादाला तोंड फुटले आहे. सरकारने कितीही खुलासे केले तरी ते विरोधी पक्षांना पटणार नाहीत आणि विरोधी पक्षांना जे हवे आहे तशा प्रकारचे खुलासे सरकारकडून केले जाणार नाहीत हेच या चर्चेवरून सिद्ध झाले आहे. एखाद्या विषयातील तथ्य किंवा वास्तव समोर आणण्यापेक्षा टीकेला टीकेनेच उत्तर देण्याचा इतिहास आजपर्यंत संसदेतील चर्चेने जपला आहे आणि यावेळीसुद्धा तेच दिसून आले.
राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जोशपूर्ण भाषणे भारतीय नागरिकांना ऐकायला मिळाली. नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी हा राजकीय संघर्ष लोकांना आवडू लागल्याने आता कोणत्या एखाद्या नवीन विषयावर संसदेमध्ये पुन्हा एकदा नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी यांचा असा भाषणांचा सामना होईल याचीच वाट आता सर्वसामान्य नागरिक पाहणार आहेत.





