विविधा : डॉ. मोहन धारिया

-माधव विव्दांस

सैनिक, पर्यावरणवादी,आणीबाणीला विरोध करणारे, समाजवादी चळवळीचे कार्यकर्ते डॉ. मोहन धारिया यांची आज जयंती. त्यांचा जन्म 14 फेब्रुवारी 1925 रोजी रायगड जिल्ह्यातील ‘नाते’ या गावी झाला. त्यांचे माध्यमिक शिक्षण महाड येथे झाले. त्यानंतर त्यांनी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्याचवेळी म. गांधींनी “छोडो भारत’ आंदोलन सुरु केले होते.

शिक्षण सोडून ते चळवळीत उतरले त्यावेळी ते 16 वर्षांचे होते. त्यांना त्यावेळी शिक्षाही झाली. त्यानंतर त्यांनी पुण्याच्या लॉ कॉलेजमधून कायद्याचे शिक्षण घेतले.कायद्यातील पदवी घेतल्यावर मुंबई येथे हायकोर्टात ते वकिली करू लागले. वकिलीबरोबर ते सामाजिक व राजकीय क्षेत्राशी जोडले गेले. मोहन धारिया यांनी यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी ‘लोकसेना’ नावाची संस्था सुरू केली.

अंगी असलेल्या नेतृत्व कौशल्यामुळे शेकडो तरुण त्यांच्या मागे आले. पुढे त्यांनी वेगवेगळ्या संघटनांना एकत्र आणले व पुण्यात ‘नॅशनल लेबर सेंटर’ ची स्थापना केली. पुरोगामी विचारांच्या धारियांनी प्रजासमाजवादी पक्षाचे काम सुरु केले.ते 1957 ते 1960 या काळात पुणे महापालिकेत नगरसेवक होते.

वर्ष 1964 ते 1970 या काळात ते राज्यसभेचे सदस्य झाले. समाजवादी पक्ष सोडून ते इंदिराजींच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसमध्ये आले पण त्यांनी समाजवादी विचारधारा सोडली नाही. खासदार असताना मोहन धारिया यांनी 1970 मध्ये संयुक्त राष्ट्रसभेत (युनो) भारताचे प्रतिनिधित्व केले. जोहान्सबर्ग येथे झालेल्या शाश्‍वत विकासाबाबतच्या जागतिक शिखर परिषदेत गेलेल्या भारताच्या शिष्टमंडळाचे त्यांनी नेतृत्व केले होते.

इंदिराजींच्या मंत्रिमंडळात 1971 ते 1975 या दरम्यान योजना, बांधकाम, गृहनिर्माण व नगरविकास या खात्यांचे राज्यमंत्री झाले. इंदिराजींनी आणीबाणी पुकारल्यावर त्यांनी राजीनामा दिला. या कालावधीत त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. पुढे 1977 मध्ये जनता पक्षाच्या राजवटीत मोरारजी देसाई यांच्या मंत्रीमंडळात त्यांनी वाणिज्य, ताग, कापड, नागरी पुरवठा व सहकार या खात्यांची जबाबदारी सांभाळली. त्यांच्या अध्यक्षतेखालच्या समितीने ‘धारिया कमिटी रिपोर्ट’ हा शिक्षित बेरोजगारांसाठी एक केलेला अहवाल शासनाने स्वीकारला होता.

वर्ष 1983 मधे त्यांनी “वनराई’ संस्थेची स्थापना केली. पर्यावरणास चालना व लोकसहभागातून विकास साधणे यासाठी ही संस्था कार्य करते. लोकसहभागातून ग्रामीण भागात त्यांनी तीन लाख ‘वनराई बंधारे’ बांधले. जमिनीत पाण्याचे पुनर्भरण झाल्यामुळे अनेक गावे टॅंकरमुक्त झाली.

धारियांनी विश्‍वस्त म्हणून साधना, भारतीय शिक्षण संस्था, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, जनसेवा अशा संस्थांना मार्गदर्शन केले होते. त्यांना वर्ष 2005 मधे “पद्मविभूषण’ पुरस्कार देऊन भारत सरकारने त्यांचा गौरव केला. 14 ऑक्‍टोबर 2013 रोजी त्यांचे निधन झाले.

Leave A Reply

Your email address will not be published.