अग्रलेख : आणखी एक बोजा

इंधनाच्या दरात करण्यात आलेली उत्पादन शुल्काची वाढ, गॅस सिलिंडरच्या दरात झालेली वाढ, पाइप गॅसच्या दरात झालेली वाढ, या सगळ्या दरवाढीच्या बातम्या एकापाठोपाठ एक आल्यानंतर लोकांवर आणखी एक बोजा सरकारने टाकला आहे. हा बोजा म्हणजे सहकारी सोसायटीमध्ये राहणार्या सभासदांच्या मेंटेनन्सवर नव्याने आकारल्या जाणार्या जीएसटीचा आहे. शहरी मध्यमवर्गीयांसाठी हा दणका मोठा आहे. शहरी मध्यमवर्गीय ज्या सोसायट्यांमध्ये राहतात त्या सोसायटीतील देखभाल खर्चासाठी ते दरमहा काही पैसे मेंटेनन्स म्हणून भरतात. या मेंटेनन्सवर आता तब्बल 18 टक्के जीएसटी लागू केला जाणार आहे. आता खरं म्हणजे ही लोकांनी कपाळावर हात मारून घ्यावी अशी बाब आहे.
या आधीच देशातील सर्व नागरिक ब्रँडेड आटा, पनीर, दही अशा वस्तूंपासून जवळपास सगळ्याच वस्तूंवर वेगवेगळ्या टप्प्यातील जीएसटी भरत असतो. वह्या, पेन्सिल, दप्तरे अशा शालेय शैक्षणिक साहित्यावर पण जीएसटी लागूच आहे. सर्वच प्रकारच्या सेवांवरसुद्धा जीएसटी लागू आहे, फक्त सोसायट्यांचा मेंटेनन्स हा एकच विषय राहिला होता, सरकारची नजर आता त्याच्यावरही पडली आहे. हे सरकार देशातील जनतेला सळो की पळो करून सोडत आहे असेच चित्र दुर्दैवाने दिसते आहे. जनतेला दिलासा देणारी कोणतीही बाब किंवा निर्णय सरकारकडून घेतला जात नाही, किंबहुना जनतेला आता सरकारकडून कोणतीच आशा उरलेली नाही. देशाच्या भीषण आर्थिक व्यवस्थेचा फटका या आधीच जनसामान्यांना बसलेला आहे.
बेरोजगारीचा दर गेल्या पन्नास वर्षातील उच्च अंकी पातळीवर आहे, नागरिकांचे उत्पन्न घटते आहे, कुठल्याच क्षेत्रात अपेक्षित पगारवाढ होताना दिसत नाही. यामुळे अत्यंत घायकुतीला आलेला गरीब आणि मध्यमवर्ग आपले दैनंदिन जीवन कसेबसे रेटत असताना केंद्र सरकारने अलीकडे हे धक्क्यामागून धक्के दिले आहेत. सरकार जनसामान्यांचा कुठल्याच दृष्टीने का विचार करत नसावे हे कोडे अजिबात उलगडत नाही. प्रसारमाध्यमांवर याची जरासुद्धा चर्चा होताना दिसत नाही. वास्तविक सरकारने स्वतःचे नुकसान करून न घेता आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे जे दर घसरले आहेत त्याचा लाभ जनतेला करून देणे सहज शक्य असताना सरकारने मात्र इंधनावरील उत्पादन शुल्कात वाढ करून जो लाभ नागरिकांना मिळणे अपेक्षित होता त्यात सरकारने स्वतःच हात धुऊन घेतल्याचे पाहायला मिळाले आहे.
हे कथानक आजवर आपण इतक्या वेळा ऐकले आहे की देशातील इंधनाचे भाव कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय दरावर ठरतात, मग हे जर असे असेल तर कच्च्या तेलाचे भाव उतरल्यानंतर त्याचा जनतेला लाभ का होत नाही, इंधनावर उत्पादन शुल्क लावून जनतेला होणारा हा लाभ सरकार परस्पर का काढून घेते, हा प्रश्न मोदी सरकारच्या काळात वारंवार पडतो आहे. इंधनावरील उत्पादन शुल्कात करण्यात आलेल्या वाढीतून केंद्र सरकारने गेल्या काही वर्षांत 35 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिकची रक्कम वसूल केली आहे. म्हणजे याचाच अर्थ कच्च्या तेलाच्या किमती घसरल्याने जनतेच्या खिशात जे 35 लाख कोटी रुपये जाणार होते ते सरकारने परस्पर काढून घेतले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे भाव आणि देशातील पेट्रोल, डीझेलचे दर यावर आता कोणीच चर्चा करताना दिसत नाही किंबहुना ती चर्चाच होऊ दिली जात नाही.
जनतेला अंधारात ठेवून मुस्कटदाबी करण्याचे हे अजब तंत्र सरकारने अवलंबले असले, तरी माहिती तंत्रज्ञानाच्या या युगात कोणत्या ना कोणत्या मार्गाने जनतेपर्यंत ही माहिती पोहोचतच असते. त्यामुळे जनता अजूनही शांत दिसत असली तरी तिच्या मनात या सगळ्या भीषण आर्थिक संकटाविषयी संतापाची भावना आहे. त्या भावनेचा उद्रेक होण्याची वाट सरकार पाहात आहे का, असा प्रश्न या निमित्ताने विचारावा लागेल. मध्यंतरी राघव चढ्ढा यांनी संसदेत भाषण करताना मानवी जीवनाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या ज्या सहा प्रमुख अवस्था आहेत, त्या प्रत्येक टप्प्यावर जनतेला कसा कर भरावा लागतो याचे तपशीलवार विवेचन केले होते. इतकी सगळी करवसुली करूनही सरकारने नागरिकांना एक तरी उत्तम दर्जाची सुविधा पुरवली आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता आणि तो अत्यंत रास्त आहे.
जर जनतेला जागतिक दर्जाची आरोग्य सुविधा, शिक्षण सुविधा किंवा अन्य सार्वजनिक सुविधा यापैकी एकही सुविधा मिळत नसेल आणि तरीही सरकार फक्त विविध मार्गाने भरमसाठ वसुलीचाच मार्ग अवलंबत असेल तर मग सरकारकडे जमा होणारा इतका महाप्रचंड कर महसूल नेमका जातो तरी कुणाकडे हा प्रश्न वारंवार निर्माण होतो. काही ठराविक उद्योगपतींना सवलतीची खैरात होते, त्यांचे लाखो कोटी रुपयांचे कर्ज माफ होते यावर रोजच आक्षेप नोंदवले जात आहेत. मग जनतेला अशाच सवलती का मिळत नाहीत. जनतेने फक्त कर भरायचा आणि सरकारशी संबंधित असलेल्या ठराविक उद्योगपतीने मजा मारायची हे असे किती दिवस चालणार, याचा आता सोक्षमोक्ष लावण्याची वेळ आली आहे. सहकारी सोसायट्यांच्या मेंटेनन्सवर 18 टक्के जीएसटी हा अतिरेकीपणाचा कळस आहे.





