विविधा : वामन कर्डक

-माधव विद्वांस

शाहीर, कवी आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते वामन तबाजी कर्डक यांची आज जयंती. त्यांचा जन्म 15 ऑगस्ट 1922 रोजी सिन्नर मधील देशपंडी या खेडेगावात झाला. घरच्या परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण घेता आले नाही.पण त्यांना मिळालेली प्रतिभा ही जन्मदत्त देणगी होती. त्यांच्याजवळ लेखणी, वाणी आणि संगीत यांचा सुरेख त्रिवेणी संगम होता.

विशेष म्हणजे ते डाव्या हातानेच पेटी वाजवीत असत. त्यांच्या प्रकाशित आणि अप्रकाशित मिळून साधारणतः दहा हजारांच्या आसपास गीतरचना असल्याचा अंदाज आहे.त्यांच्या हयातीतच त्यांचे चार काव्यसंग्रह प्रकाशित झाले होते. बुद्ध, फुले, आंबेडकर यांचे विचार वामनदादांचे स्फूर्तिस्थान होते.

मुलगी मीराच्या निधनानंतर पुढे आईसोबत पोटाची खळगी भरण्याकरिता वामनदादा मुंबईत आले. त्यांनी गिरणी कामगार, कोळश्‍याच्या वखारीत कोळसा उचलणे, चिक्‍की व आइस फ्रूट विक्री असे अनेक उद्योग केले. नंतर त्यांना टाटा कंपनीत नोकरी मिळाली.

एकदा मुंबईला बी. डी. चाळीत एक माणूस त्याला आलेले पत्र घेऊन दादांकडे आला व म्हणाला, “मास्तर एवढं पत्र वाचून दाखवा.’ वामनदादांनाच काय पण आजूबाजूच्या कुणालाच पत्र वाचता आलं नाही. त्यामुळे त्या माणसाच्या मनाची झालेली तगमग पाहून दादांच्या डोळ्यांत पाणी आलं. त्यांनी साक्षर व्हायचं ठरवून त्यांचे अधिकारी देहलवी यांच्याकडून जिद्दीने अक्षरओळख करून घेतली. पुढे दादांनी डॉ. आंबेडकरांचे विचार गाण्यांमधून सर्वांपर्यंत पोचवायचा विडा उचलून संपूर्ण महाराष्ट्र, मध्य प्रदेश व गुजरात येथे जाऊन आपल्या आवाजाचा करिष्मा दाखवला.

त्यांना पटकथा लेखक, कथाकार, अभिनेता व्हायची खूप इच्छा होती. ते कामासाठी अनेक चित्रपट कंपन्यांमध्ये गेले अखेर त्यांना मिनर्व्हा फिल्म कंपनीत एक्‍स्ट्रा म्हणून प्रवेश मिळाला. जेव्हा काम नसेल तेव्हा ते राणीच्या बागेत तासन्‌तास बसायचे. तेथेच त्यांना पहिले हिंदी गीताचे विडंबन गीत सुचले व ते त्यांनी 3 मे 1943 रोजी चाळीतील लोकांसमोर गाऊन दाखवले आणि त्यांच्यातील कवी लोकांपुढे आला.

“सांगत्ये ऐका’ या चित्रपटाचा रौप्यमहोत्सव झाल्यावर दिग्दर्शक अनंत माने यांच्या डोक्‍यात या चित्रपटात एक नवे गाणे टाकावे अशी कल्पना आली. वसंत पवारांनी शाहीर वामनदादा कर्डक यांचं “अहो, सांगा ह्या वेड्याला माझ्या घरधन्याला कशी जाऊ सांगा मी सासुरवाडीला’ हे गीत निवडलं. हे गीत वसंत पवार यांनी संगीतबद्ध केले आणि विठ्ठल शिंदे यांचेबरोबर कुमुदिनी पेडणेकर यांचेकडून गाऊन घेतले. “ह्यो ह्यो पाहुणा, शकुचा मेहुणा’ हे वामनदादांचे गीत मधुकर पाठक यांनी संगीतबद्ध केले व श्रावण यशवंते यांनी गायले.

त्यांना साहित्य, संस्कृती मंडळाची “उत्कृष्ट कविरत्न’, महाराष्ट्र राज्य शासनाचा “दलित मित्र पुरस्कार’, असे सुमारे 25 पुरस्कार मिळाले. नाशिक आणि बुलढाण्यात त्यांची नाणे तुलाही झाली. महाराष्ट्र शासनाच्या रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाचे व महाराष्ट्र शासनाच्या साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाचे ते तीन वर्षे सदस्य होते. अशा प्रतिभावान शाहिरास अभिवादन.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)