पुणे पोलिसांना नवा गणवेष मिळणार
पुणे, ता. 11 – सध्याचा पुणे पोलिसांचा बोजड गणवेष जाऊन आता पुण्याचा पोलिस हा नव्या व सुटसुटीत अशा गणवेषांत दिसू लागेल. हा नवा गणवेष पूर्वीचा जाड्याभरड्या डगल्याऐवजी एक खाकी शर्ट आणि खाकी हाफपॅंट पोलिसांना देण्यात आली आहे. काही पोलिसांचे अंगावर हा नवा गणवेष काल परवापासून दिसून येऊ लागला असून लवकरच पुण्यातील प्रत्येक पोलीस या नव्या गणवेषात दिसू लागेल.
भारत-अमेरिका यांचे मतभेद आणि मतैक्य
न्यूयॉर्क – “भारत-अमेरिकेचे अनेक मतभेद असले तरी अनेक बाबतीत साम्य आहे. उभय राष्ट्रांना माणसाच्या प्रतिष्ठेची कदर वाटते. मानवी स्वातंत्र्याची महती वाटते आणि सरकार हे जनतेचे सेवक आहे, अशी उभयतांची भावना आहे. जनता ही आपल्या हातचे खेळणे आहे असे ते मानीत नाहीत,’ असे राष्ट्रसंघातील अमेरिकेचे कायमचे प्रतिनिधी हेन्री कॅन्ट लॉज यांनी व्यक्त केले.
संसदीय सभासदांना विमान प्रवास मोफत नाही
नवी दिल्ली – मोफत विमान प्रवास आणि संसदेचे अधिवेशन चालू असताना स्टेनोग्राफर्स इ. सवलती संसदेच्या सभासदांना मिळाल्या पाहिजेत अशी मागणी आज संसदीय सभासदांच्या भत्त्याविषयीच्या विधेयकावरील चर्चेच्यावेळी करण्यात आली. लोकांच्या आर्थिक स्थितीशी तुलना करता संसदीय सभासदांना मिळणाऱ्या सवलती पुरेशा आहेत. आणखी अशा सवलती घेतल्या तर सभासदांचा एक वेगळा वर्गच बनेल; सध्या पहिल्या वर्गाने जाण्याची सवलत काढून टाकून तिसऱ्या वर्गाने जाण्याचीच मुभा ठेवावी.
जमीनविषयक धोरण स्थूलमानाने पूर्वीचेच
नवी दिल्ली – नियोजन मंडळाने ठरवलेले जमीनविषयक धोरण स्थूलमानाने चालू राहणार असून, देशात सर्वत्र त्याचाच अवलंब केला पाहिजे असे पंतप्रधान पं. नेहरू यांनी स्पष्ट केले. राजस्थानच्या जमीनदारांनी सादर केलेल्या निवेदनास अनुलक्षून विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तर दिले.