स्मरण : जालियनवाला बाग हत्याकांडाची शंभरी

-विठ्ठल वळसेपाटील

150 वर्षे जुलमी राज्य करणाऱ्या ब्रिटिशांनी अखंड हिंदुस्थानचे जाताना दोन तुकडे केले. अनेक अमानुष छळ केले व नरसंहार केले. या नरसंहारात जालियनवाला बाग हत्याकांड ही अमानुष घटना होय. प्रत्येक भारतीयाच्या मनात धगधगत राहणारी घटना म्हणजे जालियनवाला बाग हत्याकांड. अमानुषतेचा कळस गाठलेल्या या घटनेने शंभरी पार केली. 13 एप्रिल 1919 रोजी पंजाब प्रांतातील अमृतसर येथील जालियनवाला बागेत निःशस्त्र मुले, महिला व पुरुषांवर 1600 बंदुकीच्या फैरी झाडून जवळपास हजार लोकांचे बलिदान घेणारी घटना. पण हे बलिदान व्यर्थ गेले नाही. यातून नव्या क्रांतिकारकांनी जन्म घेतला. स्वातंत्र्याच्या आहुतीमध्ये बलिदान झालेल्या देशभक्‍त नागरिकांना विनम्र अभिवादन !

देशात ब्रिटिश धोरणाच्या विरोधात असंतोष पसरला होता. देशभर स्वातंत्र्याचे वारे वाहत असताना पंजाब प्रांताने मोठी आघाडी उभी केली होती. 10 एप्रिल 1919ला अमृतसर येथे दोन क्रांतिकारकांच्या सुटकेसाठी डेप्युटी कमिशनर यांच्या घरावर गेलेल्या मोर्चावर गोळीबार केला. याचे पडसाद लगेच उमटले. ब्रिटिश कार्यालये, बॅंक, टपाल व डाक कार्यालय सरकारी इमारती लक्ष्य केले गेले. जाळपोळ सुरू झाली. हा असंतोष सरकारने दडपण्यासाठी जमावबंदी लागू केली होती. त्यामुळे शहरात फिरण्यास बंदी होती.

त्याच वेळी 13 एप्रिलला पंजाबी लोकांचा बैसाखी हा महत्त्वाचा सण होता. त्यानिमित्त अमृतसर येथील जालियनवाला बागेत जवळपास 20 हजार लोक जमले होते. या लोकांवर जनरल मायकेल ओडवायरच्या आदेशानुसार जनरल रेजिनाल्ड डायरने 15 मिनिटे गोळीबार केला. 1,650 गोळ्या खर्ची पडल्या. मशीनगनचा वापर केला. जीव वाचवण्यासाठी काहींनी तेथील विहिरीत उड्या घेतल्या. यातून सव्वाशे मृतदेह बाहेर काढले तर हजारपेक्षा जास्त मृत्यू पावले. अनेकजण जखमी झाले.

या नरसंहारबाबत डायरला ना खेद ना खंत होती. त्याने या गोष्टीचे वर्णन मात्र हंटर आयोगासमोर शौर्य गाजविल्यासारखे सांगितले तर पंजाब शासकानी तर कहरच केला ? इंग्लंडच्या राणीला प्रशंसेचे पत्र लिहिले. या घटनेनंतर देशातील स्वातंत्र्यलढा मोडण्याचे प्रयत्न झाले. अमृतसरचे पाणी तोडले. मारझोड, अटक सुरू केली. रेल्वेचे तिसऱ्या श्रेणीचे तिकीट बंद करून प्रवास बंद केला. या अमानुषतेचा सूड मात्र त्यांच्या भूमीवर जाऊन 21 वर्षांनी एका भारतभूमीच्या पुत्राने घेतला. तो महान क्रांतिकारक सरदार उधमसिंह होय.

हा नरसंहार हिंदुस्थानात 1857 च्या लढ्याची आठवण करून देणार होता. या घटनेने ब्रिटिश जितके आक्रमक झाले तितकेच क्रांतिकारक निर्माण झाले. या घटनेच्या शंभरीला इंग्लंड पंतप्रधान थेरेसा मे दुःख व्यक्‍त करून लज्जास्पद व कलंकित घटना आहे असे म्हणतात; परंतु माफी मागत नाहीत. यापूर्वी 1997 साली राणी एलिझाबेथ यांनी जालियनवाला बागेला भेट देत आमच्या भूतकाळाच्या इतिहासातील हे दुःखद उदाहरण आहे असे म्हणतात.

तर सन 2013 मध्ये डेव्हिड कॅमेरून भेटीदरम्यान हत्याकांडास ते लज्जास्पद म्हणतात; परंतु एकही पंतप्रधान अथवा आधिकारी जाहीर माफी मागत नाही. असे असले तरी हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचा व संस्कृतीचा जगाला विसर पडत नाही. परंतु इंग्लंडमध्ये लेबर पार्टीने मात्र भारताची माफी मागावी अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे. पार्लमेंटमध्ये माफीची मागणी करून हिंदुस्थानच्या वीरांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली वाहिली आहे.

जालियनवाला बाग घटनेत सरदार उधमसिंह जखमी झाले होते. या घटनेपूर्वी आई, वडील, भाऊ सारे जग सोडून गेले होते. या घटनेला आदेश देणारा जनरल मायकेल ओडवायर जबाबदार असल्याचे त्यांचे ठाम मत होते. या घटनेचा उधमसिंह यांच्या मनावर परिणाम झाला. बदला घेण्यासाठी उधमसिंह यांनी 1934 मध्ये इंग्लंड गाठले. त्यांनी तिथे एक कार व पिस्तूल खरेदी केली. वेळ मिळेल तेव्हा संधी शोधली. असाच 13 मार्च 1940 चा दिवस उगवला.

लंडनच्या कॅटसन हॉलमध्ये सभा होणार होती. त्या सभेत ओडवायर जातीने हजर होता व त्याचे भाषण होणार होते. त्यांच्या जवळ जाऊन भर सभेत भारतमंत्री झेटलॅंड यांच्या उपस्थितीत दोन गोळ्या झाडून त्याचा वध केला. अखेर 21 वर्षांनंतर बदला पूर्ण झाला. अभिमानाने व कर्तव्यपूर्तीच्या समाधानात पेंटनविले तुरुंगात अखेर उधमसिंह यांनी 31 जुलै 1940 रोजी हसत हसत हौतात्म्य स्वीकारले. पुढे अनेक देशाभिमानी हिंदुस्थानियांच्या प्रयत्नांती हुतात्मा उधमसिंहांचे अवशेष 1974 साली हिंदुस्थानात आणले गेले व सुनाम या त्यांच्या जन्मगावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

जालियनवाला बाग घटनेला शंभर वर्षे पूर्ण होत असताना सर्व भारतीयांना या घटनेचे स्मरण झाले पाहिजे तसेच प्राणाची आहुती देणाऱ्या क्रांतिकारकांची स्मृती जागवल्या पाहिजेत. स्वातंत्र्य हे सहजासहजी मिळाले नसून त्यासाठी मोठे बलिदान मोजावे लागले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.