अग्रलेख : मानसिक आरोग्य?

देशातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांच्या वाढत चाललेल्या आत्महत्यांची सर्वोच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात गंभीर दखल घेतली. अशा घटनांना पायबंद घालण्यासाठी काही देशव्यापी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. सर्वोच्च न्यायालयाने सर्व शैक्षणिक संस्थांना विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य जाणीवपूर्वक जपण्याचे निर्देशही दिले आहेत. गेल्या काही महिन्यांच्या कालावधीमध्ये देशाच्या कानाकोपर्यामध्ये विविध शिक्षण संस्था असोत किंवा खासगी शिकवणी केंद्र असो, त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाचे हे निर्देश अतिशय महत्त्वाचे मानावे लागतील. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आत्महत्या प्रतिबंधक धोरणाप्रमाणे ‘मनोदर्पण’ हा उपक्रम काही कालावधीपूर्वी सुरू करण्यात आला होता.
या उपक्रमाअंतर्गत उम्मीद या नावाने काही मार्गदर्शक तत्त्वेही तयार करण्यात आली होती. त्याच आधारे सर्वोच्च न्यायालयाने आपला हा निर्देश दिला असून सरकारने आपल्या धोरणाचा दरवर्षी फेरआढावा घेऊन त्यामध्ये परिस्थितीप्रमाणे योग्य बदल करावा असेही सुचवले आहे. सरकारतर्फे विविध शिक्षण संस्था किंवा खासगी शिक्षण केंद्रे यांच्यासाठी जोपर्यंत एखादे अशा प्रकारचे धोरण तयार होत नाही तोपर्यंत न्यायालयाने आपली स्वतःची अशी मार्गदर्शक तत्त्वेही जाहीर केली आहेत. आधुनिक काळामध्ये विद्यार्थ्यांमध्येच केवळ स्पर्धात्मकता आहे असे नाही, तर शिक्षण संस्थांमध्ये आणि खासगी शिकवणी संस्थांमध्येसुद्धा स्पर्धात्मक वातावरण आहे.
शिक्षण हा एक वेगळ्या प्रकारचा व्यवसाय झाला असल्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपल्याकडे केंद्रित करण्यासाठी शैक्षणिक संस्था किंवा खासगी शिक्षण केंद्रे मोठ मोठी आश्वासने देऊन आणि भली मोठी फी आकारून विद्यार्थ्यांना अॅडमिशन देतात. पण जेव्हा ती आश्वासने पूर्ण होत नाहीत किंवा आपण अपेक्षा पूर्ण करू शकत नाही असे विद्यार्थ्यांच्या लक्षात येते तेव्हा अनेक वेळा विद्यार्थी आत्महत्येचा मार्ग पत्करतात. राजस्थानमधील शिक्षण प्रणालीचा एकेकाळी जरी मोठ्या प्रमाणात बोलबाला झाला असला, तरी गेल्या काही वर्षांपासून तेथे मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांच्या आत्महत्या झाल्याने या वेगळ्या शैक्षणिक पॅटर्नबाबतही शंका निर्माण होत आहे.
सर्वोच्च न्यायालयाने जी आपली मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत ती सर्वसाधारणपणे प्रतिबंधात्मक आहेत. म्हणजे विद्यार्थ्यांचे मानसिक समुपदेशन करत असतानाच त्यांना सहजासहजी आत्महत्या करता येऊ नये, असे काही उपाय सर्वोच्च न्यायालयाने आपल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सुचवले आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिक्षण घेण्याच्या वयामध्ये विद्यार्थ्यांमध्ये डिप्रेशन वाढण्याचा धोका जास्त असतो. हे डिप्रेशन केवळ अपयशामुळे येते असे नाही तर ते तुलनेमुळेसुद्धा येते. जेव्हा एक कोणत्या शिक्षण संस्थेमध्ये किंवा शिक्षण केंद्रांमध्ये गुणवत्तेच्या आधारे विद्यार्थ्यांची विभागणी केली जाते किंवा वेगळ्या तुकड्या पाडल्या जातात तेव्हा कमी गुणवत्तेच्या विद्यार्थ्यांमध्ये एक प्रकारचा न्यूनगंड तयार होतो. त्यातूनच डिप्रेशन वाढीला लागते, असेही सर्वोच्च न्यायालयाने सूचित केले आहे.
त्यामुळे गुणवत्तेच्या आधारे शैक्षणिक संस्थामध्ये तुकड्यांचे नियोजन केले जाऊ नये हा एक महत्त्वाचा विषय या निमित्ताने अधोरेखित होत आहे. शिक्षणातील यश असो किंवा नंतर नोकरीतील यश असो प्रत्येकालाच त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. साहजिकच कोणाचेही वैयक्तिक मूल्यमापन त्याच्या यश किंवा अपयशावर न करता त्याने प्रामाणिकपणे घेतलेल्या परिश्रमावर करायला हवे हेच सर्वात महत्त्वाचे आहे. पालक जेव्हा लाखो रुपये फी भरून आपल्या पाल्याला एखाद्या संस्थेमध्ये अॅडमिशन घेतात तेव्हाच त्याच्या मनामध्ये चांगले यश मिळवण्याचा दबाव तयार झालेला असतो. पालकांना अपेक्षित असे यश मिळाले नाही तर त्याला नैराश्य येते.
त्यातूनच अनेकजण आत्महत्यासारखा मार्ग स्वीकारतात. गेल्या काही कालावधीमध्ये अशा प्रकारच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढत चालल्यानेच सर्वोच्च न्यायालयाच्या या नव्या निर्देशांची गंभीर दखल केंद्र सरकारलाही घ्यावी लागणार आहे. जरी उम्मीद या प्रकल्पाच्या निमित्ताने केंद्र सरकार या विषयावर काम करत असले तरी हा प्रकल्प देशाच्या कानाकोपर्यात सर्व शिक्षण संस्थांपर्यंत पोहोचणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. यश आणि अपयशाच्या नवीन व्याख्या सध्या रूढ होऊ पाहत आहेत आणि स्पर्धात्मक वातावरणाची तीव्रता वाढत आहे.
ते पाहता विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य जपण्यासाठी आगामी कालावधीमध्ये जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशामुळे या विषयाला वेग मिळाला असला, तरी सरकारचा शिक्षण विभाग, विविध शिक्षण संस्था आणि पालक या सर्वांच्या सहकार्यानेच विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य जपण्याचे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकेल हे विसरता येणार नाही. शैक्षणिक प्रक्रिया ही आव्हानात्मक न वाटता मैत्रीपूर्ण वाटायला हवी.





