अग्रलेख : डोईजड झाली ‘बहीण’

राज्य सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेच्या भवितव्याविषयी ठराविक कालावधीनंतर नियमितपणे अनेक शंका व्यक्त होत असतात. ही योजना राबवणे सरकारच्या आवाक्याच्या बाहेर गेले असल्याचे सातत्याने नमूद होत आहे. त्यामुळे ही योजना बंद करण्याच्या मार्गावर सरकार जात आहे का, अशीही शंका व्यक्त केली जात असते. सरकार उसने अवसान आणून ही योजना बंद होणार नाही असे सांगत असले, तरी ही योजना सरकारला झेपेनाशी झाली आहे हे सातत्याने स्पष्ट होऊ लागले आहे. त्यासाठी आता वेगवेगळे निकष अवलंबत लाभार्थींची संख्या कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या योजनेचा लाभ काही हजार पुरुषांनी घेतल्याचीही बातमी मध्यंतरी आली होती.
महिलांसाठीच्या योजनेचा लाभ खोटे नाव धारण करून पुरुषांनी घेणे हे चूकच आहे, त्यामुळे त्यांच्यावर सरकारने कारवाई करणे अपेक्षित आहे, पण त्याच वेळेला अन्यही कारणे दाखवून हा लाभ नाकारला जात असल्याच्याही तक्रारी येत आहेत. काही महिलांना सुरुवातीचे हप्ते आले पण त्यानंतर एकही हप्ता मिळाला नसल्याच्याही असंख्य तक्रारी आहेत. लाभार्थ्यांच्या यादीतून आपले नाव काढले गेले आहे किंवा कसे हेही त्यांना न कळवता त्यांचे हप्ते बंद झाले, त्यामुळे तिकडेही आरोडाओरड सुरूच आहे. या योजनेचे हप्ते देण्यासाठी विविध मंत्रालयाकडील निधी वर्ग केला जात असल्याने त्या त्या खात्याचे मंत्री नाराजी व्यक्त करीत असल्याच्या बातम्याही अधूनमधून येत असतात. मग सरकार त्यात मखलाशी करून त्या खात्यामार्फत ज्या योजना चालवल्या जातात त्या योजनेअंतर्गतच लाडकी बहीण योजनेचे पैसे देण्याची व्यवस्था केली जाते, त्यावरूनही आगपाखड सुरू असते.
अशातच राज्यातील सरकारी कामे करणार्या कंत्राटदारांची तब्बल 86 हजार कोटी रुपयांची बिले थकल्याच्याही बातम्या झळकतात. लाडकी बहीण योजनेमुळे सरकारी कंत्राटदारांची बिले देण्यास अडचण निर्माण होत असल्याचे कारण पुढे केले जाते. सरकारी कंत्राटदारांची बिले थकल्याने सरकारी कामही अर्धवटच राहते आणि त्याचा त्रासही पुन्हा जनतेलाच सहन करावा लागतो. आज अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे अर्धवट अवस्थेत पडून आहेत. पावसाळ्यामुळे अशा अर्धवट रस्त्यावर नागरिकांच्या हलाखीत आणखीनच भर पडते. मध्यंतरी ‘जलजीवन मिशन’च्या एका कंत्राटदाराने सरकारी बिल न मिळाल्याने आत्महत्या केली. त्या मिशनच्या कंत्राटदार संघटनेने दिलेल्या माहितीनुसार सरकारने ‘जलजीवन मिशन’चेच तब्बल 35 हजार कोटी रुपये थकवले असल्याचे सांगितले गेले.
यालाही ‘लाडकी बहीण’ योजनेवर होणारा अवाढव्य खर्च हेच कारण असल्याचे काही अधिकारी खासगीत सांगतात. एकूण काय तर सरकारला ही योजना आता डोईजड झाली आहे. वास्तविक भारतीय जनता पक्षाने हे आश्वासन देताना ती योजना सरकारच्या तिजोरीला परवडणारी आहे की नाही याचा आधी विचार करायला हवा होता; परंतु केवळ निवडणूक जिंकण्याच्या हव्यासापोटी महिलांना दरमहा पंधराशे नव्हे तर 2100 रुपये देण्याचे गाजर दाखवले गेले आणि आज परिस्थिती अशी आहे की 2100 रुपये तर सोडाच; पण महिलांना आता त्यांचे पंधराशे रुपये देणेही सरकारला अवघड झाले आहे.
तथापि, असे असले तरी सरकारला ही योजना बंद करणे परवडणारे नाही. कारण त्यातून जो मोठा असंतोष निर्माण होईल तो सरकारला परवडणारा नसेल. महिलांची फसवणूक करून या सरकारने सत्ता मिळवली, असा प्रचार सरकारच्या विरोधात केला जाईल. त्यामुळे उर्वरित साडेचार वर्षे रडतखडत का होईना ही योजना चालू ठेवण्याखेरीज सरकारला पर्याय नाही. खरं पाहता शेजारील कर्नाटक आणि तेलंगणा सारख्या राज्यांत महिलांना आर्थिक मदत देणार्या योजना व्यवस्थितपणे सुरू आहेत. तेथील सरकारने त्यासाठी काटेकोर नियोजन केले असून एकाही महिन्याचा हप्ता सरकारने थकवलेला नाही किंवा पुढे मागे केलेला नाही. त्यामुळे महाराष्ट्र सरकारच्या अधिकार्यांनीही या दोन राज्यांच्या योजना अंमलबजावणीचा आढावा घेऊन महाराष्ट्रातील ‘लाडकी बहीण’ योजना सुरू ठेवली पाहिजे.
त्यातूनही जर सरकारला ही योजना बंदच करायची असेल तर सरकारने बहिणींची माफी मागून राज्यात नव्याने निवडणुका घेण्याचा मार्ग पत्करणे कधीही चांगले. केवळ लाडकी बहिणी योजनाच नव्हे तर भारतीय जनता पक्षाने निवडणुकीच्या काळात दिलेल्या अनेक योजनांबाबत या सरकारची फसगत झालेली पाहायला मिळते. निवडणुकीआधी दिलेल्या भरमसाठ आश्वासनांचा सरकारला आता अनेक बाबतीत रीतसर विसर पडल्याचेही दिसते आहे. विशेषतः शेतकर्यांच्या कर्जमाफीच्या घोषणाही भाजपने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात केल्या आहेत. या कर्जमाफीच्या दिशेने सरकारला आता काहीच हालचाल करता येईनाशी झाली आहे.
त्यावर उत्तर देणेही सरकारला अवघड होऊन बसले आहे. राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारली की कर्जमाफी देऊ, आम्ही कर्जमाफीच्या आश्वासनावरून पळ काढलेला नाही वगैरे थातूरमातूर उत्तरे देऊन सरकारला वेळ काढावा लागतो आहे. निवडणुकीपूर्वी अनेक जाती-जमातींसाठी वेगवेगळी विकास महामंडळे जाहीर केली गेली. त्या विकास महामंडळाची स्थापना आणि त्या निधीबाबतही बोंबच आहे. राज्याची आर्थिक शिस्त बिघडली असल्याचेही वारंवार नजरेला येत आहे. असे सगळे होत असताना अक्षरशःअब्जावधी रुपये खर्चाच्या शक्तिपीठ महामार्गाचा घाटही या सरकारने घातला असून त्यासाठी सरकार आक्रमकपणे पाठपुरावा करताना दिसते आहे. आता या वेगळ्या खर्चिक प्रकल्पासाठी सरकार कुठून पैसे आणणार हा आणखीन एक प्रश्न निर्माण होताना दिसत आहे.





