अग्रलेख : सायकल पंक्चर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आणखी एक वक्तव्य वादग्रस्त ठरू लागले आहे. काल हरियाणात एका कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वक्फ बोर्डाच्या संदर्भात असे विधान केले की, या बोर्डाकडे असलेली मालमत्ता जर प्रामाणिकपणे वापरात आणली गेली, तर मुस्लीम युवकांना सायकलचे पंक्चर काढण्यासारखे व्यवसाय करावे लागणार नाहीत. सकृतीदर्शनी ही टिप्पणी साधी किंवा सरळ दिसत असली, तरी त्यात अनेक अर्थ आहेत. एकतर पंतप्रधानांनी मुस्लीम युवकांची हेटाळणी केली असा एक आरोप केला जात असून दुसरा असा आरोप केला जात आहे की, या बोर्डाची मालमत्ता विक्रीला काढण्याची सरकारची जी सुप्त योजना आहे ती पंतप्रधानांच्या वक्तव्यातून बाहेर पडली आहे.
हे विधान मोदी यांनी सन 2014 पूर्वी केलेल्या 15 लाख रुपयांच्या विषयासारखेच आहे, त्याची आठवणही या निमित्ताने झाली आहे. मोदी त्यावेळी म्हणाले होते की, विदेशातला काळा पैसा परत आला तर प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा पंधरा लाख रुपये येतील. वक्फ मालमत्ता विक्रीला काढल्यानंतर मुस्लीम युवकांना सायकल पंक्चरचे दुकान टाकावे लागणार नाही हे विधानही तशाच अर्थाचे आहे. त्यांच्या पंधरा लाखांच्या विधानाची देशभर मोठी खिल्ली उडवली गेली. आता पुन्हा मोदी यांच्या नव्या वक्तव्यातून अशा स्वरूपाच्या विरोधी प्रतिक्रिया सुरू झाल्या आहेत. एमआयएम पक्षाचे नेते ओवेसी यांनी मोदी यांच्या या वक्तव्यावर निशाणा साधताना म्हटले आहे की, जर भाजप आणि संघाने देशाच्या मालमत्तेचा योग्य उपयोग केला असता तर मोदींनासुद्धा लहानपणी चहाच्या टपरीवर चहा विकण्याचे काम करावे लागले नसते.
ओवेसी यांची ही प्रतिक्रिया पाहिल्यानंतर या पुढील काळातही मोदी यांच्या या वक्तव्यावर आणखीन वेगवेगळ्या दृष्टीने टीका केली जाईल आणि वातावरण तापते ठेवले जाईल. काँग्रेस खासदार इम्रान प्रतापगडी यांनी मोदी यांच्या वक्तव्यावर टीका करताना म्हटले आहे की, आज मुस्लीम युवकच नव्हे तर संपूर्ण देशातील अन्य धर्माच्या युवकांवरही मोदी सरकारमुळेच असली हलकी हलकी कामे करून उदरनिर्वाह चालवण्याची वेळ आली आहे. वक्फ मालमत्ता विकून मुस्लीम समाजाचे किंवा मुस्लीम युवकांचे भले करण्याची वाट का बघितली पाहिजे, सरकारला त्यांच्या साधनसंपत्तीतून मुस्लीम युवकांचा हा विकास साधता येणे शक्य आहे किंबहुना देशातील बेरोजगारीचे प्रमाण सरकारने नियोजनपूर्वक प्रयत्न करून कमी केले तर देशातल्या कोणत्या धर्मातील युवकांवर असे काम करण्याची वेळ येणार नाही. काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत आणि अन्य नेत्यांनीही मोदी यांच्या या विधानावर जोरदार हल्ला चढवला आहे.
ही गोष्ट खरी आहे की मुस्लीम समाजातील बेरोजगार युवकांची स्थिती सुधारायची असेल आणि त्यांना चांगल्या दर्जाच्या नोकर्या उपलब्ध करून द्यायच्या असतील तर वक्फ बोर्डाच्या मालमत्ता विकण्यासाठी वाट बघण्याची काही गरज नाही. सरकार त्यांच्या पातळीवर उपाययोजना करूच शकते. वक्फ सुधारणा विधेयक जेव्हा संसदेत आले त्यावेळी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी जे आक्षेपाचे मुद्दे उपस्थित केले होते, त्यातला एक मुद्दा कॉमन होता की सरकारला या बोर्डाकडील जमिनी आपल्या ताब्यात घेऊन त्या आपल्या मित्रांना विकायच्या आहेत. मोदी यांचे हे विधान तोच हेतू ध्वनीत करणारे ठरले आहे. मुस्लीम समुदायाच्या संबंधात पंतप्रधान मोदी यांनी अनेक वेळा यू टर्न घेत परस्परविरोधी भूमिका व्यक्त केल्या आहेत हे देशाने अनेक वेळा अनुभवले आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात आपण पाहिले आहे की एकदा मोदी स्पष्टपणे म्हणाले होते की मी आयुष्यात कधीही हिंदू मुस्लीम केलेले नाही आणि ज्या दिवशी मी हिंदू मुस्लीम करीन त्यादिवशी मी सार्वजनिक जीवनात काम करण्याच्या पात्रतेचा राहणार नाही.
त्यानंतर जेमतेम 24 तासांत त्यांनी पुन्हा जाहीर प्रचारसभांमध्ये मंगळसूत्र, म्हैस, मुजरा असे शब्दप्रयोग वापरात मुस्लिमांवर एकतर्फी टीका केलेली दिसली. कालही हरियाणातील सभेत केलेल्या वक्तव्यातून त्यांनी मुस्लिमांची आणि त्यांच्या समाजातल्या बेरोजगार युवकांची थट्टाच केली आहे, असा आरोप सुरू आहे. केंद्र सरकारला या देशातल्या अल्पसंख्याकांचे भले करायचे असेल तर गेल्या दहा वर्षांत त्यांनी त्यांच्यासाठी नेमके काय केले हेही समोर यायला हवे. आपल्या पक्षाचा अख्खा अजेंडा मुस्लीम विरोधी असल्याचे प्रचारात त्यांनी आणि त्यांच्या पक्षाने वेळोवेळी दाखवून दिले आहे. असे करण्याने हिंदू समाजाची मते आपल्या बाजूने एकवटतात आणि त्याचा आपल्या पक्षाला राजकीयदृष्ट्या एकतर्फी लाभ होतो असे गणित भाजप आणि त्यांच्या नेत्यांनी मांडले आहे. त्यांच्या या गणिताला गेल्या दहा वर्षांत वेळोवेळी यशच मिळालेले दिसले असले, तरी आता मात्र समाजातली धारणा बर्याच अंशी बदललेली जाणवत आहे.
रामदेव बाबांनी रुअफजा कंपनीचा मालक मुस्लीम असून त्याने देशात ‘सरबत जिहाद’ सुरू केल्याचा अजब दावा केला. यातून जनमानस इतके खवळलेले दिसले की सोशल मीडियावर या सरबताच्या बाटल्यासह स्वतःचे फोटो टाकण्याची एक वेगळीच लाट निर्माण झाली. हे एक उदाहरणच देशातील वातावरण फिरले आहे हे सिद्ध करण्यास पुरेसे आहे. त्यामुळे सत्ताधार्यांचा धार्मिक ध्रुवीकरणाचा अजेंडा आता त्यांना पुन्हा विजयापर्यंत नेईल की नाही अशी शंका निर्माण झाली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर केंद्रातील सत्ताधार्यांनी अल्पसंख्य समाजातल्या लोकांचे आणि युवकांचे काही भले करायचे असेल तर ते स्वतःच्या हिकमतीवर करावे, त्यांचीच मालमत्ता विकून त्यांचे भले करण्याची भाषा कोणालाच पसंत पडणारी नाही.





