अग्रलेख : उमद्या, तेजस्वी पर्वाचा अस्त

भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या, देशाच्या माजी परराष्ट्रमंत्री, दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री सुषमा स्वराज यांच्या निधनामुळे भारतीय राजकारणातील एका उमद्या आणि तेजस्वी पर्वाचा अस्त झाला आहे. भाजपचे आणखी एक उमदे नेते मनोहर पर्रीकर यांच्या निधनाच्या धक्‍क्‍यातून पक्ष सावरत नाही तोच काळाने भाजपला हा आणखी एक धक्‍का दिला.

अर्थात, सुषमा स्वराज यांच्या निधनाने फक्‍त भाजपची हानी झाली, असे म्हणणे चुकीचे ठरेल. कारण स्वराज यांच्या निधनामुळे साऱ्या देशाचेच नुकसान झाले आहे. कोणाच्याही निधनानंतर श्रद्धांजली वाहण्याचे एक कर्मकांड पार पाडले जातेच; पण स्वराज यांच्या निधनानंतर सर्वच पक्षांतील नेत्यांनी त्यांना अश्रूभरल्या डोळ्यांनी वाहिलेली श्रद्धांजली पाहता त्यांची लोकप्रियता लक्षात यायला हरकत नाही. त्या कोणासाठी माता होत्या तर कोणासाठी मोठ्या भगिनी. पक्षभेद विसरून कोणाच्याही मदतीला धावून जाण्याची त्यांची वृत्तीच त्यांना महान राजकारणी बनवून गेली.

गेल्या काही वर्षांच्या काळात त्यांची प्रकृती त्यांना साथ देत नव्हती म्हणून त्यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेऊन मंत्रिपदही नाकारले होते; पण त्या साऱ्या घडामोडींवर लक्ष ठेवून होत्या. ट्‌विटरवर त्यांच्याइतका सक्रिय नेता दुसरा कोणी नव्हता. त्यामुळेच लोकसभेत “कलम 370′ रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय होताच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करणारे केलेले ट्‌विट शेवटचे ठरावे हा खरोखरच दुर्दैवी योगायोग मानावा लागेल. संसदेत यापूर्वी अनेकवेळा त्यांनी “कलम 370′ रद्द करण्याची मागणी करणारी भाषणे केली होती. त्यामुळेच हे कलम रद्द होताच “याच दिवसाची मी वाट पाहात होते’ हे त्यांचे ट्‌विट महत्त्वाचे होते.

जणूकाही आपले कार्य आता संपले असे समजून त्यांनी काही क्षणातच या जगाचा निरोप घेतला. पण देशाच्या आठवणीत त्यांचे कर्तृत्व, नेतृत्व आणि वक्‍तृत्व नेहमीच राहील यात शंका नाही. व्यवसायाने वकील असल्याने त्यांच्याकडे कमावलेले वक्‍तृत्व आणि हजरजबाबीपणा होता. भाजप दीर्घकाळ विरोधी पक्षात असताना त्यांनी विरोधी पक्षनेता म्हणून गाजवलेली कारकीर्द विशेष लक्षणीय होती. स्वराज भाषण करायला किंवा सरकारवर टीका करायला उभ्या राहिल्या की आता त्या काय बोलणार या विचारानेच सत्ताधाऱ्यांना घाम फुटायचा. अर्थात, योग्य ठिकाणी सरकारला पाठिंबा देण्याचे तारतम्यही त्यांनी राखले होते.

स्वराज यांच्याइतकी विविधरंगी राजकीय कारकीर्द देशात अन्य कोणाच्या वाट्याला आली असेल, असे वाटत नाही. मूळच्या हरियाणातील अंबाला येथील असलेल्या स्वराज यांची राजकीय कारकीर्द देशाच्या कानाकोपऱ्यात बहरली. हरियाणात वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी मंत्री झालेल्या सुषमा नंतर भाजपच्या सक्रिय नेत्या झाल्या आणि पक्ष सांगेल ते करायचे हे एक कलमी तत्त्व त्या राबवत होत्या. म्हणूनच त्या अगदी अल्पकाळ दिल्लीच्या मुख्यमंत्रीही झाल्या. पक्षाच्या इच्छेप्रमाणे त्यांनी मध्य प्रदेशातून निवडणूक लढवली. जेव्हा सोनिया गांधी निवडणुकीच्या राजकारणात सक्रिय होऊ पाहात होत्या तेव्हा त्यांना थेट आव्हान देण्याची जबाबदारीही पक्षाने त्यांच्यावरच टाकली होती.

कर्नाटकातील बेल्लारी मतदारसंघात सुषमा आणि सोनिया यांच्यातील ही लढत लक्षणीय ठरली होती. ही लढत सोनिया यांनी जिंकली असली तरी सुषमा यांनी आपला ठसा उमटवला होता. भाजपच्या आघाडीच्या नेत्यांमध्ये त्यांचा समावेश असल्याने पक्षाला सत्ता मिळाल्यावर स्वराज यांना मंत्रिपद मिळणे क्रमप्राप्त होते. त्यांची मंत्री म्हणून कारकीर्द विशेष उल्लेखनीय मानावी लागते. अटलबिहारी वाजपेयी यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात त्यांनी इतर खात्यांसोबतच संसदीय कार्यमंत्रिपदाचा कार्यभार मोठ्या कुशलतेने हाताळला होता. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात सुषमा स्वराज यांच्या खांद्यावर परराष्ट्र खात्याची महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली होती. मोदी यांच्या नेतृत्वाखाली बाकीचे नेते झाकोळून जात असताना स्वराज यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यामुळेच परराष्ट्रमंत्री म्हणून त्यांचा हा कार्यकाळ संपूर्ण देशवासीयांच्या कायम आठवणीत राहणारा ठरला.

सोशल मीडियाचा अचूक वापर करून जनतेच्या मदतीसाठी त्या कायमच तत्पर होत्या. खरेतर परराष्ट्र खात्याचा सामान्य माणसाशी फारच कमी संबंध येतो; पण या मंत्रालयाला सामान्य माणसाच्या अधिक जवळ आणण्यात सुषमा यांचा मोलाचा वाटा होता. “जर तुम्ही मंगळावरही अडकलात तरी भारतीय दूतावास तुमच्या मदतीसाठी धावून येईल’, अशा आशयाचे ट्‌विट त्यांनी एकदा केले होते आणि सरकार तुमच्या मदतीला सदैव तयार असल्याचे सूचित केले होते. सौदी अरेबिया, लिबिया, येमेन, सुदान यांसारख्या अनेक देशांतील भारतीयांना त्यांनी सुरक्षित मायदेशी आणले होते. एवढंच काय तर एखाद्या व्यक्‍तीचा पासपोर्ट किंवा काही महत्त्वाची कागदपत्रे हरवली तर त्या संबंधित ठिकाणच्या भारतीय उच्च अधिकाऱ्यांना त्यांच्या मदतीसाठी पाठवत असत.

पाकिस्तानसारख्या देशातूनही कोणत्या नागरिकांनी मदत मागितली तर त्या मदतीसाठी तत्पर होत्या. पाकिस्तानातून अनेकांना भारतात उपचारासाठीही त्यांनी व्हिसा मिळवून दिला होता. पाकिस्तानात राहात असलेल्या कर्णबधिर आणि मूकबधिर गीता हिच्यावर त्यांचे असलेले प्रेम याचे उत्तम उदाहरण आहे. देशाच्या परराष्ट्र खात्याची धुरा सुषमा स्वराज यांनी समर्थपणे सांभाळली. चीनने जाणीवपूर्वक निर्माण केलेला डोकलाम प्रश्‍न त्यांनी संयमाने हाताळला. कुठल्याही परिस्थितीत प्रश्‍न युद्धाच्या नव्हे तर वाटाघाटीच्या माध्यमातून सोडवण्यावर त्यांचा नेहमीच भर राहिला होता. त्यामुळेच त्यांच्या कारकिर्दीतले बरेच निर्णय गाजले. पाकिस्तानात फसवून नेलेल्या भारतीय महिलांची सुटका, इराकमधून नर्सेसची सुटका, इराकमधून 39 भारतीय कामगारांची सुटका, जर्मनीमध्ये पासपोर्ट हरवलेल्या महिलेची सुटका अशा अनेक घटनांमधून त्यांची कार्यक्षमता समोर आली होती.

आपल्या विदेश दौऱ्यासाठी प्रसिद्ध असलेल्या पंतप्रधान मोदी यांच्याबरोबर विदेश दौरा करताना स्वराज आपला स्वतःचा ठसाही उमटवत असत. कुलभूषण जाधव प्रकरणात त्यांनी पाकिस्तानला दिलेले उत्तर असो किंवा हा विषय जागतिक न्यायालयापर्यंत नेण्याचा निर्णय असो स्वराज यांनी आपली कार्यक्षमता आणि निर्णयक्षमता दाखवून दिली होती. अटलजी आणि अडवाणी यांच्या मुशीत तयार झालेल्या स्वराज यांचा मोदी यांना पंतप्रधान करण्यास विरोध होता पण एकदा पक्षाने निर्णय घेतल्यानंतर त्यांनी मोदी यांना चांगली साथ दिली एकूणच त्यांचा हा राजकीय प्रवास तेजस्वी असल्याने त्यांच्या मृत्यूनंतरही त्याचे तेज कायम राहणार आहे

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.