आजमितीला अमेरिकेतील करोनाग्रस्तांचा आकडा 1 लाख 64 हजारांच्यावर गेला असून, आजच्या घडीला मृतांचा आकडा 3 हजार 170 इतका झाला आहे. इतके दिवस चीनची गंमत पाहत बसलेल्या अमेरिकेच्या बुडालाच आता “करोना विषाणू’ने आग लावली आहे. जगातला सर्वात शक्तिमान आणि शहाण्या लोकांचा देश म्हणून आजवर अमेरिका ओळखली जात होती. पृथ्वीवरच नव्हे; तर अंतरिक्षात आणि ब्रह्मांडात आपले वर्चस्व प्रस्थापित करून राहिलेल्या या देशाची आजची अवस्था मात्र “करोना’ नावाच्या एका अदृश्य विषाणूने अत्यंत केविलवाणी करून टाकली आहे.
जगभर “करोना’चे थैमान सुरू असताना; आणि अमेरिकेलाही याचा तितकाच धोका संभवत असताना, हे लोक नेमके करत काय होते, असा प्रश्न निर्माण होतो. त्यांनी “लॉकडाउन’ उशिरा जाहीर केल्याचा हा परिणाम मानला जात आहे. केवळ “सोशल डिस्टन्सिंग’वर यांची भिस्त होती काय, असाही प्रश्न पडतो. आज चीनच्या दुप्पट करोनाग्रस्त अमेरिकेत आहेत. त्यांच्यात बरे होण्याचे प्रमाणही तुलनेने कमी आहे. आजमितीला केवळ साडेपाच हजार लोक करोनातून बरे झाले असून, हजारो लोक रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्यासाठी इतके वैद्यकीय मनुष्यबळ कोठून आणायचे, अशी समस्याही आता त्या देशात निर्माण झाली आहे.
चीनप्रमाणेच त्यांनीही करोनाच्या बाबतीतील सध्याची स्थिती जगापुढे खुलेपणाने आणलेली नाही. काही वाहिन्यांनी आपल्या संपर्कातून अमेरिकेतील स्थितीचे व्हिडिओ मिळवून ते प्रसारित केले आहेत. पण त्यातूनही तेथे नेमके काय चालू आहे, याचे चित्र स्पष्ट होताना दिसत नाही. अमेरिकेने आपल्या नौदलाची वाहने किनाऱ्यालगत आणून त्यात करोनाग्रस्तांवर उपचार सुरू केले आहेत, असे एके ठिकाणी नमूद करण्यात आले आहे. पुढील दोन आठवड्यात अमेरिकेतील मृतांचा आकडा एक लाखाच्यावर जाऊ शकतो, असे खुद्द राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पच म्हणाले आहेत. ही भयावह स्थिती आहे. करोनाशी मुकाबला करण्यासाठी अमेरिकेच्या प्रशासनाने तातडीने दोन ट्रिलियनचे आर्थिक पॅकेज जाहीर करून प्रभावी आर्थिक उपाययोजना केली असली, तरी त्यांना देशातील या रोगाच्या प्रसाराला आळा घालणे का शक्य झाले नाही, याचे आश्चर्य वाटल्याखेरीज राहत नाही.
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी या आधी, “येत्या “ईस्टर’पर्यंत म्हणजेच 12 एप्रिलपर्यंत अमेरिका करोनाच्या विळख्यातून बाहेर येईल आणि देशातील सारे व्यवहार पुन्हा सुरू होतील’; अशी ग्वाही मागच्याच आठवड्यात दिली होती. पण आता मात्र त्यांनी, “येत्या 1 जूनपर्यंत ही स्थिती कायम राहील’, असे म्हटले आहे. आपल्याकडील राजकीय स्थितीप्रमाणेच तेथेही राज्यकर्त्यांमध्ये फुशारक्या मारण्याची प्रवृत्ती आहे, असेही दिसून आले आहे. “आम्ही केलेल्या उपाययोजनांमुळेच मृतांचा आकडा एक लाखाच्या मर्यादेवर राहू शकेल, अगदी बिकट परिस्थितीत हा आकडा दोन लाखांच्यावर जाणार नाही अन्यथा किमान 22 लाख लोक यात बळी पडले असते,’ अशी फुशारकीही ट्रम्प तात्यांनी मारलेली ऐकायला मिळाली आहे. “येत्या दोन आठवड्यात एक लाखाच्या आसपास लोक यात बळी पडतील’ असे बिनदिक्कत भाकीत करतानाही राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना त्यात फुशारकी मारावीशी वाटत असेल, तर आपल्याकडील परिस्थिती बरीच बरी आहे, असे म्हणावे लागते.
सुरुवातीच्या काळात “करोना’ विषाणूचा उल्लेख “चायनीज व्हायरस’ असा सातत्याने करून ट्रम्प यांनी चीनला याबाबतीत दोषी धरण्याचा प्रयत्न केला आहे. तथापि डिसेंबर महिन्यातच अमेरिकी लष्करातूनच या विषाणूचा संसर्ग सुरू झाल्याचा दावा चीनमधील तज्ज्ञ करीत आहेत. या दोन्ही राष्ट्रांनी या रोगाच्या प्रसाराबद्दल एकमेकांना दोष देत दुगाण्या झाडल्या असल्या, तरी यातून दोन्ही देशांना जो मोठा फटका बसला, त्याची काळजी किंवा चिंता त्यांच्या तोंडून निघालेली नाही, हे विशेष. चीनने आता या रोगावर नियंत्रण मिळवले असले, तरी अमेरिकेत मात्र अजून याचा शिखर कालावधी यायचा आहे. तो येत्या दोन आठवड्यात येईल, असे त्या लोकांचे म्हणणे आहे.
“मनुष्य जीवनाच्या सुरक्षेविषयी कमालीची दक्षता घेणारा देश,’ अशी अमेरिकेची ख्याती असताना, या रोगाचा धोका वेळीच ओळखून त्यांना तो रोखण्यात अपयश कसे आले, हा मोठा औत्स्युक्याचा विषय आहे. या महामारीने इटली आणि स्पेन सारख्या समृद्ध देशांनाही चांगलाच फटका दिला आहे. इटलीतील मृतांचा आकडा अकरा हजारांच्यावर आणि स्पेनमधील मृतांचा आकडा सहा हजारांच्यावर गेला आहे. समृद्ध आणि प्रगत देशातील सारी यंत्रणा आणि त्यांच्या दक्षतेविषयीच्या साऱ्या कथा यातून धुळीला मिळाल्या आहेत. त्यांची वैद्यकीय सिद्धता वगैरे बाबी खोट्या होत्या, असे वाटावे अशीच ही सारी स्थिती आहे. आजच्या स्थितीनुसार अमेरिकेतील करोनाची चाचणी घेण्यासाठी लोकांना पाच दिवसांची प्रतिक्षा करावी लागत आहे, असे सांगितले जाते.
प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार, न्यूयॉर्कमध्ये आयसीयू बेडची सध्याची उपलब्ध संख्या 3 हजार आहे. त्यांना आज 40 हजार आयसीयू बेडची गरज आहे. त्यामुळे त्यांना आता हॉटेलमधील रूम्स, महाविद्यालयांमधील खोल्यांचे रूपांतर हॉस्पिटलमध्ये करून, तेथे आयसीयू बेडची व्यवस्था करावी लागली आहे. त्यांच्याकडे साधनसामग्रीची कमतरता नसल्याने ते ही व्यवस्था सध्या करू शकत असले, तरी यापुढील काळात नेमक्या किती रुग्णांवर उपचार करायची वेळ आपल्यावर येणार आहे, याचा त्यांनाही अंदाज लागेनासा झाला आहे.
आता “करोना’वरील उपचारासाठी त्यांनी तातडीने संशोधन वगैरे हाती घेतले असल्याचे सांगितले जात असले, तरी अजूनही “करोना’वर प्रभावी औषध सापडलेले नसल्याने अमेरिकेसारखा देश या आव्हानाला कसा सामोरे जाणार आहे, याची साऱ्या जगाला चिंता पडली आहे. केवळ पैसा हे मनुष्यासाठी पुरेसे साधन नसते, याची प्रचिती हा देश सध्या घेताना दिसून येत आहे. त्यांचे 2 ट्रिलियनचे पॅकेज या रोगाचा फैलाव थांबवू शकलेले नाही. अमेरिकेची ही असहायता दयनीय आहे. जगातला हा सामर्थ्यशाली देश लवकर यातून सावरावा, अशीच सर्वांची इच्छा आहे.